रजनीकांतच्या मांडीवर बसलेल्या या मुलावर दुसरीच्या पुस्तकात आहे धडा....त्याने केलेलं काम बघून सलाम कराल !!

मंडळी, सुपरस्टार रजनीकांतच्या मांडीवर बसलेला तो मुलगा आठवतोय ? त्याच्या चांगल्या कामामुळे त्याचा समावेश चक्क अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. चला तर, सविस्तर माहिती घेऊया.
मंडळी, हा फोटो अधूनमधून इंटरनेटवर फिरत असतो. तुम्हाला या फोटोमागची स्टोरी माहित असेलच. नसेल तर थोडक्यात जाणून घेऊया.
गेल्यावर्षी तामिळनाडूच्या इरोड येथे राहणाऱ्या एम. यासीन या मुलाला रस्त्यावर एक बॅग सापडली. या बॅगेत तब्बल ५०,००० रुपये होते. एम. यासीनने हे पैसे प्रामाणिकपणे आपल्या शिक्षकांच्या हाती सोपवले. शिक्षकांनी याबद्दल त्याचं कौतुक तर केलंच, पण पोलिसांनाही ही माहिती दिली. पोलिसांनी पैसे ताब्यात घेतले आणि एम. यासीनला त्याच्या कामाच्या बदल्यात १००० रुपये बक्षिशी देऊ केली. एम. यासीनने हे बक्षीस चक्क नाकारलं.
लवकरच एम. यासीनच्या कामाची बातमी संपूर्ण तमिळनाडूत आणि त्यानंतर भारतात पसरली. तशी ती बातमी रजनीकांतअण्णांना पण समजली. त्यांनी लगेच या लहानग्याला आणि त्याच्या आईवडिलांना आपल्या घरी बोलावून घेतलं. रजनीअण्णांनी मुलाच्या प्रामाणिकपणासाठी त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी उचलली आहे. रजनीअण्णा म्हणाले की त्याची शाळा पूर्ण झाल्यावर त्याला आपल्या मर्जीप्रमाणे जे शिक्षण घ्यायचं असेल त्यासाठी मी पैसा देईन.
एम. यासीनला मोठी बक्षिशी तर आपल्या शिक्षण संस्थेने दिली आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद फार पूर्वीपासून स्थानिक लोकांच्या कथांना पाठ्यपुस्तकात स्थान देत आलं आहे. यावेळी त्यांनी दुसऱ्या इयत्तेसाठी चक्क एम. यासीनची निवड केली आहे. आता दुसरीत शिकणाऱ्या मुलांना एम. यासीनच्या प्रामाणिकपणाचा धडा वाचायला मिळणार आहे. गमतीचा भाग म्हणजे एम. यासीनने हे काम ज्यावेळी केलं त्यावेळी तो दुसरीतच शिकत होता.
तर मंडळी, प्रामाणिकपणाचं बक्षीस हे मिळतंच. तुम्हाला एम. यासीनच्या कामाबद्दल काय वाटतं ? आम्हाला नक्की सांगा !!