computer

बापरे, चक्क ठाण्याच्या मॉलमध्ये बिबट्या शिरला ? पुढे काय झालं ??

मंडळी, ठाणेकरांना आज बिबट्याने ‘धप्पा’ दिला आहे. ठाण्याच्या येऊर, वागळे, लोकमान्य नगर या वरच्या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या भागात तसा बिबट्या आढळणे काही नवीन नाही, पण यावेळी बिबट्याने कॅडबरी जंक्शन, कोरम मॉल आणि आता सत्कार हॉटेल मध्ये घुसून सगळ्यांनाच धक्का दिला.

ही पाहा कोरम मॉल मधल्या सीसीटीव्हीची फुटेज.

ठाण्याचा कोरम मॉल, आणि कॅडबरी जंक्शनचा भाग हा गजबजलेला आणि वर्दळीचा भाग आहे. अशा भागात बिबट्या शिरेल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सकाळपासून कॅडबरी भागात बिबट्या आहे अशी माहिती मिळाली होती, पण बिबट्या नेमका कुठे आहे याबद्दल कोणालाच माहित नव्हत. सर्वात आधी बिबट्या कॅडबरी कंपनीत शिरला, त्यानंतर ६ वाजेच्या सुमारास कोरम मॉलच्या पार्किंग मध्ये गेला. याबद्दल माहिती मिळे पर्यंत तो सत्कार हॉटेल मध्ये असल्याचं समजलं.

तोपर्यंत बिबट्याच्या बातमीने लोकांमध्ये घाबरट पसरली. वनाधिकाऱ्यांनी संपूर्ण जागेची शहानिशा करून बिबट्याला पकडण्याचं काम सुरु केलं. शेवटी बिबट्याला सत्कार हॉटेलच्या तळघरातून बंदिस्त करण्यात यश आलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्याला भूल देण्यात आली होती. खालील फोटो मध्ये सत्कार हॉटेलच्या बाहेर लावलेला पिंजरा आपण पाहू शकतो.

मंडळी, आपल्याकडे नुसतं जेसीबी रस्ता खणत असेल तरी लोक झुंडीने उभं राहून काम बघतात. इथे तर चक्क बिबट्या शिरला होता. बिबट्याला पाहण्यासाठी लोक सत्कार हॉटेलचं गेट आणि बाजूचं कंपाऊंड एवढंच काय शेजारी असलेल्या ज्युईश दफनभूमीच्या कंपाऊंडवर चढलेली दिसून आली. ही पाहा बघ्यांची गर्दी.

तर, आता प्रश्न पडतो हा बिबट्या तिथे आला कसा ? खरं तर हे त्या बिबट्यालाच माहित, कारण कॅटबर जंक्शनपासून येऊरचं जंगल तसं लांबच आहे. तो आला कसा याबद्दल माहित नसलं तरी तो का आला याचं करणं स्पष्ट आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर चाललेलं अतिक्रमण हे याचं उत्तर !! बिबट्या असो किंवा माकडांच्या झुंडी या अधूनमधून मानवी वस्तीत शिरत असतात. आज बिबट्याने भर वस्तीला भेट देऊन हा प्रश्न किती गंभीर आहे हे दाखवून दिलंय. आपण त्यांच्या घरात शिरल्यावर तो आपल्या घरात शिरणं साहजिक आहे ना राव.

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required