computer

फेक बातम्या ओळखण्यासाठी या ७ टिप्स पाहून घ्या भाऊ !!

सध्याचं वातावरण हे फेक गोष्टी व्हायरल होण्यासाठी अगदी अनुकूल वातावरण आहे. सोशल मिडीयावर हे अगदी ठळक दिसतं. २६ तारखेचीच गोष्ट घ्या ना. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकचा व्हिडीओ म्हणून इराण-इराकच्या युद्धातले फुटेजेस व्हायरल झाले होते. आपल्या भारतीय जनतेने ते फुटेजेस शेअर केले, एवढंच काय आपल्या स्टेटसवरही ठेवले होते. खरं तर एअरस्ट्राईकचा अधिकृत व्हिडीओ अजून प्रसिद्ध झालेला नाही.  

हे तर झालं एक उदाहरण, सध्या बातमी, माहिती, व्हिडीओ, फोटो अशा हर तऱ्हेने फेक गोष्टी व्हायरल होत आहेत. अशा गोष्टी आपण पसरवू नये ही एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

पण फेक बातम्या ओळखायच्या कशा ? यासाठी आज आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. चला तर फेक गोष्टी कशा ओळखायच्या ते समजून घेऊ !!

१. प्रश्न विचारा

माथी भडकवणारा कोणताही मेसेज जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रश्न विचारा. हा मेसेज खरा आहे का ? तो अधिकृत आहे का ? जर शंका असेल तर शेअर करू नका. गोष्टी पडताळून पाहा.

२. Forwarded लेबल लक्षात घ्या.

हल्ली whatsapp वर फॉरवर्ड मेसेजवर Forwarded लिहून येतं. Forwarded लेबल असलेला मेसेज पडताळून पाहा.

३. फेक लिंकपासून दूर राहा

बऱ्याचदा आपल्याला एक लिंक पाठवली जाते आणि लिंकवर जाऊन माहिती किंवा अमुक तमुक पाहा असं सांगितलं जातं. लिंक मधली माहिती खरी की खोटी हे तपासायचं असेल तर स्पेलिंगकडे पाहा. अशा लिंक मध्ये बऱ्याचदा स्पेलिंगच्या बालिश चुका असतात.

काही वर्षापासून अमेझॉनची एक लिंक फिरत आहे ज्यावर १ रुपयात शॉपिंग करता येते. अशा लिंक पासून लांबच राहा.

४. व्हायरल फोटो व्हिडीओवर लगेच विश्वास ठेवू नका

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सध्या इराक-इराणच्या युद्धातील फुटेज व्हायरल होत आहेत. सोबतच जुने फोटो पण व्हायरल होत आहेत. काही वेळा तर फोटो एक आणि बातमी भलतीच असाही प्रकार असतो. तुम्हाला जर अशा गोष्टी फॉरवर्ड होऊन आल्या तर त्यांची फेरतपासणी नक्की करा.

चुकीच्या फोटोंमुळे बरेचदा दंगली झाल्या आहेत, फक्त आलं म्हणून फॉरवर्ड करण्यापेक्षा कोणत्याही न्यूजपेपरच्या साईटवर जाऊन ते खरं आहे का तपासा आणि मगच पुढे पाठवा.

५. फेक मेसेज

फेक लिंकच्या बाबतीत जशी स्पेलिंगची बोंब असते तसंच मेसेजच्या बाबतीतही असतं. इंग्रजी आणि मराठी कोणतीही भाषा घ्या फेक बातमीत अनेक चुका आढळतात. आम्ही तर असा सल्ला देतो की ज्या मेसेजच्या शेवटी ‘माहिती आवडली तर शेअर करा’ किंवा ‘माहिती पुढे पाठवा’ अशा पद्धतीचा मजकूर असतो ती माहिती नक्कीच पडताळून बघितली पाहिजे.

६. माहिती अविश्वसनीय वाटत असेल तर.....

एखादी बातमी अगदीच अविश्वसनीय वाटत असेल तर ती आधी तपासून पहिली पाहिजे. बऱ्याचदा अशा गोष्ट खोट्या असतात.

७. पडताळून कसं पाहाल ?

बातमी खरी की खोटी हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ती आली आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे. फोटो खरा की खोटा हे पाहण्यासाठी गुगलवर इमेज सर्चचं ऑप्शन असतं. त्या फोटो बद्दल बरीच माहिती उकरून काढता येते.

 

मंडळी, फेक न्यूज पसरवू नका आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. याला पण देशासाठी एक योगदानच म्हणता येईल !!

सबस्क्राईब करा

* indicates required