computer

निवडणुकीत मतांची बरोबरी झाली तर असा घेतात निर्णय!!

१७ व्या लोकसभा निवडणुका १९ मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर २३ मे ला निकाल जाहीर होतील. ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो जिंकणार हे साधं गणित आहे, पण समजा दोन उमेदवारांमध्ये टाय झाला असेल तर ?? अशावेळी कशाप्रकारे निर्णय घेण्यात येतो माहित आहे का ??

मंडळी, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. दोन उमेदवारांना समान समान मतं मिळाली असतील तर जिंकणार कोण ? राव, इथे नशीब हा भाग महत्वाचा ठरतो. कारण अशावेळी निवडणूक आयोगाकडून नाणे फेक करून किंवा लॉटरीद्वारे विजेता ठरवला जातो !!

लोकसभा सारख्या महत्वाच्या निवडणुकीसाठी या प्रकारे विजेता घोषित करणं विचित्र वाटतं. नाही का ? पण, तसा कायदाच आहे राव.

१९५१च्या ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियम’ कायद्यातील कलम १०२ नुसार दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली असतील तर चिठ्ठ्या (Lot) टाकुन निर्णय घेण्यात यावा. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला एक मत जास्तीचे मिळाले असे मानण्यात यावे. हा संपूर्ण कायदा तुम्ही खालील लिंक वर पाहू शकता.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१

मंडळी, फक्त लॉटरीच्याच सहाय्याने निर्णय घेण्यात येतो असं नाही. काहीवेळा नाणेफेक करून निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीचच उदाहरण घ्या, आसामच्या पंचायत निवडणुकीत ६ जागांवर “टाय” झाला होता. त्यावेळी नाणेफेक करून निर्णय घेण्यात आला.

२०१७ साली मथुरा वृंदावन महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७४ मत मिळवून दोघांमध्ये टाय झाला होता. त्यावेळी अशाच प्रकारे निर्णय घेण्यात आला होता.

२०१७ साली झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत असाच प्रकार घडला होता. निर्णय घेण्यासाठी कायद्याप्रमाणे लॉटरीचा मार्ग निवडण्यात आला.

समजा तिघांना समान समान मतं मिळाली असतील तर ?

मंडळी, हे सहज शक्य नाही, पण असंही होऊ शकतं. याबद्दल कायद्यात काहीही तरतूद केलेली नाही. जर तिघांमध्ये टाय झाला तर त्यावेळी कोणता मार्ग निवडला जाईल ते बघण्यासारखं असेल.

मंडळी, एवढा मोठा निर्णय लॉटरी आणि टॉस करून घेण्यात यावा का ? तुम्हाला काय वाटतं ??

 

आणखी वाचा :

स्वच्छ निवडणूक अभियानाचा जनक - ‘टी.एन. शेषन’ !! त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती तुम्हांला नक्कीच माहित नसेल..

सबस्क्राईब करा

* indicates required