जाणून घ्या या महाकाय कोबीच्या मागची कहाणी

कधी तीस किलो वजनाचा कोबी पाह्यलाय का भाऊ ? पहिला नसेल तर आता पाहाल. या ब्रिटनच्या तात्यांना भेटा. यांचं नाव आहे नील इयान. वय ७५. हे मुळचे ब्रिटन मधले. यांना छंद आहे साधारण भाज्यांच्या दुप्पट आकाराचे पिक घेणं. आता हा कोबीच बघा ना. हा तीस किलोचा कोबी त्यांनी कोणत्याही रसायनाशिवाय तयार केलाय.
नील इयान यांना त्यांच्या शेतात अशा महाकाय भाज्या पिकवायला आवडतं. त्यांनी तयार केलेल्या ३० किलोच्या कोबीला नॉर्थ यॉर्कशायर मधल्या हॅरीगेट ऑटम फ्लॉवर शो मध्ये पुरस्कारही मिळाला आहे. यावेळी त्यांचं प्रचंड कौतुक झालं. या शो मध्ये त्यांनी सर्वात मोठं गजरही आणलं होतं. या अनोख्या भाज्यांना बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
नील इयान म्हणाले की ते ज्या भागात शेती करतात, तिथे अशा महाकाय भाज्या पिकण्यासाठी योग्य वातावरण आहे. त्यांनी हेही सांगितलं की साधारण कोबीपेक्षा या ३० किलोच्या कोबीला पिकवायला जास्त वेळ लागला.
मंडळी, अशाच प्रकारे हटके शेती करणारा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला माहित असल्यास आम्हाला नक्की कळवा.