टिक-टॉक बंद झालं ? नक्की काय आहे भानगड ??

मंडळी, तुम्हाला म्युझिकली आठवतोय का ? मुलं मुलींच्या वेशात नाचतात म्हणून हे अॅप प्रसिद्ध झालं होतं. म्युझिकली आता इतिहास जमा झालं आहे, पण त्याची सवय काही सुटलेली नाही. म्हणून तर जेव्हा ‘टिक-टॉक’ आलं तेव्हा लोकांच्या उड्या पडल्या. पाहता पाहता टिक-टॉकने धुमाकूळ घातला. आज टिक-टॉक प्ले स्टोरवरून डाऊनलोड केला जाणारा तिसरा सर्वाधिक प्रसिद्ध अॅप आहे.
टिक-टॉकचे काही मिनिटाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर नेहमीच फिरत असतात. हे इथवर मर्यादित राहिलं असतं तर ठीक होतं राव, पण हे आता मर्यादेच्या पलीकडे गेलं आहे. असं आम्ही नाही मद्रास उच्च न्यायालयातली याचिका म्हणत आहे. त्याप्रमाणे खटला पण चालवण्यात येत आहे.
याच खटल्याच्या संदर्भात आज नुकतीच बातमी आली की टिक-टॉक आता भारतातून हद्दपार होणार आहे. या बातमीने टिक-टॉक प्रेमींच्या पाया खालची जमीन सरकली आहे...पण थांबा यातलं तथ्य जाणून घ्या.
नेमकं प्रकरण काय आहे ? चला समजून घेऊया...
(मद्रास न्यायालय)
मद्रास न्यायालयाच्या मदुराई शाखेत टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. टिक-टॉकवरून मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ पसरवले जात आहेत असा आरोप करण्यात आला होता. यावर सुनावणी करताना मद्रास न्यायालयाने अॅपवर बंदी आणली होती.
आता मद्रास न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आवाहन देण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टाने मद्रास न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. म्हणजे अॅपवर बंदी येणार.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने गुगल आणि अॅपलला टिक-टॉक अॅप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता टिक-टॉक इन्स्टॉल करता येणार नाही. आधीपासून ज्यांच्याकडे टिक-टॉक आहे त्यांनाच फक्त अॅपचा वापर करता येईल.
टिक-टॉकच्या चाहत्यांनो घाबरू नका !! या संदर्भातील पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी आशा सोडण्याचं कारण नाही.
मंडळी, टिक-टॉकवरून अश्लील व्हिडीओ खरोखर पसरवले जात आहेत का ? तर, त्याचं काय आहे ना टिक-टॉकने स्वतः हे मान्य केलंय. त्यांनी तर हेही सांगितलंय की आम्ही तब्बल ६० लाख पेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ काढून टाकलेत.
तर मंडळी, टिक-टॉक वर बंदी आली पाहिजे का ? तुम्हाला काय वाटतं ?? होऊ दे चर्चा !!