११ चोर, २००० जबान्या, रेल्वे-सीआयडी ते नासा यांनी तपास केलेली धावत्या रेल्वेतून झालेली एकदम धूम टाईप चोरी!!

धूम 2 सिनेमा आठवतो का मंडळी? तोच तो, हृतिक रोशन वाला… चोरी करण्याच्या एकदम वेगळ्या पद्धतीमुळे पोलिसांना अक्षरशः सळो की पळो करून सोडणारा चोर आपल्या सर्वांच्याच लक्षात राहिलाय. तुम्हाला काय वाटते मंडळी? या अशा चोरीच्या पद्धती खऱ्या असतील की उगाच सिनेमात दाखवायचं म्हणून अतिरंजित चित्रण असेल? म्हणजे धावत्या ट्रेनमध्ये चोरी करून गायब होणं शक्य आहे काय? काय म्हणता? अशक्य? नाही नाही… हे अगदीच शक्य आहे! कारण आज आम्ही सांगणार आहोत खरोखर धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या चोरीबद्दल. कशी झाली, कुठे झाली, मग ते चोर सापडले का? चला तर, जाणून घेऊयात…
२०१६ चा ऑगस्ट महिना. तारीख होती ८ ऑगस्ट! तामिळनाडूच्या सेलमवरून चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनच्या एका बोगीत तब्बल ३४२ कोटी रुपये होते. हे पैसे इंडियन ओव्हरसिज बँकेचे होते आणि ते चेन्नईच्या RBI हेडक्वार्टरला नेले जात होते. या पैशांच्या सुरक्षेसाठी १८ हत्यारबंद पोलीस कर्मचारी तैनात ठेवले गेले. पण जेव्हा ट्रेन आपल्या इच्छित स्थळी पोहोचली तेव्हा असं लक्षात आलं की ट्रेनच्या छताला भगदाड पडलंय आणि एकूण रकमेपैकी ५.७८ कोटी रुपये गायब आहेत! अर्थातच ही जबरी चोरी होती आणि ती पोलिसांच्या नाकावर टिच्चून केली होती. हा प्रकार बघून सगळेच चक्रावून गेले. असं कसं शक्य आहे? ही चोरी झालीच कशी? अनेक प्रश्न पोलीस आणि प्रशासनासमोर उभे राहिले…
काय मंडळी? तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? अत्यंत अक्कलहुषारीने डोकं लढवून ही चोरी केली गेली आणि तितक्याच प्रयासाने चोरसुद्धा सापडले. चला आधी बघूया चोरांनी ही चोरी केली कशी?
सेलम ते चेन्नई दरम्यान वृंदाचलम नावाचे एक स्टेशन आहे. या स्टेशनवर इंजिन बदलण्यासाठी ट्रेन थांबत असते. सेलम ते वृंदाचलम या मार्गावर ट्रेन डिझेल इंजिनवर चालते आणि वृंदाचलम ते चेन्नई इलेक्ट्रिक इंजिनवर चालते. या इंजिन बदलाला किमान एक तासाचा कालावधी लागतो. याच वेळेचा फायदा चोरांनी घेतला आणि ते ट्रेनच्या छतावर पोलिसांचा डोळा चुकवून चढले.
चोरांनी आपल्यासोबत गॅस कटर आणि इतर काही साधने घेतली होती. नंतर कटरच्या साहाय्याने एक माणूस आरामात ये-जा करू शकेल इतके मोठे छताला भगदाड पाडले. मग ही चोरांची टोळी अगदी निवांतपणे जमतील तितके पैसे उचलू लागली. हे पैसे लाकडांच्या बॉक्समध्ये भरले होते. एकूण ४ बॉक्स चोरांनी फोडले. ते पैसे त्यांनी लुंगीमध्ये भरले आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला थांबलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडे फेकले. अशी तब्बल ५.७८ कोटी रुपयांची त्यांनी चोरी केली आणि ट्रेन थांबल्यावर पळ काढला.
ही सर्व घटना रात्रीच्या अंधारात ट्रेन ताशी ७० किमीच्या वेगाने धावत असताना घडत होती आणि इकडे बाजूच्याच बोगीत बसलेले पोलीस अगदी निवांत होते. धावत्या ट्रेनमध्ये कुणी चोरी करू शकेल याची कल्पनाच त्यांना आली नाही!
या चोरीनंतर पाच तासांनी ट्रेन एग्नोर स्टेशनवर थांबली तेव्हा एका पोलिसाला असे दिसले की बंद असलेल्या बोगीत बाहेरून प्रकाश येतो आहे. हा संशय आल्यावर पोलीस छतावर चढले आणि त्यांना दिसले भले मोठे भगदाड! अर्थातच चोरांनी केव्हाच पळ काढला असल्याने पोलिसांनी हात चोळत बसल्याशिवाय त्यावेळी तरी गत्यंतर नव्हते… पण…
म्हणतात ना, चोर कितीही हुशार असला तरी काहीतरी पुरावा मागे ठेवतोच! आता चोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी काय केले पाहूया…
या चोरीचा उलगडा करण्यासाठी तब्बल ७२० दिवस दिवस लागले. किमान २ हजार लोकांची कसून चौकशी करण्यात आली. लाखो कॉल डिटेल्स बारकाईने तपासले गेले… आणि सर्वात शेवटचा उपाय म्हणून अगदी नासाचीसुद्धा मदत घेतली गेली. इतके परिश्रम घेतल्यावर शेवटी समजलं की भारतातील सर्वात मोठी ट्रेन रॉबरी करणारे चोर कोण आहेत!
