त्याने पायलट होताच असं काही केलं की प्रत्येकजण त्याला सलाम करत आहे !!

एका लहानशा गावातला एक तरुण. त्याने पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं, खूप मेहनत केली आणि शेवटी तो पायलट झाला. स्वप्न साकार झाल्यावर त्याने आपल्या गावाशी असलेली नाळ तोडली नाही. त्याने चक्क ते केलं जे आजवर कोणीही केलं नव्हतं.
हिसार, हरियाणा येथील सारंगपूर गावातल्या ‘विकास जानी’ या तरुणाने पायलट होताच गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना चक्क विमानप्रवास घडवला आहे. नवी दिल्ली ते अमृतसर असा हा प्रवास होता. ७५ आणि ८० वर्षांचे आजोबा आणि अगदी नव्वदीतल्या आज्जी असे २२ ज्येष्ठ नागरिक या विमान प्रवासात सामील होते. यातल्या कोणीही आजवर विमान पाहिलाही नव्हता आणि तशी शक्यताही नव्हती. विकासमुळे त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात एक यादगार प्रवास करता आला.
मंडळी, विकासने त्यांना फक्त विमानप्रवास घडवला नाही तर सुवर्ण मंदिर, वाघा बोर्डर आणि जालियानवाला बाग अशा ऐतिहासिक स्थळांची सैर सुद्धा करून आणली. विकास म्हणतो की पायलट होण्याआधी त्याने गावच्या वृद्धांना वचन दिलं होतं की पायलट झाल्यानंतर तो त्यांना आपल्या खर्चाने विमानातून फिरवून आणेल.
मंडळी, या हटके कामगिरीसाठी विकासचं सर्वत्र कौतुक होत आहे. कौतुक तर होणारच ना राव, त्याने कामच असलं भारी केलंय.