या व्यक्तीने केलंय भारतातलं पाहिलं मतदान....मतदानापूर्वीच हे मतदान कसं पार पडलं ??

भारतात १७ वी लोकसभा निवडणूक होणार आहे. ११ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. म्हणजे आजपासून ३ दिवसांनी, पण भारतातलं पाहिलं मतदान त्यापूर्वीच पार पडलेलं आहे. हे मतदान केलंय एका सैनिकाने.
मतदान सुरु होण्यापूर्वीच हे मतदान कसं झालं ? चला समजून घेऊया !!
भारत-तिबेट सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक सुधाकर नटराजन हे १७ व्या लोकसभेसाठी मतदान करणारे पहिले मतदार ठरले आहेत. त्यांनी शुक्रवारी ‘सर्व्हिस वोटर’ म्हणून पहिलं मत दिलं.
मंडळी, हे मतदान अरुणाचल प्रदेशच्या लोहितपूर भागात पार पडलं. या भागाजवळून तिबेटची सीमा जाते. या भागात तैनात सर्व जवानांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर मतपत्रिका देशातल्या वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आली.
आता जाणून घेऊया “सर्व्हिस वोटर” म्हणजे काय ?
सर्व्हिस वोटर म्हणजे सशस्त्र दलातील मतदाता. सैन्यातील व्यक्तींचं मतदान एका वेगळ्या पद्धतीने पार पडतं. १९५० च्या आर्मी कायद्याप्रमाणे सैन्यदलातील व्यक्ती पोस्टाद्वारे आपलं मत पाठवू शकते. म्हणजे सैन्यातील व्यक्तीची ज्या ठिकाणी पोस्टिंग झाली आहे तिथे मतदान केलं जातं आणि त्या मतपत्रिका नंतर त्यांच्या मतदारसंघाकडे पाठवल्या जातात. EVM मशीनच्या जमान्यात आजही हे मतदान मतपत्रिकेनेच पार पडतं. जेव्हा मतमोजणीची वेळ येते तेव्हा या मतपत्रिका सर्वात आधी मोजल्या जातात. अशा प्रकारे मतदान करणाऱ्या व्यक्तीस “Classified Service Voter” म्हणतात.
मंडळी, यावर्षीच्या मतदानात इतिहासातील सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स रजिस्टर झाले आहेत. जवळजवळ ३० लाख सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांची सर्व्हिस वोटर म्हणून नाव नोंदणी झाली आहे.