शनिवार स्पेशल : या सुट्टीत काय वाचायचं? अटकमटक.कॉम असताना हा प्रश्नच पडणार नाही...

तुम्ही लहान मुलांचे पालक आहात का? तुम्हालाही मुलं आणि वाचन यांची गट्टी जमावी असं वाटतं ना? तसं खरंतर प्रत्येकाला वाटतं. पण ते जमायचं कसं? त्यात दुसरा प्रश्न म्हणजे मुलांनी नक्की काय वाचावं? मुलं सुट्टीत सतत टीव्ही, मोबाईलला चिकटलेली असतात, ती वाचनाकडे वळणार कशी? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात. आता सुट्ट्या सुरू होताहेत, तर बोभाटाने विचार केला की या विषयात काम करणाऱ्या कोणाला तरी गाठून याची उत्तरं मिळवायची. म्हणून आम्ही गाठलं पुण्याहून मुलांसाठी सातत्याने साहित्याची निर्मिती व्हावी म्हणून एक वेबसाईट सुरू करणाऱ्या आमच्या मित्राला. तो मित्र आहे अटकमटक.कॉम साईटचा मॉनिटर ऋषिकेश. तर आज वाचूयात त्यांनी दिलेली उत्तरं आणि ही साईट का सुरू केली याबद्दल त्यांची मतं..

बोभाटा: मुलं वाचत नाहीत ही तक्रार सतत ऐकू येते त्याचं करावं काय?
ऋषिकेश (अटकमटक.कॉम तर्फे): कोणत्याही मुलाला अक्षर ओळख झाल्यावर ती ओळख पडताळून पाहायची असते. तुम्ही बघितलं असेल की नवीन वाचायला शिकलेलं मूल दिसेल ते वाचायचा प्रयत्न करतं. हा छंद एकदम भारी असतो हं. आधी दुकानांच्या पाट्या, मग घरातला पेपर, गाड्यांवर लिहिलेले शब्द असं वाचन सुरू होतं. मात्र या सुट्या शब्दांतून फक्त मुलाला वाचता येतं. पण या अशा नुसतं अक्षरं आणि शब्दांच्या पुढे जाऊन काहीतरी वाचण्याचा प्रवास आणि त्यासाठी लागणारं साहित्य - म्हणजेच बालसाहित्य - याची गरज खूप मोठी आहे. अशावेळेला पुस्तकं त्या मुलाच्या आयुष्यात लहानपणापासून असतील तर मूल पुस्तकांकडे आपोआप वळतं. त्यामुळे लहानपणापासून - म्हणजे मूल वाचू शकत नसल्यापासून - मुलांसमोर स्वत: वाचत रहाणं आणि मुलांना पुस्तकांतून वाचून दाखवणं दोन्ही गरजेचं आहे. त्यामुळे मुलांनी वाचावं असं वाटत असेल तर मुलांसमोर वाचनाचे अनेक पर्याय असण्याला आणि वाचून आनंद मिळतो हे त्यांना 'दिसण्याला' दुसरा पर्याय नाही. अर्थात ही पहिली पायरी झाली.

