पिळदार मिश्यांसाठी तयार करण्यात आलेली ९ अतरंगी उत्पादनं !!
फार पूर्वीपासून मिशा हा पुरुषांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. शराबीमधला तो डायलॉग आठवतोय का? “मुंछे हो तो नथ्थुलाल जैसी हो, वरना ना हो”? किंवा अमोल पालेकरचा गोलमाल मधला सीन, ज्यात तो म्हणतो ‘मुंछ तो मन का दर्पण है.' ?? पूर्वी पैज लावताना मिशा ‘भादरून टाकेन’ अशीही पैज लागायची.
थोडक्यात, मिशांबद्दल असलेलं हे आकर्षण जगभरात पहायला मिळतं. आजकाल तर मिशा-दाढी ठेवण्याची नवी फॅशन आली आहे. पण हे तर काहीच नाही राव. आजपासून १०० वर्षांपूर्वी याहून पराकोटीची फॅशन होती. या फॅशनमुळे झालं असं की दाढीमिशांसाठी नवीन नवीन उत्पादनं तयार झाली. आज या उत्पादनांना बघून हसू आल्याशिवाय राहणार नाही.
चला तर मग, आज शनिवार स्पेशलमध्ये बोभाटावाचकांसाठी खास घेऊन आलो आहोत मिशांसाठी तयार करण्यात आलेल्या विचित्र उत्पादनांची माहिती...
१. लॅट्रील्स एक्सल्सियर लोशन
१८७० साली लंडनच्या जॉन लॅट्रील्स यांनी मिशांची चांगली वाढ होण्यासाठी एक खास लोशन तयार केलं होतं. जाहिरातीत दिसणाऱ्या माणसाच्या मिशा आणि दाढी या प्रॉडक्टबद्दल खात्रीच देत आहेत असं वाटतं.
२. एडमंड सी ग्लॅडविनचं मिशांचं सुरक्षा कवच
भरदार मिशा असल्या की त्यांचा आणि जेवणाचा संपर्क येणारच. त्या जेवणात बुडू नयेत म्हणून एक खास सुरक्षा कवच तयार करण्यात आलं होतं. याचा वापर कसा करायचा हे तुम्ही फोटोत पाहू शकता.
१९०१ साली हे सुरक्षा कवच शोधण्यात आलं. शोध लावणारे एडमंड सी ग्लॅडविन यांनी या उत्पादनाचं आपल्या नावावर पेटंट करून घेतलं होतं. त्याकाळात बड्या आसामींनी या उत्पादनाला पसंती दाखवली होती.
३. मिशांसाठीचे खास कप
सुरक्षा कवच कसे दरवेळी घालावे लागतात, पण हे कप वापरायला अगदी सोप्पे होते. मिशा कपात बुडू नयेत म्हणून कपावर एक जाळी लावण्यात आली होती. या कपांना बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला होता. त्यामुळं हे श्रीमंतीचं एक प्रतिकही होतं. १८८९ साली ब्रिटनमध्ये हे उत्पादन तयार करण्यात आलं होतं.
४. मिशांसाठीचा खास चमचा.
फोटोत दिसणारा चमचा १९ व्या शतकातला आहे भाऊ. मिशांना रोखण्यासाठी एक अतिरिक्त कवच लावण्यात आलं होतं, जेणेकरून फक्त ओठांपुरतीच जागा राहील. १८६५ साली हे प्रोडक्ट बाजारात आलं.
५. मिशा कुरळ्या करण्याचं यंत्र
हे एक साधं लाकडी यंत्र होतं. या यंत्राला एक गोलाकार ब्रश बसवण्यात आला होता. हा ब्रश चालू केला की मिशांना पीळ बसायचा आणि ते केस कुरळे व्हायचे. आठवतोय का " पाखरू गावात नवं आलंय वाटतं" म्हणत मिशांना पीळ देत बसलेला मराठी सिनेमातला राजदत्त? त्याच्यासारख्यांना या प्रॉडक्टचा भलताच उपयोग झाला असता.
६. मिशांना लावण्याचा रंग
हे प्रोडक्ट आजच्या केस काळे करण्याच्या डाय सारखंच होतं. पांढऱ्या मिश्यांना काळे करा, किंवा काळ्याचे सोनेरी किंवा बदामी रंग द्या. पण या प्रोडक्टमध्ये एक कमतरता होती. १८८४ साली डेली टेलिग्राफ वृत्तपत्राने एक किस्सा सांगितला होता. एक माणूस मिशा रंगवून गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेला, पण डेट संपल्यावर मुलीच्या चेहऱ्यावर काळा रंग बरबटला होता.
७. ब्रिलीयंटाईन
केस व्यवस्थित राहावेत म्हणून आपण जेल वापरतो ना? तसाच काहीसा हा प्रकार होता. खरं तर ब्रिलीयंटाईन केसांसाठी वापरला जायचा पण त्याकाळातील मिशांचा ट्रेंड बघून मिशांसाठी सुद्धा ब्रिलीयंटाईन उपयोगी आहे अशी जाहिरात करण्यात आली होती.
८. मुस्टाश ट्रेनर
मुस्टाश ट्रेनर तयार करून जर्मनीचे राज्यकर्ते कैसर विल्यम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. याच उत्पादनाने त्यांना श्रद्धांजली का वाहिली असा प्रश्न पडला असेल तर त्यांचा फोटो बघून घ्या.
बघितलं? कशा भरदार मिशा लाभल्या होत्या त्यांना. हा ट्रेनर वापरून मिशांना असाच रुबाबदार आकार देता येतो अशी जाहिरात करण्यात आली होती. सकाळी फक्त ५ मिनिट हा ट्रेनर वापरला की तुमच्या मिशा अगदी मनासारख्या झाल्याच म्हणून समजा.
९. नकली मिशा आणि दाढी
जर मुळात मिशा आणि दाढीच उगवत नसेल, तर एवढे सगळे प्रोडक्ट फेल ठरतील ना राव!! अशा दुर्दैवी पुरुषांचा १९ व्या शतकातही विचार केला जायचा. त्यांच्यासाठीच या नकली दाढी-मिशा बाजारात आल्या. आजच्या काळात डोक्यावर केस नाहीत म्हणून विग वापरला जातो. पण त्याकाळी अगदी उलट होतं. मिशांचा प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने या प्रॉडक्टची चलती होती.
म्हणजेच आजकाल उस्तरासारखे ब्रँड दाढीमिशांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारात आणत आहे, त्यात नवीन असं काहीच नाही. त्यांच्यापेक्षा धमाल गोष्टी १०० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होत्या..
काय मग? असल्या गोष्टी वापरून शेर दिल जवां मर्द सारख्या दाढीमिशा तुम्हीही राखणार का?




