ऑस्कर प्रिटोरियस, मेसी निघाले जेलमध्ये; जगातल्या या सेलेब्रिटींवरती चालले आहेत खटले..
सेलेब्रिटी झाली तरी ती माणसंच. त्यांच्या हातूनही कधी गुन्हे होतात. त्यातून ते कधी पैशांच्या जोरावर सुटतात, तर कधी त्यांनाही शिक्षा होते. ’उशीरा मिळालेला न्यायदेखील अन्यायच असतो’ हे ही तितकंच खरं आहे.
आज बोभाटा टीम घेऊन आलीय काही सेलेब्रिटींच्या गुन्ह्यांची आणि त्यांना झालेल्या किंवा न झालेल्या शिक्षांची.
सलमान खान
हा विषय निघाला तर भारतीयांना आठवणारं पहिल्या काही नावांत सलमानचं नांव नक्की असेल. पुराव्याअभावी तो सुटला असला तरी त्याने गुन्हा -खरंतर गुन्हे- केलाय याबाबतीत कुणाच्याही मनात शंका नसेल. तरीही ’भाई’च्या बाजूने वाद घालणारे लोकही कमी नाहीत. हा खटला या आठवड्यात पुन्हा एकदा सुनावणीस आल्याच्या बातम्या आहेत.
संजय दत्त
भारतात संजय दत्त हा गुन्ह्यासाठी शिक्षा भोगलेल्या काही मोजक्या सेलेब्रिटींपैकी आहे. ती शिक्षाही त्याने फर्लोच्या रजा वापरून बरीच जेलबाहेर भोगली. विशेष म्हणजे त्याने एका सिनेमात एके-४७ बाळगणार्या सेलेब्रिटीच्या विरोधात असलेल्या पोलिसाची की वकिलाची भूमिका केली होती. आहे की नाही गंमत!!
नवज्योतसिंग सिद्धू
आपला ’ठोको ताली’फेम लाफ्टर शोजचा जज्ज नवज्योतसिंग सिद्धूवरती गुरनाम सिंग नावाच्या माणसाला मारहाण केल्याबद्दल खटला चालला होता. गुरनामसिंगाचा मृत्यू हार्ट ऍटॅकने झाला होता, पण मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शेरी पाजीला २००६मध्ये तीन वर्षांच्या कारावसाची शिक्षा झाली होती. पुढे सुप्रीम कोर्टात अपील करून तो सुटला आणि २००७मध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती.
ओ जे सिंपसन
अमेरिकेत चाललेया सेलेब्रिटींच्या खटल्यांपैकी काही मोठ्या खटल्यांपैकी हा एक. त्यात सिंपसनने खून केला की नाही हे शेवटपर्यंत सिद्ध झाले नाही. पण त्याने इतर नको ते उद्योगही बरेच केलेले दिसतात, त्यामुळे २०१७पर्यंत त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे.
माईक टायसन
याने खेळताना प्रतिस्पर्ध्याच्या कानाचा चावाच घेतला. इतकेच नव्हे तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही सिद्ध झाला होता. या बलात्कारामुळे त्याला सहा वर्षांची शिक्षा झाली.
मायकल जॅक्सन
लहान मुलांच्या लैंगिग शोषणाविरूद्ध मायकेल जॅक्सनवरती खटला चालला. एकून १४ दोषारोपांखाली हा खटला चालला पण या सर्व आरोपांतून तो निर्दोष सुटला..
ऑस्कर प्रिटोरियस
त्याच्या प्रेयसीच्या खुनाबद्दल त्याला याच आठवड्यात ६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा जाहीर झालीय.
मेस्सी
याच आठवड्यात करचुकवेगिरीच्या घोटाळ्याच्या आरोपावरून मेस्सी आणि त्याच्या बाबांना २१ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झालीय.




