CCD झाली मालामाल... गुंतवणुकीतून कमावले तब्बल एवढे कोटी रुपये !!
या माणसाच्या दुकानात तुम्ही सगळेचजण कॉफी प्यायला नक्कीच गेला असाल. कॉफी काय सगळीकडेच मिळते, कोपऱ्यावरच्या टपरीपासून ते उडप्याच्या कुठल्याही हॉटेलात !! पण या दुकानात कॉफी प्यायल्यानंतर कॉफी पिणारा पुढचे ८ दिवस हेच म्हणतो की परवा CCD मध्ये बसलो होतो यार !
आता CCD म्हणजे ‘कॅफे कॉफी डे’ हे वेगळं सांगायला नको, पण आज तुम्हाला या CCD च्या मालकांची म्हणजे व्ही. जी. सिद्धार्थ यांची अशी कथा सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही CCD चे नव्हे तर व्ही. जी. सिद्धार्थचे भक्त बनाल.
चार दिवसापूर्वीच व्ही. जी. सिद्धार्थ यांनी त्यांच्या ‘माइंड ट्री’ नावाच्या एका कंपनीतली गुंतवणूक ‘लार्सन अँड टुब्रो’ला तब्बल ३,२६९ रुपयांना विकली आणि २,८५८ कोटी रुपयाचा निव्वळ नफा कमावला. पण हे एका रात्रीत घडलेलं नाही. २०१२ ते २०१९ या काळात ४३५ कोटी रुपये गुंतवून कमावलेला हा नफा आहे. आता तुम्ही म्हणाल ‘बडे बडे लोगो की बडी बडी बाते’.... पण तुम्ही सुद्धा २०१२ साली फक्त ४३,००० रुपये गुंतवले असते तर तुम्हाला देखील ३,२५,००० रुपये सहज मिळाले असते. जाउद्या, हा चान्स तुमच्या हातातून गेला. पण, अशी संधी समोर आल्यावर तुम्ही संधीचा फायदा कसा घ्यावा हे शिकण्यासाठी तरी पुढची स्टोरी वाचा.
(नंदन निलेकणी)
१९९४ साली एका पार्टीत इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक ‘नंदन निलेकणी’ इन्फोसिस बद्दल बोलत होते. तेव्हाची इन्फोसिस ही एक छोटी कंपनी होती. बोलता बोलता ते म्हणाले की ‘पुढच्या दहा वर्षात इन्फोसिसचा पसारा १०० कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचेल असे माझे स्वप्न आहे’. त्यांचं बोलणं सिद्धार्थ कान देऊन ऐकत होते. अर्थातच १०० कोटी डॉलर म्हटल्यानंतर सिद्धार्थ यांनी फारसं लक्ष दिलंच नाही. पण २००४ साल उजाडता उजाडता इन्फोसिसने १०० कोटीचा आकडा पार केला होता. व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या शब्दात सांगायचं झालं तर “त्या दिवसापासून मी नंदन निलेकणींना गुरु म्हणायला सुरुवात केली”... एकदा गुरु मानल्यावर त्यांनी दिलेला धडा न गिरवणारा शिष्य तो काय ?
सिद्धार्थ यांना आता एका संधीची गरज होती. अशाच एका इन्फोसिसची आणि त्यांना ती मिळाली.
१. ‘माईंड ट्री’ नावाच्या कंपनीत सुरुवातीच्या काळात केवळ ८७ रुपये एका शेअर मागे गुंतवून त्यांनी पहिली गुंतवणूक केली.
२. २०११ साली ‘कॅफे कॉफी डे’कडे ‘माईंड ट्री’चे २८ लाख शेअर्स होते जे ८७ रुपयांच्या हिशोबाने विकत घेतलेले होते.
३. मार्च २०१२ साली पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात करून माईंड ट्री मधला त्यांचा हिस्सा ११.२६% पर्यंत वाढवला. म्हणजे ४५ लाख शेअर्स. तेव्हा शेअर्सचा भाव होता १२२ रुपये.
४. जून २०१२ मध्ये आणखी १३,५०,००० शेअर्स घेऊन कंपनी मधला हिस्सा १४.५३% झाला.
५. २०१४ साली ‘माईंड ट्री’ला इतका मोठा नफा झाला की कंपनीने एकास एक या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आणि सिद्धार्थ यांच्या शेअर्सची संख्या एका दिवसात दुप्पट झाली.
६. दोन वर्षांनी पुन्हा एकदा एकास एक बोनस जाहीर झाला. यावेळी पण सिद्धार्थ यांचे शेअर्स दुप्पट झाले.
७. २०१९ मध्ये हे शेअर्स त्यांनी विकले तेव्हा त्यांचा कंपनीतला एकूण हिस्सा होता २०.४१% आणि एकूण नफा २,८५८ कोटी होता.
हे एवढे सगळे पैसे घेऊन जाणार कुठे. असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगून टाकतो. आजच्या तारखेस ‘कॅफे कॉफी डे’ वरती ३,३२३ कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. हे कर्ज निस्तरण्यातच हा नफा वापरला जाणार आहे. थोडक्यात कॅफे कॉफी डे कर्जमुक्त होणार आहे.
वेळीच केलेली गुंतवणूक कर्ज फेडण्यासाठी कशी वापरता येते हे इतके जरी आपण शिकलो तरी आज तुम्ही आम्हाला CCD मध्ये न्यायला हरकत नाही.




