बोभाटा बाजार गप्पा : वाढता सोन्याचा भाव आणि जर्मनीच्या या बँकेचा काय आहे संबंध ?

गेली अनेक दिवस सोन्याचे भाव वाढत होते. सोन्याचे भाव अचानक वाढणे म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी भीतीचे मूळ जोर धरते आहे असे सगळ्यांना वाटत होते. भीतीची सावली दिसत होती, पण सावलीमागचा चेहेरा कुठेच नजरेस येत नव्हता. सध्या कोणतेही मोठे युद्ध चालू नाही. डॉलरमध्ये फारसे चढ उतार नाहीत. ब्रिटनची राजकीय कोंडी संपली आहे. थोड्याफार फरकाने सगळं काही 'ऑल इज वेल' आहे. पण मग सोन्याचे भाव का वाढत आहेत याचा उलगडा होत नव्हता. कदाचित आज आलेल्या बातमीने त्या यक्ष प्रश्नाचे मूळ कुठे दडले आहे याचे उत्तर दिले आहे.
काय आहे ही बातमी?
जर्मनीची सगळ्यात मोठी बँक डॉईचे बँक बुडण्याची शक्यता असल्याची मोठी बातमी आहे. जागतिक शेअरबाजारात डेरिव्हेटिव्हमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक हाताबाहेर गेल्याने या बँकेचा डोलारा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढे आणखी काही सांगण्यापूर्वी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते समजून घेऊया.
डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ?
एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा भाव अंतर्भूत असलेला करार म्हणजे डेरीव्हेटीव्हज. हा करार म्हणजे शेअर घेणे किंवा विकणे असा होत नाही, तर अंतर्भूत असलेल्या शेअरचा भाव जसा वर खाली जाईल, तसा करार करणार्याचा नफातोटा कमीजास्त होत राहतो. या कराराचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे फ्युचर आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑप्शन!
उदाहरणार्थ, तुम्हांला रिलायन्स कंपनीचे २०० शेअर्स घ्यायचे असतील, तर २०० शेअर्सची किंमत भरावी लागेल. पण २०० शेअर्स फ्यूचर किंवा ऑप्शनचा करार घेतला तर एकूण २०० शेअर्सच्या किमतीपेक्षा अगदी छोटी रक्कम देऊन तुम्हाला करार विकत घेता येतो आणि नफा मिळवता येतो. पण मंडळी अशा प्रकारचे करार अत्यंत अस्थिर स्वरुपाचे असतात. आता आपण ज्या बँकेबद्दल बोलतोय त्या बँकेचे डेरीव्हेटीव्ह एक्स्पोजर म्हणजे डेरीव्हेटीव्हजमध्ये केलेली गुंतवणुकीची दर्शनी किंमत ही ४९ ट्रिलियन डॉलर इतकी मोठी आहे. मित्रांनो, एक ट्रिलियन रुपये म्हणजे एक लाख कोटी. अर्थात हा व्यवहार डॉलर्समध्ये आहे, रुपयांमध्ये नाही.
डॉईचे बँकेला फक्त जर्मनीची मोठी बँक म्हणून चालणार नाही. कारण या बँकेसोबत अमेरिकेतल्याही अनेक अग्रगण्य बँकांचे पण पैसे गुंतले आहेत. त्या बँका पण Too big to fail या दर्जाच्या आहेत. २०१६ च्या ‘आयएमएफ’च्या अहवालाप्रमाणे जेपी मॉर्गन चेस, सिटी ग्रुप, गोल्डमन सॅक, मॉर्गन स्टॅनली आणि बँक ऑफ अमेरिका या सर्व अमेरिकन बँकांचे डॉईचे बँकेसोबत मोठे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकी आहेत. थोडक्यात, २००८ साली 'लेहमन ब्रदर्स’ ही बँक बुडाल्यानंतर अमेरिकेतल्या इतर अनेक बँका आणि आर्थिक संस्था धुळीला मिळाल्या होत्या. त्या प्रसंगाची पुनरावृत्ती होते आहे का काय? या भीतीने जागतिक बँकिंग क्षेत्राच्या पोटात गोळा आला आहे.
भारतावर काय परिणाम होईल?
भारतात बाहेरच्या देशातून येणाऱ्या गुंतवणुकीला मोठा फटका बसेल. त्या गुंतवणुकीवर अवलंबून असलेले सर्व प्रोजेक्ट्स ठप्प होतील. नव्याने निवडून आलेल्या सरकारने जी देशाबाहेर स्वायत्त कर्जरोखे ( सॉवेरीन बॉण्ड्स) विकण्याची जी योजना आखली आहे, ती बरेच महिने अडखळत राहिल. भारतीय शेअर बाजारातून परकीय अर्थसंस्था बाहेर पडतील. किती आणि काय काय होईल त्याची यादी आताच सांगणे कठीण आहे, पण येत्या आठवड्यात या वादळाचे संकेत मिळतील. ७ जुलै रोजी १८,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकून डॉईचे बँकेने काय होऊ शकते याचे संकेत दिलेच आहेत. सोबत काही विभाग विक्रीला काढले आहेत. हे वादळ कदाचित आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल किंवा युरोप, अमेरिकेतील सरकारे ही बँक बुडणार नाही याची काळजी घेतील. पण असे झालेच तर.........??
भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावे?
--भारतीय गुंतवणूकदारांनी घाबरून अनावश्यक हालचाली म्हणजे म्युच्युअल फंडातील युनिट ताबडतोब विकणे, SIP चे हप्ते बंद करणे, चढ्या भावात सोने घेणे असले काही करू नये.
--आज आलेली बातमी अजूनही पक्क्या स्वरूपाची नाही. ही एका संकेतस्थळाने (Zerohedge.com) व्यक्त केलेली भीती आहे असे समजून पूर्ण माहिती हाती येईपर्यंत वेळ काढावा. ह्या संकेतस्थळाच्या बातम्या बऱ्याचवेळा मंदीकडे झुकणाऱ्या असतात हे लक्षात ठेवावे.
--ज्यांच्या हातात अजूनही गुंतवणूक करण्यासारखी जमाराशी आहे, त्या ग्राहकांनी शेअर बाजारात 'डिस्काउंट सेल' लागला आहे असे समजून खरेदी करू नये. खरेदीचा मोका येण्यास अजून भरपूर वेळ आहे.
सर्वसामान्य माणसांचे काय?
भारतीय बँका बुडणार नाहीत. रिझर्व्ह बँक या सर्व हालचालींवर नजर ठेवून योग्य ते पाऊल उचलेल याची खात्री बाळगावी. पेट्रोलचे भाव सुरुवातीला कदाचित वाढतील, पण नंतर बरेच खालीही येतील. लक्षात घ्या, २००८ साली जेव्हा जागतिक मंदी होती तेव्हाही आपल्या व्यवस्थेने आपल्याला सांभाळून घेतले होते. यावेळीही तसेच होईल अशीच आशा करू या.