इशा अंबानीच्या लग्नाची फोटोग्राफी करणाऱ्याला असं मिळालं होतं ते कंत्राट!! वाचा तर त्याला काय अटी घालण्यात आल्या होत्या...

मंगळूरच्या ‘विवेक सिक्वेरा’ (वय ४७) या फोटोग्राफरला एका लग्नाच्या फोटोग्राफीचं काम मिळालं होतं. यासाठी १ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत दुसरं कोणतंच काम घेऊ नको असं त्याला निक्षून सांगण्यात आलं. लग्न कोणाचं आहे, नक्की किती दिवस चालणार आहे याबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती. हे घडलं जून २०१८ ला. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला या लग्नाची माहिती देण्यात आली. हे लग्न होतं चक्क इशा अंबानीचं...
मंडळी, विवेक सिक्वेरा म्हणतो की अंबानी आणि पिरामल कुटुंबियाच्या मित्राने त्याला हे काम देताना ‘जिंदगी बन जायेगी‘ म्हटलं होतं. याचा अर्थ त्याला पुढे समजला.
विवेकने आणि त्याच्या टीमने १५ दिवसांच्या लग्नसोहळ्यात तब्बल १ लाख २० हजार (३० TB मेमरी) फोटोग्राफ्स घेतले आहेत. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक समारंभाचा तो साक्षीदार राहिला आहे. तो म्हणतो की ‘एवढ्या मोठ्या लग्नसोहळ्यावर मी पहिल्यांदा काम केलं. हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं’
अंबानी आणि पिरामल कुटुंबियांशी निगडीत एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला होता. काम देण्यापूर्वी त्याला त्याच्या कामाचे काही नमुने मागण्यात आले होते. हे नमुने पाहिल्यानंतर त्याला कामासाठी नक्की करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याला लग्नाची कल्पना देण्यात आली नव्हती. ऑक्टोबर मध्ये त्याला याबद्दल सगळी माहिती देण्यात आली. त्यासोबतच महत्वाच्या करारांवर त्याच्या सह्या घेण्यात आल्या. हा करार फोटोग्राफ्स इतरत्र प्रदर्शित न करणे व त्याला देण्यात येणाऱ्या पैशांबद्दलची माहिती कोणापुढेही उघड न करण्याबाबतीत होता. एवढं झाल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात झाली.
त्याच्या यावेळच्या स्थितीबद्दल तो म्हणतो, ‘हे पचवायला मला २ दिवस लागले.’ विवेक म्हणतो की या महत्वाच्या कामासाठी माझी निवड माझ्या कामाच्या बळावर झाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे...
विवेक आणि त्याचा मित्र शंकर कटवे मिळून ‘Luxe Captures’ ही फोटोग्राफीची कंपनी चालवतात. इशा अंबानीच्या लग्नासाठी ‘Luxe Captures’ ची संपूर्ण टीम कार्यरत होती. विवेक, मित्र शंकर कटवे आणि आणखी ४ जणांनी मिळून मुंबई आणि उदयपुर मधले महत्वाचे समारंभ कव्हर केले, तर दुसऱ्या ७ जणांच्या टीमने व्हिडीओग्राफी आणि ड्रोन सांभाळले.
लग्न सोहळ्याच्या ठिकाणी झेड सुरक्षाव्यवस्था होती. विवेक आणि त्याच्या टीमला खास ID कार्ड्स देण्यात आले होते. यामुळे त्यांना अगदी जवळून लग्नाचे क्षण टिपता आले. विवेकला त्याचा सर्वात यादगार क्षण विचारल्यावर तो म्हणाला की “एका क्षणी मी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या मध्ये उभा होता, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता.”
मंडळी, विवेकचा इथवरचा प्रवास चकित करणारा आहे. विवेकला मध्येच कॉलेज सोडावं लागलं. घरच्या गरिबीमुळे त्याने पेट्रोल पंपावर काम केलं. त्याला त्याच्या मित्राने फोटोग्राफी मध्ये करियर करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्याने पहिल्यांदा ७००० रुपयांचा आपला पहिला कॅमेरा खरेदी केला. हे ७००० रुपये म्हणजे त्याने मालकाकडे ‘सुरक्षा ठेव’ म्हणून ठेवलेली रक्कम होती. ही रक्कम पुन्हा मिळवण्यासाठी त्याला नोकरी सोडावी लागली. त्याने ही ‘रिस्क’ घेतली. याबद्दल तो आज आनंद व्यक्त करतो.
१९९७ साली त्याने स्वतःच्या नावाने फोटो स्टुडीओची सुरुवात केली. आज हा स्टुडीओ त्याचा भाऊ सांभाळतो. आजवर विवेक १५ पेक्षा जास्त देशात फिरला असून त्याने तब्बल १,३०० लग्नात फोटोग्राफी केली आहे. त्याला २०१०, २०११, २०१२ आणि २०१४ अशा ४ वर्षातील ‘बेस्ट वेडिंग फोटोग्राफर’चा पुरस्कार मिळाला आहे.
मंडळी, मनापासून काम करत राहिल्यावर एकेदिवशी काम खणखणीत वाजतंच याचं हे जिवंत उदाहरण आहे.
ताजी बातमी :
नुकतंच आम्ही विवेकचं फेसबुक पेज धुंडाळलं. तिथे इशा अंबानीच्या लग्नाच्या बाबतीत असलेले सगळे फोटोग्राफ्स त्याने काढून टाकले आहेत. याचं कारण कदाचित Non-disclosure agreement मध्ये असावं.