बोभाटा: पण कित्येकदा घरात अनेकांना वाचनाची आवड असूनही किंवा खूप पुस्तकं असूनही मुलं वाचत नाहीत, कंटाळा करतात त्याचं काय?
अटकमटक: मुलांना वाचून दाखवणं किंवा त्यांच्यासमोर स्वत आनंदानं वाचत बसणं ही फक्त पहिली पायरी झाली. त्यापुढे पालक वाचून दाखवतात किंवा वाचायला देतात त्या गोष्टींचा दर्जा आणि कालसुसंगतपणा म्हणजे काळाच्या बरोबर चालणारं साहित्य यांचं महत्त्वही तितकंच आहे. इसापनीती, पंचतंत्र अशा गोष्टी असोत किंवा संस्कार या नावांखाली विकले जाणारे उपदेशाचे डोस असोत, पालकांना आपण मुलांना काहीतरी दर्जेदार देतोय या समाधानापलीकडे ही पुस्तकं काहीही करत नाहीत. किंबहुना, आताच्या काळात मुलांसमोर माहिती, प्रतिमा, विषय यांचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की या अशा लेखनामुळे मुलं 'बोअर' होत असतील तर तो त्यांचा दोष नाही. त्यात त्या कथा बऱ्यापैकी हिंसक, हे मुलींचंच आणि हे मुलांचंच असे कप्पे पाडणाऱ्या, शब्दबंबाळ असतात. काही मोजके लेखक सोडले तर मुलांना आवडेल, रिलेट करता येईल आणि त्यांना त्यात रस वाटेल असं लेखन मराठीतून फारच कमी घडताना दिसतं.
चांगलं लेखन मुलांच्या वाचनाच्या भुकेला योग्य तो खुराक देतं आणि मग त्यात रस निर्माण होऊन वाचनाची गोडी लागते. त्यामुळे, या पायरीवर, आपल्या अपत्याची आवड लक्षात घेऊन त्याला आवडेल असं साहित्य शोधणं आणि त्याचबरोबर दर्जेदार साहित्याचा खुराक मुलांना सतत कसा मिळेल हे बघणं पालकांचं महत्त्वाचं काम बनतं. त्याचबरोबर हे साहित्य मुलांना नक्की काय देतंय याचाही विचार करावा लागतो.
याच विचारांतून जेव्हा मी अटकमटक.कॉम सुरू केली तेव्हा मुलांना कालसुसंगत, रंजक, अमकं मुलांचंच आणि ढमकं मुलींचंच असं न म्हणता दोघांसाठीही उपयोगी असं आणि मुलांच्या मेंदूला नवीन काहीतरी देणारं साहित्य देणं, आणि ते सातत्याने देणं हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. मीही एक बाबा आहे, माझी मुलगी मराठी शाळेत जाते. तेव्हा तिची वाचनभूक भागवणं माझं काम ठरतं.

बोभाटा: अटकमटक.कॉम पाहिली तर तिथे बोली भाषेतलंही साहित्यही दिसतं.
अटकमटक: होय. मुळात आपल्याकडे बालसाहित्य म्हणून जे काही लिहिलं जातं, ते बहुतेकदा अगदी मुंबई-पुण्याच्या प्रमाणभाषेत लिहिलेलं, शहरांत नाहीतर थेट जंगलात फुलणारं, शब्दबंबाळ साहित्य असतं. त्यामुळे त्या कथा ज्या भागात घडतात तो परिसर, वस्त्रं, अन्न आणि त्याच बरोबर भाषा यापैकी काहीच इतर भागांतील्या मुलांना आपलं आहे असं वाटतच नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या लेखकांकडून आम्ही त्या-त्या भाषेत संवाद असणाऱ्या कथांवर काम करत असतो. तशा अनेक कथा तुम्हाला अटकमटक.कॉमवर मिळतील. अगदी खास मराठमोळ्या बोलींचे ठसकेबाज संवाद, वेगवेगळ्या परिसरात घडणारे अस्सल प्रसंग, महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या मुलांना पुन्हा वाचनाशी जोडतील असं वाटतं. याचबरोबर थरारक विषयांपासून ते पादण्यासारख्या मुलांच्या लाडक्या विषयापर्यंत अनेक गोष्टींना स्पर्श करणारे लेखन त्यांना झेपेल, आवडेल अशा भाषेत इथे आल्याने, अनेक जण या साईटला भेट देत असतात.

