महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना तब्बल १२ तासांनी कसं सुखरूप बाहेर काढण्यात आलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम!!
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचे चित्र असताना महाराष्ट्रभर वरूणराजाचे जोरदार आक्रमण झाले आहे. मुंबईत आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. अनेक लोक घरातच अडकून पडले आहेत, तर अनेकांना नाईलाजाने कामावर जावे लागले आहे. एकंदरीत मुंबई विस्कळीत झाली आहे राव!!
मुंबईत काही ठिकाणी रस्त्यांचा स्विमिंगपूल झालाय. वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून येतोय. पावसामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ७ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. मंडळी, या सर्व गोष्टींवरून मुंबईत परिस्थिती कठीण झाली आहे हे तुम्हाला समजले असेलच. मुंबईकर या सगळ्या परिस्थितीला नेहमीप्रमाणे नेटाने सामोरे जात आहेत.
पण या सर्व घडामोडीत एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे राव!! सकाळी बदलापूर आणि वांगणीच्यामध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस ट्रॅकवर अडकली होती. उल्हास नदीला पूर आल्याने सर्व रेल्वेट्रॅक पाण्याखाली आले होते. वरून धुवांधार पाऊस कोसळत असताना मध्येच गाडी अडकल्याने मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता होती. वेळीच मदतकार्य सुरू झाल्याने दुर्घटना टळली. या बचावकार्यात हेलीकॉप्टरने अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
मुंबईपासुन सुमारे १०० किलोमीटर अंतरावर अडकलेली ही ट्रेन जवळपास १२-१३ तास तिथे अडकली होती. या दरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व प्रवाशांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. या सगळ्या लोकांनी स्थानिक लोकांचेसुद्धा आभार मानले आहेत. कठीण परिस्थितीत सर्व लोक हातातली कामे टाकून मदतीला धावून आले होते राव!!
जिथे गाडी अडकली तो परिसर शहरापासून दूर असल्याने सुरुवातीला तिथल्या शेतकऱ्यांनी मोठी मदत केली. रेल्वेत अडकलेल्या ७०० प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नेव्ही, एयरफोर्स, एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासन असे सगळेजण झाडून कामाला लागले होते. मंडळी, सध्या बाहेर काढलेल्या लोकांना बदलापूर स्टेशनवर घेऊन जाण्यात येत आहे. तिथून मग एका स्पेशल ट्रेनने त्यांना त्यांच्या इच्छित जागी सुखरुप पोहोचविण्यात येणार आहे.
पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे असे वाटते. नाहीतर पुन्हा एकदा २००६ची पुनरावृत्ती आज झाली असती. मंडळी, तुमच्याकडे सध्या पावसाची आणि साचलेल्या पाण्याची काय परिस्थिती आहे? आम्हांला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा..




