अवघ्या १० मिनिटांत निकाल सुनावलेल्या या केसमधले सगळे लोक एका वर्षाच्या आत मेले??

ठिकाण: दिल्ली. दिवस होता २४ मे १९७१. दिल्लीचे राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते त्यामुळे बातम्यांचा तुडवडा कधीच नसतो. पण त्या दिवशी जास्त काही विशेष घडत नसल्याने सगळ्या वर्तमानपत्रांचे रिपोर्टर हे निवांत आपापल्या ऑफिसमध्ये बसून टिवल्याबावल्या करत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की थोड्याच वेळात एका बातमीमुळे दिल्लीच काय, तर संपूर्ण भारत देशात खळबळ माजणार आहे…
....आणि फोन वाजलाच! सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पार्लमेंट स्ट्रीट, दिल्ली येथे तब्बल ६० लाखांचा दरोडा पडला होता!
मंडळी, आजच्या तारखेस ६० लाख रक्कम फार किरकोळ वाटू शकेल. पण १९७१ साली ही फार मोठी रक्कम होती. त्या साठ लाखाचे २०१९ चे मूल्य २० कोटीच्यावर आहे. थोड्याच वेळात पोलीस स्टेशन आणि बँकेसमोर सगळे बातमीदार जमा झाले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बँकेत एक फोन आला आणि कुणीतरी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाजात बोलून ६० लाख रुपये ताबडतोब मागवून घेतले. आता देशाच्या पंतप्रधान पैसे मागतात म्हटल्यावर कोण नकार देईल? पैसे पाठवण्याची त्वरित व्यवस्था केली गेली. पण नंतर लक्षात आलं की कुणीतरी बँकेला ६० लाखाचा गंडा घातला होता.
पोलिसांनी एका दिवसातच गुन्हेगाराचा छडा लावला आणि त्याला जेरबंद केलं. दुसऱ्याच दिवशी त्याला कोर्टात हजर केलं गेलं, सुनावणी केली गेली आणि त्याला तुरुंगात सुद्धा रवाना केलं गेलं! म्हणजे गुन्हा घडल्यापासून अवघ्या तीन दिवसात केस निकालात निघाली!! ७२ तासात निकालात निघालेली ही भारतातली पहिलीच आणि एकमेव केस म्हणावी लागेल.
तर मंडळी, पोलिसांच्या दृष्टीने केस संपली होती. पण खरंच हे असं होतं का? की जे सर्वांना दाखवलं जात होतं त्यात काही संशयास्पद होतं? केवळ धूळफेक होती का? असे अनेक प्रश्न नंतरच्या काही दिवसात चारी दिशांनी विचारले जाऊ लागले. त्या प्रश्नांच्या संशयाच्या वावटळीत तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे नाव आले आणि या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं !
नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे भारताच्या पंतप्रधानांवर संशय घेतला गेला? या केसशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा अकस्मात मृत्यू कसा झाला? हे मृत्यू योगायोग म्हणावे की घातपात? चार तपांचा काळ निघून गेल्यावरही अजूनही या प्रकराणातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. कदाचित ती उत्तरे ज्यांना ठाऊक होती त्या व्यक्ती आता हयात नाहीत…चला आणखी जाणून घेऊ या खळबळजनक “नगरवाला केस” प्रकरणाबद्दल.
नेमकं काय घडलं त्या २४ मे च्या दिवशी?
आधी जाणून घेऊ पोलिसांनी सांगितलेली कहाणी… पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी सकाळी बँकेत एक फोन आला. हा फोन सिनियर कॅशियर वेदप्रकाश मल्होत्रा यांनी घेतला. त्यांना फोनवर सांगितले गेले की “मी पंतप्रधान कार्यालयातून पी. एन. हक्सर (पंतप्रधानांचे मुख्य सचिव) बोलतोय. पंतप्रधान इंदिरा गांधी तुमच्याशी बोलू इच्छितात.” नंतर इंदिरा गांधी फोनवर आल्या आणि त्यांनी ६० लाख रुपयांची ताबडतोब व्यवस्था करण्यास सांगितले. पुढे आणखी त्या म्हणाल्या की पैसे घेऊन एका विशिष्ट ठिकाणी जा. तेथे पैसे ताब्यात घेणारा "कॅरीअर" तुम्हाला भेटेल. त्याला ते पैसे हस्तांतरीत करा. त्यासाठी कोडवर्ड आहे, ‘बांगलादेश का बाबू’ जेव्हा कॅरीअर हा कोड उच्चारेल तेव्हा तुम्ही म्हणा, ‘बार-ऍट-लॉ’. नंतर फोन ठेवला गेला.
