पोटातून उगवलेल्या अंजिराच्या झाडाचं रहस्य....वाचा ही चक्रावून टाकणारी कथा !!

बी गिळल्यावर पोटातून झाड उगवतं का ? उत्तर अर्थातच ‘नाही’ असंच असेल. पण एका अजब घटनेने हे खरं असतं असं दाखवून दिलंय. घाबरू नका, ही घटना जिवंत माणसासोबत घडलेली नाही तर मृत माणसासोबत घडली आहे.
झालं असं की सायप्रस देशातल्या एका डोंगराळ भागातल्या गुहेत अंजिराचं झाड उगवलं. यात तसं कौतुक काहीच नाही पण स्थानिकांसाठी हा प्रकार विचित्र होता. कारण या भागात कुठेही अंजिराचं झाड उगवत नाही. शिवाय चक्क एका गुहेत पहिल्यांदाच अंजिराचं झाड उगवलं होतं. संशोधकांनी याच रहस्य जाणून घेण्यासाठी अंजिराच्या झाडाजवळ उत्खनन केलं असता त्यांना एका जुन्या प्रेताचे अवशेष सापडले. DNA चाचणीतून हे प्रेत ‘एहमत हर्ग्यून’ या व्यक्तीचं असल्याचं समजलं. असं म्हणतात की अंजिराचं झाड चक्क त्याच्या पोटातून उगवलं होतं भाऊ. याच भागात आणखी दोन प्रेतं सापडली आहेत.
या प्रेतांचं रहस्य काय ?
सायप्रस देशात ७० च्या दशकात तुर्की आणि ग्रीक वंशांचा वाद सुरु होता. एहमत हा तुर्की वंशाचा असल्याने तो एका तुर्की गटात सामील झाला होता. त्याचा काटा काढण्यासाठी शत्रूंनी त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना एका गुहेत नेऊन तिथे डायनामाईटचा स्फोट घडवला. यातच एहमतचा मृत्यू झाला. ही घटना घडली १९७४ साली. एहमातच्या कुटुंबाने त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही.
डायनामाईटच्या स्फोटाने गुहेत एक छिद्र पडलं होतं ज्यामुळे गुहेत सूर्यप्रकाशाचा शिरकाव झाला. एहमतने मारण्यापूर्वी अंजीर खाल्ल्याने त्याचं प्रेत सडण्यास सुरुवात झाल्यानंतर पोषक वातावरणामुळे पोटातूनच अंजिराचं झाड उगवलं.
एहमत आणि त्याच्या पोटातून उगवलेल्या झाडाची कथा सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. या कथेमागे एक वादाचा मुद्दा असा आहे की अंजिराच्या झाडाची कथा ही एहमतच्या बहिणीने मिडीयाला सांगितली. तर सायप्रस मेल या इंग्रजी वृत्तपत्राने हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. सायप्रस मेलच्या मते अंजिराच्या झाडापासून थोड्या अंतरावर तिन्ही मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे पोटातून झाड उगवल्याची कथा साफ खोटी आहे.
राव, सत्य काहीही असलं तरी अंजिराच्या झाडामुळेच एहमतचा मृतदेह सापडला याला कोणाचाही विरोध नाही. अंजिराचं झाड नसतं तर कदाचित एहमतच्या घरच्यांना त्याचं नक्की काय झालं याचा पत्ताच लागला नसता.