कामाच्या वेळात बाथरूमलाही जाण्याची परवानगी नसते ? अमेझॉन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे ही आहेत कारणं !!!
दिसतं तसं नसतं अणि म्हणूनच जग फसतं राव!! आता हेच बघा ना, अमेझॉन म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाची कंपनी. तिथं नोकरी लागली म्हणजे पोराचं नशीब उघडलं असंच कुणालाही वाटेल. काय तिथला पगार आणि काय त्या सुखसोयी.. अहाहा!! पण म्हटलं ना मंडळी, जसं दिसतं तसं नसतं. तिथले कामगार चक्क अमेझॉनविरुद्ध आंदोलन करत आहेत राव!! तुम्हाला वाटत असेल आंदोलनं वगैरे भानगडी फक्त भारतात होत असतील, पण तसे नाही. आता जिथं लोकांना काम करायला अडचण होते ते लोक विरोध करतीलच की!! आणि हेच अमेझॉनसारख्या जगप्रसिद्ध कंपनीलासुद्धा लागू होतं. आता नक्की असं काय झालं की एवढ्या श्रीमंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीविरुद्ध आंदोलनं करावी लागत आहेत? तर मंडळी तिथल्या कामगारांना एका नाही, अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत.
आजच्या घडीला अमेझॉन ज्या वेगाने वाढत आहे त्यावरून ही कंपनी लवकरच जगावर राज्य करणार असे चित्र आहे. पण हे करत असताना तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रचंड हाल भोगावे लागत आहेत. अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिफ्ट दरम्यान बाथरूमला जायचीसुद्धा परवानगी नसते राव!! त्यांना इतकीही मोकळीक दिली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर बाटलीत लघवी करण्याची वेळ आली आहे.
याच गोष्टीला विरोध करण्यासाठी पूर्ण ब्रिटनमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. ब्रिटनमधल्या प्रमुख शहरातल्या अमेझॉनच्या गोडाऊन्सच्या बाहेर लोकांनी धरणं धरली आहेत. लोकांची मागणी आहे की कंपनीने लोकांना चांगली वागणूक द्यायला हवी. त्याचबरोबर अमेझॉन टॅक्स चुकवण्यात पण प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. त्याविरुद्धसुद्धा लोक चिडले आहेत. अमेझॉनने वेळच्या वेळी टॅक्स भरायला पाहिजे ही पण एक मागणी त्यात आहे.
अमेझॉन गरजू स्त्रियांनाही नीट वागवत नाही असं दिसतं. गरोदर स्त्रियांनासुद्धा गरोदरपणात दिवसात सुट्टी दिली जात नाही. ज्या बायका अशा काळात एखादा दिवस घरी राहतात त्यांना कामावरून हाकलले जाते. गरोदर बायकासुद्धा दिवसभर उभं राहून काम करत असतात. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की जेफ बेजोस लोकांना मशीन सारखे वागवत आहेत आणि त्याप्रमाणे लोकांनी काम करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. पण जोवर कामगारांना माणुसकीची वागणूक मिळत नाही तोवर ही आंदोलनं सुरूच राहतील...
मंडळी, हे सर्व चित्र पाहता जगभरात नावाजलेल्या कंपनीतसुद्धा गौडबंगाल असतं असं दिसतं. जगभरातल्या लोकांना अमेझॉनसारख्या कंपनीत नोकरी करावीशी वाटते पण तिथल्या लोकांची परिस्थिती बघता दिव्याखाली अंधार असाच प्रकार असल्याचं दिसतंय.