मग वेदप्रकाश मल्होत्रा यांनी बँकेतील इतर अधिकारी रामप्रकाश बात्रा, रावल सिंह यांच्या मदतीने ६० लाख रुपये एका ट्रंकेत भरले आणि बँकेच्याच अधिकृत कारने स्वतः ड्रायव्हिंग करत सांगितलेल्या ठिकाणी पोचले. तिथे एक उंच गोरी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख “रुस्तुम सोहराब नगरवाला” अशी सांगीतली आणि ठरलेला कोड उच्चारला. मल्होत्रांनीही कोडचे उत्तर दिले व ट्रंक त्याच्या हवाली केली. कॅश व्हाउचरची विचारणा केली असता नगरवाला म्हणाला, कॅश व्हाउचर तुम्हाला पीएम ऑफिसमध्ये स्वतः मॅडम देतील. आणि तो निघून गेला.
इकडे मल्होत्रा पीएम ऑफिसमध्ये पोचले तर त्यांना समजलं की मॅडम संसद भवनात आहेत. तिथून त्यांनी संसद भवन गाठले, पण तिथेही त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, तिथे सचिव पी एन हक्सर यांची भेट होऊ शकली. हक्सर यांनी “असा काही फोन आम्ही केलाच नाही” असे म्हणून कानावर हात ठेवले तेव्हा शर्मांना जबरदस्त धक्का तेव्हा बसला. वर पटकन पोलिसात जाऊन एफआयआर दाखल करा असाही सल्ला त्यांनी दिला.
इकडे मल्होत्रा ६० लाख रोकड घेऊन दीड तास लोटला तरी परत आला नाही असं झाल्यावर बात्रा आणि रावल सिंग यांना घाम फुटायची वेळ आली. त्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं. या टप्प्यातच बातमीला तोंड फुटले.
ऑपरेशन तुफान
घटना गंभीर स्वरूपाची होती. डी. के. कश्यप या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली लगेच कारवाईला सुरुवात झाली. नगरवाला ज्या टॅक्सी मधून आला त्या टॅक्सीचालकाकडून ज्या ठिकाणी तो उतरला त्याचा पत्ता मिळवला. तिथे परत टॅक्सी बदलली होती. मग दुसऱ्या टॅक्सीचालकाकडून माहिती घेऊन दिल्लीतल्या डिफेन्स कॉलनीमधल्या एका पत्यावर पोहोचले. त्यानंतर नगरवालाने पुन्हा एकदा टॅक्सी बदलली. यावेळी टॅक्सीवाल्याच्या नजरेस येईल अशा पद्धतीने ती ट्रंक ठेवून हे पैसे मी बांगलादेशला घेऊन जातोय असे त्याने टॅक्सीवाल्याला सांगितले. हे गुपित तुझ्याकडेच ठेव असे सांगून त्याने टॅक्सीवाल्याला ५०० रुपयाची बक्षिशी पण दिली. याच दरम्यान त्याने बॅगपण बदलली होती. ज्या गृहस्थाने ही बॅग नगरवालाला दिली तो नगरवालाचा परिचित होता. असे करता करता शेवटी पोलिसांचे पथक पारशी धर्मशाळेत पोचले आणि तिथेच संपूर्ण रकमेसह नगरवालाला अटक करण्यात आली. नंतर त्याची गुन्हा कबूल असल्याची जबानी इन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आली. कोर्टाने फक्त १० मिनिटांत सुनावणी पूर्ण करून नगरवालाला ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आणि त्याची रवानगी तुरुंगात केली.
मंडळी, ही होती पोलिसांनी सांगितलेली कहाणी. यावर ज्यावर पत्रकारांनी विश्वास ठेवला आणि याच कहाणीच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या. लोकांनी त्या उत्सुकतेने वाचल्या, पण विसरले नाहीत. कहाणी इतकी साधी, सोपी आणि सरळ होती का? ही कहाणी इथेच संपली का? तर नाही!