ही केस पहिल्यांदा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होती. त्यांचे प्रयत्न विफल झाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे या केसला सोपवण्यात आले. चोरी अशी फिल्मी स्टाईल होती की त्यांनाही याचा तपास लागला नाही! मग सीबी-सीआयडी स्पेशल टीमकडे ही केस देण्यात आली. सीआयडीने २ वर्षे याचा प्रत्येक बाजूने तपास केला. हजारो लोकांच्या जबानी घेतल्या. रेल्वेचे कर्मचारी, पार्सल ऑफिसचे कर्मचारी, अधिकारी वर्ग आणि सेलमच्या बँकेपासून ते चेन्नईपर्यंत सर्वांचीच झडती घेतली गेली…पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही! एवढं सगळं करूनही हाती काहीच न मिळाल्याने शेवटी पोलीस आयटी एक्स्पर्टला शरण गेले आणि तेव्हा कुठे या केस मधला पहिला पुरावा त्यांच्या हाती लागला!
मंडळी, आजकाल तंत्रज्ञान इतके प्रगत झाले की लाखो प्रकारच्या माहितीमधून तुम्हाला हवी असलेली माहिती ते अचूक शोधू शकते आणि त्याचे विश्लेषण करू शकते. या केसमध्ये सुद्धा असेच केले गेले. आयटी एक्स्पर्टनी सेलम ते चेन्नई या दरम्यान चोरीच्या घटनेवेळी जितके फोन नंबर सुरू होते तेवढ्यावर लक्ष केंद्रित केले. त्या हजारो फोन नंबर मध्ये ४-५ नंबर संशयास्पद आढळून आले. या नंबरमध्ये काही पॅटर्नमध्ये समानता होती. मग या फोन नंबरचा अधिक तपास केल्यावर असे दिसले की हे सर्व मध्यप्रदेशातले आहेत आणि ते एकाच ठिकाणी घेतले गेले होते.
आता नंबर तर मिळाले, त्या नंबरचे मालक असणाऱ्या व्यक्तींची नावे सुद्धा समजली, पण मंडळी, हे कसं ठरवणार की चोरी यांनीच केली आहे? मग सरतेशेवटी अमेरिकेच्या अंतराळ एजन्सी नासाची मदत घेतली गेली. सेलम ते चेन्नई मार्गावरील सॅटेलाईटने त्या वेळी घेतलेल्या इमेजेस तपासल्या गेल्या. त्यावरून असं समजलं की ही चोरी ११ जणांच्या टोळीने मिळून केली आहे. आता हे दोन्ही पुरावे पोलिसांना महत्वाचे होते. या पुराव्यांवरून निश्चित होत होते की हे सर्व चोर मध्यप्रदेश व बिहारचे रहिवासी आहेत. मग वेगाने चक्रे फिरवली गेली आणि ११ पैकी काही जणांना चोरीच्या घटनेनंतर २ वर्षांनी अटक केली गेली.
आता प्रश्न असा येतो की या चोरांनी जवळपास ६ कोटी रुपयांचे केले तरी काय? मंडळी, या प्रश्नाचे उत्तर फार मजेशीर आहे. महत्प्रयासाने एखादी गोष्ट मिळवली आणि त्याचा जर उपभोगच घेता आला नाही तर? इथे पण असेच घडले होते. चोरांनी ६ कोटी चोरले ते ८ ऑगस्ट २०१६ या दिवशी. हे सर्व पैसे ५००रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होते. मग त्यातले दीड-दोन कोटी चोरांनी आपापल्या गावात काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी खर्च केले. आणि अशातच आली तारीख ८ नोव्हेंबर २०१६! होय… हीच ती तारीख ज्या दिवशी भारतात नोटबंदी जाहीर केली होती! मंडळी, आहे ना गंमत? आता बाकीच्या रकमेचा चोरांना काहीही उपयोग नव्हता. ते पैसे खर्चसुद्धा करू शकत नव्हते आणि एवढे पैसे बँकेतसुद्धा जमा करू शकत नव्हते. आता त्या करोडो रुपयांची किंमत फक्त कागदाच्या तुकड्याइतकीच उरली. शेवटी अक्षरशः ते करोडो रुपये चोरांना जाळून टाकावे लागले.
ऑक्टोबर २०१८ मध्ये या चोरांना अटक झाली. दिनेश पारडी आणि रोहन पारडी हे रतलाम, मध्यप्रदेश येथे राहणारे युवक पोलिसांच्या हाती आले आणि टोळीतल्या बाकी चोरांचा देखील ठावठिकाणा लागला. या टोळीचा सरदार मोहर सिंग होता. तो आधीच इतर काही गुन्ह्यामध्ये गुनामधल्या सेंट्रल जेलमध्ये बंदिस्त असल्याने त्याला शोधण्यास काही कष्ट पडले नाहीत. आणखी काही जणांची धरपकड झाली, तर काहीजण अजूनही फरार आहेत.
यांची गुन्ह्याची पद्धत विचारात पाडणारी आहे मंडळी. हे लोक टोळी बनवतात आणि एखाद्या शहरामध्ये जाऊन फिरते विक्रेते, रेल्वेमधील खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेता, मजूर अशी कामे स्वीकारतात. मग जिथे चोरी करायची आहे अशा संस्थेसमोर किंवा एखाद्या बँकेसमोर थांबून तिथे घडणाऱ्या घडामोडींवर बारीक नजर ठेवतात. ज्या दिवशी पैशांचा काही मोठा व्यवहार होणार असतो त्या दिवशी चोरी करून आपापल्या गावाकडे फरार होतात. अशा कित्येक चोरीच्या घटना आहेत ज्यामध्ये गुन्हेगार अजूनही सापडले नाहीत.
तर मंडळी, कशी वाटली ही फिल्मी स्टाईल चोरीची हकीकत? आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा आणि लेख शेअर करायला विसरू नका.
लेखक : अनुप कुलकर्णी