सुरतच्या व्यापाऱ्याने बनवली सर्जिकल स्ट्राईक वर साडी....पण केली एवढी मोठी चूक !!
भाऊ भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत हवाई हल्ला केला आणि आपल्या देशात देशभक्तीची नवीन लाट आली. या लाटेचा व्यावसायिक वापर करण्यात लोक मागे तरी कसे राहतील.? बॉलिवुडने पुलवामा, अभिनंदन, एअर स्ट्राईक अशी सिनेमाची नावं रजिस्टर करून ठेवलीत, पण आज आपण एक वेगळं प्रकरण बघणार आहोत. सुरतेच्या एका व्यापाऱ्याने चक्क या सगळ्या हल्ल्याची चित्रकथा दाखवणारी कथा एका साडीवर मांडली आहे.
या व्यापाऱ्याने आपल्या सर्जिकल स्ट्राईक २ नंतर अवघ्या चार तासांत ही साडी बाजारात आणली आहे. ह्या साडीची बातमी व्हायरल झाल्यानंतर ही साडी खरेदी करण्यासाठी मोठी रांग लागली होती. आजवर या खास पॅटर्नच्या २००० साड्या विकल्या गेल्या आहेत. तुम्ही जर त्याच्या या हुशारीचं कौतुक करत असाल तर साडीला जरा लक्षपूर्वक बघा !!
मंडळी, पुलवामा हल्ल्याला कॅश करण्याच्या नादात या दुकानदाराला भारतीय सैन्यात आणि अमेरिकन सैन्यात फरक असल्याचं सुचलं नसावं बहुतेक. ह्या साडीवर चक्क अमेरिकन सैनिकांचे फोटो छापण्यात आले होते. असे एक नाही तर २ ते ३ डिझाईन्स दिसून आलेत. हे लक्षात येताच लोकांनी दुकानदाराची शाळा घेतली आहे. एका ट्विटर युझरने म्हटलंय की दुकानदाराने गुगलवर आर्मी सर्च करून समोर जे फोटो आले ते छापून टाकलेत.
नंतर छापण्यात आलेल्या नवीन साड्यांवर भारताचे जवान, मिराज २००० विमान तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचे फोटो छापण्यात आले होते. राव, सध्याच्या देशभक्तीयुक्त वातावरणात ही साडी म्हणजे एक प्रकारचं मार्केटिंग गिमिक आहे असे आम्हाला वाटतं, तुमचं काय मत आहे ??




