computer

चिंब पावसांत हे पदार्थ खायलाच हवेत....

आला पावसाळा आणि तब्येती सांभाळा असं कितीही म्हटलं तरी पावसाळ्यातले पदार्थ नुसते आठवले तरी तोंडाला पाणी सुटतं. जिभेवर ताबा राहात नाही आणि पोट भरलं तरी हे सगळे पदार्थ खाऊन मन भरत नाही.

आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे अशा पावसाळ्यात खायलाच हव्य अशा पदार्थांची यादी. तुम्हाला कुणते पदार्थ आवडतात ते ही कमेंट्समध्ये कळवाच.

वाफाळता चहा..

अगदीच काही चमचमीत आणि चटपटीत खायला नसलं तरी आलं किंवा गवती चहा घातलेला वाफाळता गरमागरम चहाचा कप हाती असणं यापरतं पावसाळ्यातलं सुख ते काही नाही. 

झणझणीत वडापाव

मुंबई-पुण्याला वर्षभर लोक वडापाव खात असले तरी पावसाळ्यातल्या वडापावची मजा काही औरच आहे. सोबत तळलेली मिरची, वडापावचा चुरा आणि लालभडक चटणी!! अहाहा..

कांदाभजी

पावसाळ्यात घरी किमान एकदातरी कांदाभजी होतातच होतात. पण कांदाभजी हे चांगलं पेशन्सचं काम आहे. आधी कांदा कापून ठेवा, त्यात मीठ घालून कांद्याला पाणी सुटेल याची वाट पाहा आणि मग बेसन कालवून भजी करा.  खाताना मात्र  हे वाट पाहाणं कारणी लागल्याचं मस्त फीलिंग येतं.. 

सूप

चायनीजच्या गाडीवर जाऊन मनचाव सूप पिण्याची मजा काही औरच. थोडीशी काळी मिरी घातलेलं गरमागरम सूप छान घसा पण शेकतं आणि पावसाळ्यात तरतरीही देतं.. 

मक्याचं कणीस

हातगाडीवरती ठेवलेली कणसं, छोटी शेगडी आणि त्या निखार्‍यांना फुलवत कणसं भाजून देणारा मनुष्य. पावसाळ्याच्या सुमारास दृष्टीस पडणारं हमखास दृश्य. आताशा तर साधी कणसं मिळतच नाहीत, सगळीकडे स्वीटकॉर्नच मिळतात. मग ही कणसं गॅसवर किंवा घरच्या घरी बार्बेक्यूवर भाजा, त्याला एखाद्या लिंबाच्या फोडीने तिखट-मीठ लावा, आणि स्वर्गसुखाचा आनंद लुटा..

सबस्क्राईब करा

* indicates required