computer

व्हिडिओ ऑफ द डे : या मोटरमनने 'या' गोष्टीसाठी धावती ट्रेन थांबवली....तुम्हांला पटतं का?

मंडळी, निसर्गाची हाक आली की कोणाच्या बापाला ऐकत नाही. आम्ही ‘शी’ आणि ‘शू’बद्दल बोलतोय. या दोन्ही गोष्टी दाबून धरल्या की नंतर लय अवघड परिस्थिती ओढवते. म्हणून एकदाचं मोकळं झालेलं बरं. मुंबईच्या मोटरमनने पण हाच विचार केला आणि काय केलं पाहा.

राव, कोणतीही साधारण गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करता येते, पण ट्रेन कशी पार्क करणार ? तरी या मोटरमन महाशयांनी निसर्गाच्या हाकेला महत्व दिलं आणि चक्क धावती ट्रेन थांबवली. त्यांना प्रेशर कंट्रोल झाला नाही राव.

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केलाय सोनू शिंदे नावाच्या व्यक्तीने. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीच्या मध्ये हा प्रकार घडला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. इंटरनेटचे दोन गट पडलेत. एक गट म्हणतोय की मोटरमनने जे केलं ते योग्यच होतं, तर दुसरा गट मोटरमनची खिल्ली उडवतोय.

तुम्ही काही मत बनवण्याच्या आधी आपण रेल्वेचं काम थोडं समजून घेऊया. जेव्हा लांब पल्ल्याच्या ट्रेन्स सोडल्या जातात तेव्हा मोटरमनला विश्रांतीसाठी आणि त्याचे सगळे विधी उरकण्यासाठी ३ तास दिले जातात. त्यानंतरच ट्रेन सोडली जाते.

याची दुसरी बाजू अशी की सध्या मोटरमनची कमतरता असल्याने एका बाजूला एकच मोटरमन असतो. मग अशी आणीबाणीची परिस्थिती आल्यावर त्या एकट्याने सगळं कसं सांभाळायचं ? अशावेळी अपघात पण होऊ शकतात.

तर मंडळी, आता तुम्हीच सांगा रेल्वे मध्येच थांबवून त्याने योग्य केलं की अयोग्य ??

सबस्क्राईब करा

* indicates required