अभी तो इंटर्व्हल हुवा है…
अब आयेगा स्टोरी मे ट्विस्ट! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
जेलमध्ये गेल्यावर नागरवालाने एक पिटीशन दाखल केली आणि त्यात नमूद केले की त्याची केस पुन्हा ओपन करण्यात यावी. इतकंच नव्हे तर, आधी ज्या न्यायाधीशांसमोर केस होती त्यांच्यासमोर सुनावणी न घेता दुसरे न्यायाधीश असावे. पण त्याची ही मागणी नाकारली गेली. नगरवालाने परत अर्ज दाखल केला की, जोपर्यंत वेदप्रकाश मल्होत्राची उलटतपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही केस बंद करू नये. याच दरम्यान या केसचा तपास करत असलेले इन्स्पेक्टर डी. के. कश्यप यांचा कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला.
नगरवाला शांत बसला नाही. त्याने ‘करंट मॅगझीन’चे संपादक डी. एफ. कराका यांना निरोप पाठवला. “माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे, तुम्ही येऊन माझी मुलाखत घ्या.” दुर्दैवाने कराका त्यावेळी आजारी होते म्हणून त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला मुलाखतीसाठी पाठवले. नगरवाला कुठलाच धोका पत्करायला तयार नसल्याने त्याने ती मुलाखत नाकारली. कराका यांच्या सहकाऱ्याऐवजी भलताच व्यक्ती त्याच्यासमोर आणली गेली होता का? कुणास माहीत?
साल १९७२. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिहार तुरुंगात असताना नगरवाला आजारी पडला. त्याला तिहारच्या दवाखान्यात भरती केले गेले. नंतर तिथून त्याला बाहेर काढून २१ फेब्रुवारीला जी. बी. पंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही दिवस तिथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. होता होता २ मार्चचा दिवस उजाडला. नगरवालाचा वाढदिवस! वाढदिवसादिवशी त्याने दुपारचे जेवण घेतले आणि अचानक बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मंडळी, वाढदिवसाचा दिवसच नागरवालासाठी मरण दिवस ठरला! ठरला की ठरवला गेला असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली.
तर मंडळी, नगरवाला गेला. चौकशी अधिकारीही गेला. पण मागे उरले असे अनेक प्रश्न जे आजही अनुत्तरीत आहेत. आणि या प्रश्नांमधूनच आपण पुन्हा एकदा नगरवाला प्रकरण चाळून बघूया.
प्रश्न क्र. १.
टेलिफोनवर मागणी केल्यानंतर बँक पैसे पाठवते का ?
मंडळी, बँकेमधले कॅशियर किती खत्रूड असतात हे सांगायची आम्हाला गरज नाहीच. मग असे एका फोनवरती मल्होत्रा एकटा बँकेच्या बाहेर कसा गेला? त्याचे अर्धे उत्तर असे आहे की या पद्धतीने पैसे पोचवण्याची ही पहिली वेळ नसावी. दुसरे असे की सरकारच्या अनेक गुप्त आणि छुप्या कारवायांसाठी अशा पद्धतीने रोकड सरकारतर्फे दिली जाते. हा अधिकार फक्त पंतप्रधान किंवा ‘रॉ’ सारख्या संस्थांच्या प्रमुखांनाच असतो. थोडक्यात, अशा प्रकारचे व्यवहार मल्होत्राच्या माध्यमातून नियमित होत असावेत. या आधी पण नगरवालाला असे पैसे मल्होत्राने दिलेले होते. मल्होत्रा नगरवालाला ओळखत होता. त्याखेरीज वेदप्रकाश मल्होत्रा पंतप्रधानांच्या ‘प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड’च्या मानद अधिकार पदी होता. एवढेच नव्हे तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्याचे नेहमीच येणेजाणे होते.
जे अर्ध उत्तर मिळत नाही ते असं आहे की या पार्श्वभूमीवर नगरवालाने असे काय केले की ज्यामुळे ही तक्रार पोलिसांसमोर पोहोचली ?
प्रश्न क्र. २.
नगरवालाची खरी ओळख काय होती ?
