ही कंपनी तुम्हांला आजारी पाडण्यासाठी रोग विकते ? काय आहे हा येडचाप प्रकार ??
राव, आजारी पडायला काय पैसे थोडीच लागतात. आजारपण तर फ्री मध्ये मिळतं. फ्रीचं सोडा, नवनवीन व्हरायटी मध्ये आजारपण मिळतं. पण एक कंपनी आहे जी चक्क आजारपण विकते. गोंधळलात ना ? चला सविस्तर जाणून घेऊया...

Vaev नावाची कंपनी चक्क रोगट टिश्युपेपर विकत आहे. हे टिश्युपेपर निरोगी व्यक्तीने नाकाला लावले की थोड्याच वेळात माणूस आजारी पडतो. म्हणजे आपण पाहिजे तेव्हा आजारी पडू शकतो. पण जर तुम्ही विचार करत असाल की हे टिश्युपेपर तर अगदी स्वस्त मिळत असतील. अगदी चूक !! हे टिश्युपेपर्स जवळजवळ ५६०० रुपयांचे आहेत. सावरून बसा आणखी एक धक्का द्यायचा आहे.
आता आपल्याला वाटेल की हे घेणार कोण ? तर कंपनीने सांगितलं आहे की आजवर १००० लोकांनी या टिश्यूचा लाभ घेतला आहे.
आता वळूया टिश्यूकडे. (पण थोडं लांबून)

कंपनी आहे म्हणजे कामगार असणारच. तर, कंपनीवाले कामगार म्हणजे आजारी माणसांना टिश्युपेपरने नाक पुसायला लावतात. सोप्प्या भाषेत शेंबूड पुसायला लावतात. मग तेच टिश्युपेपर पॅक केले जातात. हे टिश्यू कसे वापरायचे यासाठी टिश्यू बॉक्सवर मार्गदर्शन पण छापलेलं असतं. कहर आहे राव !!
हे असलं काहीतरी का तयार केलं ? कंपनीच्या मालकांच्या म्हणण्या प्रमाणे, ‘लोकांना हवं तेव्हा आजारी पडण्यासाठी आम्ही ही कल्पना शोधून काढली आहे.’
गेल्या काही दिवसात अशा येडचाप प्रॉडक्ट्सची नुसती रांग लागली आहे राव. एका बाईंनी प्लास्टिकच्या बॉटल पासून चपला तयार केल्या होत्या, तर एका कंपनीने अमेझॉनवर चक्क करवंटी १,३६५ रुपयांना विकायला काढली होती.

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या येडचापगीरी बद्दल ?




