अवघ्या ११ वर्षाच्या मुलीने प्लूटो ग्रहाला नाव दिलं होतं ?

मंडळी, आपल्याकडे कोणताही नवीन शोध लागला की त्याचं नाव काय ठेवायचं याच्या मोठमोठ्या चर्चा होतात. तेही बरोबरच आहे म्हणा! एखाद्या भन्नाट शोधाला तेवढंच भन्नाट नाव पण हवं ना भाऊ!! त्यामुळे ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यम्|’ ह्या न्यायाने १९३० साली शोध लागलेल्या ‘प्लुटो’ ग्रहाचं नाव एका ११ वर्षाच्या मुलीच्या सांगण्यावरून ठेवण्यात आलं होतं!! आज जरी आपण ‘प्लुटो’ला ग्रह मानत नसलो, तरी लहान मुलीनं एका ग्रहाचं नामकरण करणं म्हणजे अफाटच!! त्यामुळे ह्या घटनेविषयी अधिक माहिती घेऊया आजच्या लेखातून.....
आपल्या सौरमालेतील सर्व ग्रहांची इंग्रजी नावं ही रोमन देवदेवतांवरून घेतलेली आहेत. काही शास्त्रज्ञांनी आपली स्वत:ची किंवा बाकीच्यांची नावं नवीन शोधलेल्या ग्रहांना चिकटवण्याचा प्रयत्न करुन पाहिला, पण ती नावं फारशी प्रचलित झाली नाहीत. उदा. ज्याने नेपच्यून ग्रह शोधला त्या ल व्हेरिए ह्या संशोधकाने स्वत:चं नाव देण्याचा यत्न केला होता. तसंच युरेनस ग्रहाचा शोध लावणारा विल्यम हर्षेलने युरेनसचं नाव किंग जॉर्ज तिसरा ह्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ जॉर्जियन प्लॅनेट असं ठेवलं होतं. पण ते नावसुद्धा फार वापरलं गेलं नाही.
१८ फेब्रुवारी १९३० रोजी क्लाईड टॉम्बाघ ह्या शास्त्रज्ञाने ‘प्लुटो’ ग्रहाचा शोध लावला आणि परत एकदा जगातली सगळी डोकी एखादं सॉलिड नाव शोधण्यासाठी धडपडू लागली. काहीजणांना रोमन देवदेवतांवरून घेतलेली नावं ठेवण्याची प्रथा कायम ठेवायची होती, तर काहीजणांना ही पद्धत मोडायची होती. बऱ्याच सुचवण्या आल्या होत्या आणि येतच होत्या. पण अल्पावधीतच सगळ्या नावांना मागे टाकून ‘प्लुटो’ हे नाव झपाझप पुढे आलं आणि लवकरच फेमससुद्धा झालं...
(क्लाईड टॉम्बाघ)
झालं काय, ऑक्सफर्डमधे राहणारी ११ वर्षाची चिमुरडी व्हेनेशिया बर्नी ही ग्रीक पुराणातील गुन्हेगारीचा देव असलेल्या ‘प्लुटो’मुळे भलतीच प्रभावित झाली होती. तिनं हे नाव तिच्या आजोबांना, फॉल्कनर मॅडन जे ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीमधे लायब्ररियन होते, त्यांना सांगितलं. त्यांनी ते ॲस्ट्रोनॉमीचे प्रोफेसर हर्बट टर्नर यांना कळवलं व प्रोफेसर टर्नर यांनी लॉवेल वेधशाळेला कळवलं. हळूहळू एकेक टप्पा पार करत प्लुटो हे नाव फायनलला पोहोचलं.

फायनलला मिनर्व्हा, क्रोनस आणि प्लुटो ह्या तीन नावांमधे लढत झाली. पण मिनर्व्हा हे नाव आधीच एका उपग्रहाला दिलं असल्यानं ते बाद ठरवण्यात आलं. तसंच क्रोनस हे नाव ज्यानं सुचवलं, तो लॉवेल वेधशाळेतलाच एक बडतर्फ झालेला शास्त्रज्ञ होता. त्यामुळे निवड समितीच्या सदस्यांचा त्याच्यावर रोष होताच. त्यामुळे तोसुद्धा रिंगणाच्या बाहेर फेकला गेला आणि प्लुटोला निर्विवाद विजय मिळाला. नातीच्या या यशावर खूष होऊन तिच्या आजोबांनी तिला ५ डॉलर्स म्हणजे आताचे जवळपास ४५० डॉलर्स भेट म्हणून दिले होते!! पुढेपुढे तर हे नाव एवढं प्रसिद्ध झालं की वॉल्ट डिस्नेच्या प्रसिद्ध कुत्र्याचं नावसुद्धा ह्या ग्रहाच्या नावावरून प्लुटो ठेवण्यात आलं!!! आजही ही कथा वाचून ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ह्या विधानाची सत्यता आपल्याला पटते!!
आमचा हा लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा!!