कडेगांवचा आगळावेगळा मोहर्रम...हा कदाचित महाराष्ट्रातला हिंदूंनी साजरा केलेला एकमेव मोहरम असेल !!

सांगली जिल्ह्यात कडेगांव हे तालुक्याचं गाव आहे. पण हे गांव तसं सांगलीला कमी आणि कराडलाच जास्त जवळचं आहे. हे गांव प्रसिद्ध मात्र आहे त्याच्या मोहर्र्मच्या उत्सवासाठी. 

काय आहे इथली खासियत ?

इथं मोहर्रमच्या दिवशी गल्लोगल्ली डोले बनवले जातात. आपल्याकडं जशी गणेशोत्सव मंडळं असतात, तशी कडेगांवात डोले मंडळं आहेत. आज कडेगांवात एकूण १२ मुख्य डोले आहेत. पटेल-पाटील मंडळ, कलावात मंडळ, सुतार मंडळ, बागवान, शेख अशी वेगवेगळी मंडळं प्रसिद्ध आहेत.  मोहर्रम येण्याच्या कित्येक दिवस आधी हे डोले बनवण्याचं काम चालू होतं आणि मोहर्रमच्या दिवशी कडेगावातल्या बुधवार पेठेतल्या मैदानावर् या डोल्यांची भेट घडवली जाते. नेहमीच्या प्रथेप्रमाणं मानाचे डोले आधी निघतात, आधी त्यांच्या भेटी होतात आणि नंतर इतरांच्या. 

डोल्यांची भेट

कडेगावात फक्त डोलेच बनत नाहीत, तर इथं या सणाची गाणीही म्हटली जातात. यातली काही गाणी तर चक्क मराठीसुद्धा आहेत. पारंपारीक पोषाखात ही मंडळी समोरासमोर गट करुन ही गाणी म्हणतातच, पण डोले बनवले जात असतानासुद्धा ही गाणी म्हटली जातात. या गाण्यांत साधारणत: मोहर्रम, करबल आणि मोहर्रमची कथा असते. कलगी-तुऱ्यासारखी समोरासमोरच्या गटांत गाणी म्हणण्याची जाम स्पर्धा चालू असते. 

करबल युद्ध  कथा

 

मोहर्रमचं महत्त्व काय आहे ?

करबल युद्ध (स्रोत)

खरंतर मोहर्रम हा मुस्लिम कॅलेंडरमधल्या पहिल्या महिन्याचं नाव आहे. त्याच्या दहाव्या दिवशी शिया मुस्लिम 'मातम' करतात तर  सुन्नी मुस्लिम त्यादिवशी उपवास करतात. म्हणून या दिवसाला त्याअर्थाने सण म्हणता यायचं नाही. या दिवशी प्रेषित मुहम्मदाचे नातू इमाम हुसेन यांचा सध्या इराक देशात असलेल्या करबल इथल्या युद्धात शिरच्छेद करण्यात आला होता. या युद्धात इमाम हुसेनांचे सर्व कुटुंबिय, म्हणजे अगदी सहा महिन्याच्या मुलासह सगळेजण मारले गेले होते. त्यामुळे हा दिवस शिया मुस्लिमांसाठी सुतकाचा दिवस आहे. 

 

काय असतात हे डोले ?

हे डोले बनवणं भारी अवघड काम असतं आणि त्याहून अवघड असतं ते वाहून नेणं. आधी कळस आणि मग पाया या तत्त्वावर ते बनवले जातात. बांबूंना सुतळीने बांधून त्यांचा सांगाडा बनवला जातो, त्यावर शेतातल्या मातीचे थर देऊन घड्यासारखे आकार बनवले जातात आणि सर्वात शेवटी हे डोले बेगडी कागदांनी सजवले जातात. डोला उभा राहिला की त्याला फुलांनी आणि नोटांच्या माळांनी सजवलं जातं. एकेक डोला कित्येक फूट उंच असतो. हे डोले खांद्यावरुन वाहून गावच्या मैदानात भेटींसाठी नेले जातात. डोला पडू नये, कोसळू नये म्हणून खूपच काळजी घेतली जाते. यासाठी सर्व बाजूंनी दोर बांधून त्याला नियंत्रित केलं जातं. डोल्याची उंची आणि बनवताना वापरलेल्या ओल्या मातीमुळं त्याचं वाढलेलं वजन, या दोन्ही गोष्टींमुळं डोले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं अवघड असतं. पण हे मोठ्या उत्साहात केलं जातं.

या उत्सवात हिंदू मुस्लिम दोन्ही समाज मोठ्या उत्साहात सामील होतात. अगदी डोले बनवण्यापासून ते वाहून नेणं, गाणी म्हणणं या सगळ्या गोष्टींत हे ऐक्य दिसून येतं. गंमत म्हणजे हा सणही एका हिंदू मनुष्यामुळेच या गावात चालू झाला आहे अशी कथा सांगण्यात येते. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी कडेगांवचे देशपांडे आणि पाटील कराडला डोले बघण्यासाठी गेले होते, तिथल्या लोकांनी म्हणे त्याचा अपमान केला. म्हणून त्यांनी 'गेलात उडत' असं म्हणून थेट आपल्या स्वत:च्याच गावी ही डोल्यांची प्रथा चालू केली असं म्हणतात. ही प्रथा तेव्हापासून इथं कडेगावात चालू आहे. 

या दिवशी गावातल्या सर्वांच्या घरी पाहुणे येतात. घरोघरी गोडधोड तर बनतंच, आणि गावातही ठिकठिकाणी प्रसाद वाटले जातात.  डोल्यांच्या भेटी होईपर्यंत घरी शक्यतो अन्न शिजवलं जात नाही. मूळ प्रथेनुसार शिया मुस्लिम दिवसभर उपवास करत नसले तरी दुपारपर्यंत काही खात नाहीत, त्यांच्यासोबतच घरोघरीही तोपर्यंत अन्न शिजवलं जात नाही. यादिवशी दोन पदार्थ खास करुन बनवले जातात, एक म्हणजे चोंगे आणि दुसरे रोट. चोंगे म्हणजे गव्हाच्या पोळीवर गुळाचे पाणी लावून त्यावर सुकं खोबरं आणि खसखस लावली जाते. चोंगे बनवण्याचे साचेसुद्धा असतात. नक्षीदार डिझाईनचे चोंगे दिसायला आणि खायलाही तितकेच सुंदर असतात. रोट बनवण्यासाठी रवा आणि दूध मिक्स करुन शक्यतो बेकरीतून भाजून आणले जातात. 

चोंगे (स्रोत)

फक्त हिंदू-मुस्लिमच नाही, तर यादिवशी कडेगावात राजकीय ऐक्यही पाहायला मिळतं मंडळी. सारे राजकीय पक्ष एकाच स्टेजवर डोल्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी एकत्र येतात.  सांगली जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार या दिवशी आवर्जून भेट देतात.  कडेगाव हा तसा डॉ. पतंगराव कदमांचा मतदारसंघ. त्यामुळं त्यांची यादिवशी कडेगांवात हजेरी अगदी ठरलेली असायची. आता ते नाहीत, पण ही परंपरा काही खंडित व्हायची नाही.

मंडळी, मोहर्र्मच्या दिवशी आयुष्यात किमान एकदातरी तुम्ही कडेगावला भेट द्यायलाच हवी. काय म्हणता ?

सबस्क्राईब करा

* indicates required