म्हणून डॉक्टरांना आता घ्यावे लागणार आहेत चांगल्या हस्ताक्षराचे धडे !!

तर मंडळी, डॉक्टरकडे गेला आहात आणि त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमधलं तुम्हाला काहीच कळालं नाही असं कधी घडलंय का? बरेचदा असंच झालं असेल ना? तसेही डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर अनेक अनेक जोक आहेत. मात्र आजकाल काही डॉक्टरांच्या अक्षरांमध्ये सुधारणा पण दिसून येतेय. आपल्या एकूणच धकाधकीच्या जीवनात प्रिस्क्रिप्शन घेण्यासारखं क्षुल्लक काम करण्यात त्यांना वेळ घालवायचा नसावा किंवा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य पेशंटला काय लिहिले हे धड कळू नये हे पण असावं. कारण काहीही असो, पण डॉक्टरांचं अक्षर मात्र आपल्याला कळत नाही.
तर अशा सगळ्या आपल्या मित्रांसाठी एक खास बातमी घेऊन आलोय. अलाहाबाद हायकोर्टाने तीन डॉक्टरांना त्यांच्या खराब हस्ताक्षरासाठी चक्क पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. आहे ना खरी गंमत? तर झालं असं म्हणे की तीन वेगवेगळ्या केसेसमध्ये या डॉक्टरांनी फिर्यादींसाठी हेल्थ रिपोर्ट लिहिला, पण डॉक्टरच्या खराब हस्ताक्षरामुळे हे तीनही रिपोर्ट रद्दबातल ठरवण्यात आले. कोर्टाला झालेला हा त्रास बघता कोर्टाने सरळ या तिन्ही डॉक्टरांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाच्या म्हणण्यानुसार या तीनही डॉक्टरांनी कोर्टाच्या कामात अडथळा आणण्यासाठी असा खराब रिपोर्ट दिला. यावर उत्तर देताना या तीनही डॉक्टरांनी खूप जास्त काम असल्यामुळे आपण नीट अक्षर काढू शकत नाही असा खुलासा केलाय. काही असो, आता या निर्णयामुळं डॉक्टरांना लोकांना समजेल अशा हस्ताक्षरात लिहावं लागणार आहे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे.
लहानपणी चांगल्या अक्षराचे आणि शुद्धलेखनाचे दहा मार्क असायचे. असं वाटतं की डॉक्टरांना ते मार्क कधीच मिळाले नसावेत. आता ही बातमी बाहेर येताच इंटरनेटवर जोक्स मारा सुरू झालाय. कुणी म्हणे आता या बातमीची लिंक का आपल्या डॉक्टर मित्रांना पाठवा, कुणी सरसकट सगळ्या डॉक्टर लोकांना दोषी ठरवले, तर कुणीच डॉक्टर लोकांना आता संप करा असा सल्ला दिलाय. तर मंडळी, डॉक्टरच्या अक्षराचे तुमचे अनुभव काय आहेत? तुम्हाला कधी त्याचा त्रास झालाय? किंवा तुमच्या बाबतीत काही वेगळा अनुभव आहे? कळवा आम्हाला पटापट..