जावाची 'चासिस' आली बाजारात...लागली तब्बल एवढ्या लाखांची बोली !!

मंडळी, आजकाल इतक्या मोटारसायकल्स लाँच होत असतात की त्यातली कोणती गाडी घ्यावी असा प्रश्न पडतो. अगदी मोपेडपासून ते स्कुटरपर्यंत आणि स्पोर्ट बाईकपासून ते क्रूझर बाईक्सपर्यंत रोज नवनवीन मॉडेल्स येतच आहेत. काही गाड्या एकदम पॉप्युलर होतात, काही खपतात, तर काही बाजारात एकदमच झोपतात!!
पण काही गाड्या वर्षानुवर्षे, नव्हे दशकानुदशके लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांची स्पर्धा बाजारातल्या इतर बाईक्स सोबत नाहीच आहे! त्यांचा क्लासच वेगळा आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट आणि जावा या दोन कंपन्यांच्या गाड्या बघा. नेहमीच लोकांच्या आवडत्या!! अतिशय मजबूत, दणकट आणि भारतातल्या कुठल्याही रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या बनवणे या कंपन्यांचे वैशिष्ट्य आहे. मध्यंतरीच्या काळात हिरो होंडा, बजाज, टिव्हीएस वगैरे कंपन्यांनी हलक्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स बाजारात आणल्या होत्या, पण खरे बाईकलव्हर्स मात्र बुलेट आणि जावा यांनाच पसंती देतात हे मात्र तितकंच सत्य आहे.
मध्यंतरी नव्या बाईक्सच्या स्पर्धेत या आयकॉनिक गाड्या थोड्याशा मागे पडल्या होत्या. पण आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी आता जबरदस्त कमबॅक केलंय. बुलेट गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर राज्य करत आहेच, पण आता जावानेद्धा दणक्यात पुनरागमन केले आहे. नुकतंच एका इव्हेंटमध्ये जावा चासिस नंबर्सचा लिलाव झाला. जावाची शोरूम किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात असली तरी इथे मात्र खास चासिस नंबर्ससाठी लिलाव होता. आणि अशा लिलावात जावा शौकीन पैशांची काळजी करत नसतात हे परत सिद्ध झाले!
चासिस नंबर 001 ला लिलावात किती किंमत मिळाली माहीत आहे? तब्बल 45 लाख! म्हणजेच एका बाईकने जवळपास अर्धा कोटी कमावले! शौक बडी चीज है भाई…
पण थांबा, आणखी काही सांगायचं आहे. या इव्हेंटमध्ये अश्या बऱ्याच चासिस नंबर्सची विक्री झाली आणि एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये जमले. आता तुम्ही म्हणाल की हा तर कंपनीचा मोठाच फायदा झाला… पण नाही मंडळी. ही सर्व रक्कम जावा कंपनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. अभिमान वाटावं असंच आहे ना हे?
चला एक नजर टाकूया कुठल्या विशिष्ट चासिस नंबर्सचा लिलाव केला गेला आणि त्यांना किती रक्कम मिळाली…
001: 45 लाख
017: 17 लाख
005: 11.75 लाख
024: 10.5 लाख
003: 10.25 लाख
099: 7.5 लाख
052: 7.25 लाख
013: 6.25 लाख
018: 6 लाख
026: 6 लाख
011: 5.5 लाख
077: 5.25 लाख
007: 5 लाख
या इव्हेंटमध्ये जावाची स्पेशल सिग्नेचर एडिशन बाईक सादर करण्यात आली नाही. खरंतर या बाईकबद्दलच लोकांमध्ये जाम उत्सुकता होती. असे म्हणतात की या सिग्नेचर एडिशन असणाऱ्या जावा बाईकच्या इंधन टाकीवर तिरंगा असणार आहे आणि सोबतच बाईकच्या मालकाचे नाव सुद्धा कंपनीद्वारे लिहून देण्यात येणार आहे.
या लिलावात विक्री झालेल्या बाईक्सना जावाने एक स्पेशल ऑफर देऊ केली आहे. त्यात 42 महिन्यांपर्यंत फ्री सर्व्हिस आणि आणखी बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत.
आता थोडंसं जावा बाईकबाबत जाणून घेऊया…
जावा स्टँडर्ड आणि जावा 42 अशी दोन मॉडेल्स कंपनीने सध्या बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. तसेच जावा पेराक नावाचे आणखी एक मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. जावा बाईक्स या 293 cc असून 27.37 PS पॉवर देतात. यामध्ये 6 स्पीडचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे आणि त्या पेट्रोलवर चालतात. सध्या जावा बाईक्सना प्रचंड मागणी असून ज्यांनी त्या बुक केल्या आहेत त्यांना डिलिव्हरीसाठी आणखी सहा महिने वाट बघावी लागेल. त्यामुळे कंपनी सध्या जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
मंडळी, तुम्हालाही जावा बाईक हवी असेल तर आत्ताच बुक करून टाका!
लेखक : अनुप कुलकर्णी