बोभाटा: मुलांसाठी लेखन म्हटलं की चित्रं फार महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही जालावरून चित्रं घेता का?
अटकमटक: नाही. मुळात मुलांना कार्टून वगैरेच्या निमित्ताने ॲनिमेटेड/कंप्युटराईज्ड चित्रांचा अतिपरिचय आहे. जालावरही अशाच प्रकारची चित्रे असतात. शिवाय त्याच्या प्रताधिकाराचा - म्हणजे कॉपीराईटचा - पत्ता नसतो. मुलांनी वेगवेगळ्या चित्रकारांची वेगवेगळ्या शैलींतली चित्रे या साईटवर बघावी असं सुरवातीपासूनच डोक्यात होतं. इथे बहुतांश लेखनासोबत येणारी चित्र वेगवेगळ्या चित्रकारांकडून काढून घेतली आहेत. साईटवरील काही लेखनासाठी लागणारी छायाचित्रेही छायाचित्रकारांच्या परवानगीविना कधीच प्रसिद्ध करत नाही. एकदा तर प्रयोग म्हणून एका शाळेत पाचवीच्या वर्गाला एक गोष्ट सांगून त्यांच्याकडून त्यावर आधारीत चित्रं काढून ती सगळी चित्र प्रकाशित केली आहेत.

बोभाटा: तुम्ही इतकं साहित्य जमवता, तर पुस्तक का नाही काढत? मुलांना मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाचायला देणं चांगलं का?
अटकमटक: मुलांना खूपवेळ टक लावून बघायला भरीस पाडेल अशा प्रकारच्या गोष्टी कोणत्याही स्क्रीनवर असल्या तर डोळ्यांना त्रास होतो हे खरंच आहे. मात्र मोबाईल किंवा लॅपटॉप हे आजच्या काळातलं सत्य आहे. घराघरात पोचलेलं हे माध्यम आहे. त्याचा वापर आपण कसा करतो त्यावर ते किती चांगलं किंवा वाईट ठरेल. अनेक कारणांनी मोबाईल अगदी डेटासह खेडोपाडी पोचला आहे. त्यामुळे इथे येणारं साहित्य तेथील पालकही कोणत्याही खर्चाशिवाय मुलांना वाचायला देऊ शकतात. कितीतरी गावांत वाचनालये नाहीत मात्र मोबाईल जरूर आहे. छापील पुस्तकांना माणसं, गाड्या-घोडे, वेळ आणि पैसा हे सगळं प्रचंड लागतं. हे सगळं करण्यात वेळ दवडण्यापेक्षा मी माझा वेळ दर्जेदार साहित्य निर्माण करण्यामागे - आणि तेही लोकांच्या सहभागातून निर्माण करण्यात - घालवणं मला अधिक आवडेल.

या निमित्ताने मी बोभाटाच्या वाचकांना आवाहन करेन की आमची ही चळवळ गावोगावी पोचवायला मदत करा. आमच्या या साईटला भेट द्या, त्याबद्दलची माहिती तुमच्या नातेवाइकांच्या, शाळेच्या, मित्रांच्या ग्रुपवर जरूर द्या. आमचं फेसबुक पेज आहे, त्याला लाइक करा त्याचबरोबर आमचा हा व्हॉट्सॲप ग्रुप आहे तोही जॉईन करा. चांगली पुस्तकं निर्माण होतील तेव्हा होतील, तोवर येत्या सुट्टीत मुलांना दर काही दिवसांनी काहीतरी वाचनीय/प्रेक्षणीय साहित्य देणारा हा बालसाहित्याचा रतीब जरूर लावा.

बोभाटा: आपल्या मुलांना सातत्याने बालसाहित्याचा आनंद - आणि तोही विनामूल्य - मिळणार असेल तर आमचे वाचक साईटला नक्की भेट देतील आणि तुमचे फेसबुक पेज लाइक करतील याची खात्री आहे. तुमच्या पुढल्या वाटचालीला शुभेच्छा!
अटकमटक: आभार!
वेबसाईटची लिंक: http://www.atakmatak.com/
फेसबुक पेज: https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%95-754178391582917/
व्हॉट्स ॲप रीड ओन्ली ग्रूप: https://chat.whatsapp.com/invite/IHDWvPoLd3mA3VlacbrddS