वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !!

मंडळी, तुम्ही जर कधी भूतानला गेलात तर तिथल्या लोकांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल न विसरता विचारा. पैज लावून सांगू शकतो तुम्हाला उत्तर मिळणार नाही. कारण भूतान मध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच नाहीय.
नाही राव, हा धर्माचा मामला नाहीय. भूतानच्या जनतेत आपल्या वाढदिवसाबद्दल एक वेगळं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान असं की “आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण किती आनंदी आयुष्य जगत आहोत हे जास्त महत्वाचं आहे”. आहे की नाही हटके ? तुम्हाला आनंद सिनेमाची आठवण होऊ शकते.
“बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं”

मंडळी, आजही भूतान मध्ये जन्मतारीख लक्षात नसल्याने मोठ्या प्रमाणात लोक १ जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करतात. ही झाली जुनी परंपरा. भूतानची नवी पिढी आता आपला वाढदिवस लक्षात ठेवत आहे, पण वृद्ध व्यक्ती आजही जुनी परंपरा पाळतात.
मंडळी, १ जानेवारीला वाढदिवस साजरा करणारं भूतान हे एकमेव राष्ट्र नाही. अफगाणिस्तान मध्ये पण हीच पद्धत आहे, पण इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे.

१९८० पासून अफगाणिस्तानात यादवी युद्धाला सुरुवात झाली. या दरम्यान जी मुलं जन्मली त्यांच्या जन्माची तारीख सरकारने नोंदवली नाही, त्यांच्या आईवडिलांनाही त्यावेळी जन्म तारीख लक्षात ठेवण्याची जरुरी वाटली नाही. पुढे जेव्हा युद्ध थांबून स्थिरता आली तेव्हा काम मिळवण्यासाठी जन्म तारीख गरजेची भासू लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात अफगाणी लोकांनी १ जानेवारीला जन्म तारीख म्हणून स्वीकारलं.
तर मंडळी, वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी पद्धत तुम्हाला कशी वाटली ? आम्हाला जरूर कळवा !!