रुस्तुम सोहराब नगरवाला हा गृहस्थ लष्करातून निवृत्त झालेला अधिकारी होता. सरकारी हेरखाते आणि बांगलादेशातील मुक्तीवाहिनीचे सदस्य या दोन्हीमधील मध्यस्थ (Conduit) म्हणून काम करत होता. त्याखेरीज जपानमध्ये इंग्रजी शिकवण्याचे काम पण तो करायचा. संपर्कासाठी त्याच्या हातात नेहमी वॉकीटॉकी असायची. त्याच्या खिशातले शस्त्र म्हणजे रिव्होल्व्हर हे निवृत्त अधिकाऱ्याचे जुने रिव्हॉल्व्हर नव्हते. खिशात परवानाधारक अद्यावत पिस्तुल तो बाळगत असे. प्रश्न असा येतो की ज्या दिवशी त्याला अटक झाली त्यादिवशी त्याची वॉकीटॉकी कुठे गेली होती? पण मंडळी, काहीतरी गडबड होती. जरी वॉकीटॉकी नसली तरी ज्या पद्धतीने वारंवार टॅक्सी बदलून तो प्रवास करत होता त्याचा अर्थ असा होता की तो सहेतुक त्याचा मागोवा सोडत होता. याचा अर्थ वॉकीटॉकी वापरण्याच्या परिस्थितीत तो नव्हता म्हणून असे दुवे तो मागे सोडत होता.
(बांगलादेश मुक्तीवाहिनी सेना)
प्रश्न क्र. - ३.
मग या ६० लाखाचे प्रयोजन काय ?
एक सत्य वाटावा असा तर्क इतिहासात उपलब्ध आहे. तो असा की त्याच दिवशी बांगलादेशच्या सीमेवरून १० हजार मुक्तीवाहिनीचे सदस्य टायगर सिद्दिकी याच्या नेतृत्वाखाली भारतात पोहोचणार होते. त्यांच्या शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासाठी त्यांनी तातडीची मदत मागवली होती. नगरवाला हा सरकार आणि मुक्तीवाहिनी यांच्या दोन्हीमधला मध्यस्थ होता हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते.
प्रश्न क्र. – ४
नगरवालाने इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल केली का ?
हे जवळजवळ अशक्य होते. कारण नगरवालाला फेशियल पॅरलिसीस होता. त्यामुळे बोलताना त्याला त्रास व्हायचा. असा माणूस एखाद्या स्त्रीच्या आवाजाची नक्कल करू शकेल का ?
प्रश्न क्र. – ५
नगरवाला इंदिरा गांधींना ओळखत होता का ?पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपण नगरवालाला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले होते, पण नगरवालाकडील काही कागदपत्रानुसार ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.
प्रश्न क्र. – ६
मग मल्होत्राचे काय झाले ?
या सर्व प्रकरणात कायद्याच्या दृष्टीने बघायचे तर मल्होत्राला नगरवाला सोबतच सहआरोपी करायला हवे होते. पण तसे न होता त्याला फक्त साक्षीदार ठेवण्यात आले. योगायोगाची गोष्ट अशी की बँकेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्याला संजय गांधींच्या मारुती उद्योग या कंपनीमध्ये चीफ अकाऊन्टस् ऑफिसर म्हणून नोकरी पण देण्यात आली.
या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याआधीच नगरवालाचा या जगातला मुक्काम संपला होता. चौकशी अधिकारीसुद्धा कार अपघातात मरण पावला होता. नगरवालाला कौटुंबिक आगापिछा काहीच नव्हता. विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न विचारले. जनता दलाने तर इंदिरा गांधींवरती थेट आरोप पण केले. इतकेच नाही तर जनता सरकार दरम्यान एक ‘रेड्डी कमिशन’ नेमून हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न पण केला गेला. आजच्या तारखेसही सगळ्याच प्रश्नांची सगळीच उत्तरं मिळालेली नाहीत.
एकंच सुसंगत तर्क या प्रश्नाचे उत्तर मांडण्याचा प्रयत्न करतो. तो असा आहे की रुस्तुम सोहराब नगरवाला हा खरोखर एका छुप्या सरकारी कारवाईसाठी पैसे घेऊन निघाला होता. ऐनवेळी हे सिक्रेट मिशन रद्द झाले आणि नगरवालाने हेतुपुरस्सर मागावे सोडत त्याचा प्रवास चालू ठेवला. याच दरम्यान बँकेचे अधिकारी पण पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांची तक्रार एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नोंदवून घेतली. साहजिकच असे सिक्रेट मिशन दाबून टाकण्यासाठी नगरवाला पैसे घेऊन पळाला इतकीच मर्यादित माहिती देण्यात आली.
कुठल्यातरी एका कवीने म्हटले आहे की
“एक साधा प्रश्न माझा, लाख त्याची उत्तरे
हे खरे की ते खरे, ते खरे की हे खरे.”
इतकंच आपण म्हणू शकतो.
लेखक : अनुप कुलकर्णी