महाराष्ट्राच्या लेकीने २९,००० किलोमीटर प्रवास करून रचला आशियाई विक्रम !!

मंडळी, आज आम्ही एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राच्या एका वाघिणीने तब्बल १५४ दिवसात २९,००० किलोमीटरचा प्रवास करून आशियाई रेकॉर्ड बनवलाय. हा रेकॉर्ड करणारी ती आशियातील पहिली महिला, तर जगातील तिसरी महिला ठरली आहे.
मंडळी, वेदांगी कुलकर्णीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी हा विक्रम केलाय. रोज ३०० किलोमीटरचा प्रवास, १४ देश आणि १५९ दिवस असा तिचा प्रवास होता. कौतुकाची गोष्ट म्हणजे वेदांगीने हा विक्रम कोणाच्याही मदतीशिवाय केला आहे.
वेदांगीने ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. तिला तिच्या प्रवासात अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कॅनेडात एका अस्वलाने तिचा पाठलाग केला होता, तर स्पेन मध्ये चाकूच्या धाकाने तिला लुटण्यात आलं. रशिया मध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीत तिला बऱ्याच दिवसांपर्यंत एकटं राहावं लागलं होतं. या सगळ्या प्रसंगानंतर आपल्याला कल्पना येईल की तिचा हा विक्रम किती खडतर होता.
वेदांगीला खरं तर पृथ्वीप्रदक्षिणा करून विश्वविक्रम करायचा होता, पण प्रवासातील या अडचणींमुळे तिचा विश्वविक्रम थोडक्यात हुकला आहे. ती आताही तिच्या प्रवासात असून पर्थच्या दिशेने प्रवास करत आहे. पर्थ येथे पोहोचून तिच्या प्रवासाची अधिकृतरीत्या सांगता होईल.
जाता जाता :
जेनी ग्रॅहम (स्रोत)
ब्रिटीश प्रवासी जेनी ग्रॅहम ही आज पहिल्या क्रमांकाची पृथ्वीप्रदक्षिणा करणारी महिला आहे. तिने १२४ दिवसात पृथ्वीप्रदक्षिणा केली होती. तिच्या नंतर नंबर लागतो ते इटलीच्या पाओला जिनोट्टी हिचा. तिने हा प्रवास १४४ दिवसात पूर्ण केला होता. आता तिसरा क्रमांक वेदांगीने पटकावलाय.
मंडळी, वेदांगी कुलकर्णीने आशियाई विक्रम करून महाराष्ट्राची आणि भारताची मान उंचावली आहे. तिच्या कामाला बोभाटाचा सलाम !!