computer

शौर्य पदक मिळालेल्या ५ मुलांच्या शौर्यगाथा...वाचून नक्कीच अंगावर काटा येईल !!!

ज्या मुलांनी इतरांचा जीव वाचवण्यासाठी वेळी स्वतःचा जीव धोक्यात घातला अशा शूर मुलांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पदकाने गौरवण्यात येतं. या पुरस्कारासाठी १६ वर्षाखालील मुलं निवडण्यात येतात. यावर्षी २१ मुलांना शौर्य पदक देण्यात आलं आहे. यातील ३ मुलांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

आज आम्ही घेऊन आलो आहोत या २१ मधल्या निवडक अशा ५ मुलांच्या हकीकती. त्यांनी दाखवलेलं शौर्य अंगावर काटा आणणारं आहे.

१. सितू मलिक

२० फेब्रुवारी २०१८ रोजी सितू मलिकच्या काकांवर मगरीने हल्ला केला होता. या हल्ल्यातून काकांना सुखरूप वाचवलं ते लहानग्या सितू मलिकने. तो ओडीसाच्या केंद्रपुरा जिल्ह्यात राहतो. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

२. अनिका जैमिनी

अनिका जैमिनी जयपूरची राहणारी आहे. जयपूरच्या गोपाळपूर बायपास नजीक एका बाइकस्वाराने अनिकाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. एकट्या अनिकने त्या अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने इतर स्त्रियांना निर्भय होण्याचा संदेश दिला आहे. ती स्वतःच आता निर्भयतेचं उत्तम उदाहरण बनली आहे.

३. कुमारी कांती

कुमारी कांतीने दाखवलेली बहादुरी ही कोणत्याही सिनेमाची कथा वाटेल अशी आहे. तिच्या घरावर २ हत्तींनी हल्ला केला होता. घराचं दार बंद होतं आणि हत्ती धडकेने दार उघडण्याच्या बेतात होते. तोवर कुमारी कांतीचे घरचे सुरक्षितपणे घराबाहेर पडले होते. त्यांच्या सोबत कुमारी पण बाहेर पडली. पण नंतर तिच्या लक्षात आलं की आपली लहान बहिण घरातच अडकून आहे. तिने मागचापुढचा विचार न करता घरात प्रवेश केला आणि आपल्या बहिणीला बाहेर काढलं.

४. गुरुगु हिमा प्रिया

गुरु हिमा प्रियाला सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ मिळाला आहे. १० फेब्रुवारी, २०१८ रोजी जम्मूच्या सेजवान आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गुरु हिमा प्रियाने आपल्या कुटुंबाचं आणि इतरांचं रक्षण केलं आहे. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्याने दहशतवाद्यांचं लक्ष विचलित केलं होतं. त्याच्या या हुशारीने अनेकजण सुरक्षित स्थळी पोहोचू शकले.

५. नितिशा नेगी

१५ वर्षांची नितिशा नेगी एक फुटबॉलर होती. ती आपल्या टीम सोबत दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या 'ग्लेनेलग' या समुद्र किनाऱ्यावर गेली होती. यावेळी एक मोठ्या लाटेने तिच्या टीम मधल्या मुलींचा तोल गेला. एका मुलीने नितिशा ची मदत मागितली. नितिशा लगेच तिला वाचवायला पुढे गेली. या सगळ्यात तिचा स्वतः चा तोल गेला आणि ती समुद्रात वाहून गेली. तिला मरणोत्तर शौर्य पदक देण्यात आलं आहे.

 

मंडळी, या लहानग्यांनी आपल्या सगळ्यांसमोर शौर्याचं एक मोठं उदाहरण उभं केलं आहे. तुम्हाला काय वाटतं या शूरविरांबद्दल ??

सबस्क्राईब करा

* indicates required