हा बंगाली बाबू या मुलीला शोधण्यासाठी काय करतोय पाहा...नक्की घडलंय तरी काय ?

बाहुबलीचा तो सीन आठवतोय का ज्यात बाहुबलीला तो मास्क सापडतो आणि तो आयुष्यात कधीही न चढलेला डोंगर चढून तिला भेटायला जातो ? असे अनेक फिल्मी सिन्स सांगता येतील ज्यात हिरो भूक तहान विसरून हिरोईनचा शोध घ्यायला निघतो.
खऱ्या आयुष्यातही असे अनेक हिरो सापडतील. आता कलकत्याच्या ‘बिस्वजीत पोद्दार’लाच घ्या ना. त्याने एका मुलीला ट्रेन मध्ये पाहिलं आणि तिच्या प्रेमातच पडला. ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ म्हणतात ना तेच. पण ती मुलगी कुठची, तिचा पत्ता काय ? काहीच माहित नसल्याने तिला शोधण्यासाठी त्याने तब्बल ४००० पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सला बघून तिने त्याच्याशी संपर्क साधावा अशी त्याची इच्छा आहे.
थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया...
बिस्वजीत पोद्दार हा सरकारी कर्मचारी आहे. तो एकदा तारापीठ वरून लोकलने घरी येत होता तेव्हा एक मुलगी तिच्या आईवडिलांसोबत त्याच्या समोरच येऊन बसली. त्याने तिच्याकडे पाहिलं पण तिला ते आवडलेलं दिसलं नाही म्हणून त्याने नजर वळवली. त्यांनतर तो बर्धमान स्टेशनला उतरला आणि हावडासाठी दुसरी ट्रेन पकडली. योगायोग म्हणजे मुलगी आणि तिचे आईवडील सुद्धा त्याच ट्रेन मध्ये शिरले. आणि त्यांनी त्याच्या समोरचीच जागा पकडली. यावेळी मात्र तिनेही त्याच्या नजरेला प्रतिसाद दिला. पुढील २ तास हेच चालत राहिलं.
कोन्नगर स्टेशन आल्यावर जेव्हा ती ट्रेन मधून उतरली तेव्हा पर्यंत त्यांच्यात नजरेनेच बराच संपर्क झाला होता. तिने जाताजाता इशाऱ्याने त्याला नंबर सांगण्याचा प्रयत्न केला. पण झालं असं की आपल्या हिरोला तिचा मुकाभिनय समजलाच नाही. शेवटी ती तिच्या मार्गी निघून गेली आणि आपला हिरो तिच्या प्रेमात वेडा झाला.
पुन्हा वर्तमानात या !!
मुलीच्या आईवडिलांच्या बोलण्यात सतत ‘बाली’ ठिकाणाचा उल्लेख येत होता हे बिस्वजीतने लक्षात ठेवलं. ती कोन्नगर भागात उतरली असल्याने ती नेमकी बालीची कोन्नगरची हे त्याला कळेना. त्यामुळे त्याने चक्क बाली ते कोन्नगर या ६ किलोमीटरच्या भागात ४००० पोस्टर्स लावले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने एक फिल्म तयार केली आहे ज्यात तो तिला संपर्क साधण्यासाठी विनवणी करतोय.
तो रोज ऑफिस सुटल्यानंतर त्याच कपड्यांमध्ये कोन्नगर स्टेशनजवळ जाऊन तिची वाट बघतो. तो म्हणतो की मी हे सगळं तिच्याशी संपर्क साधण्यासाठी करत आहे. जर तिला इच्छा असेल तर तिने मला संपर्क करावा. त्याने बनवलेल्या फिल्म मधून किंवा पोस्टर्स मधून तिची बदनामी होईल असं कोणतंच कृत्य दिसत नसल्याने त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही.
राव ४००० पोस्टर्स आणि एक फिल्म पर्यंत तरी ठीक होतं पण आता तर त्याची बातमी देशभर पसरली आहे. यामुळे एकतर ती त्याला भेटेल तरी किंवा बातमीत येण्याच्या भीतीने कधीच भेटणार नाही. आता बघूया पुढे काय होतं ते.