गटारीच्या निमित्ताने या २ हटके नॉनव्हेज रेसिपीज नक्की ट्राय करा !!
काय मंडळी, आज गटारी साजरी करताय ना ? आज तुम्ही पोटभरून नॉनवेज वर ताव माराल, कारण पुढे अख्खा श्रावण महिना फक्त वेज वर काढायचा आहे. नॉनवेजचा हा शेवटचा दिवस आणखी बहारदार करण्यासाठी बोभाटा तुम्हाला काही खास रेसिपीज शिकवणार आहे. या रेसिपीज आज नक्की करून बघा.
भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)
एक पापलेट स्वच्छ धूऊन त्याला एका बाजूने चिर पडून घ्या. त्याला हळद, मीठ, लिंबाचा रस, एक चमचा आगरी मसाला, एक चमचा आले, लसूण, कोथिंबीर पेस्ट चोळून, घ्या व एक तास मॅरीनेट करा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात आले-लसूण-मिरची-कोथिंबिर पेस्ट परतून घ्या. नंतर त्यात अर्धा कप ओल्या नारळाचे किसलेले खोबरे, एक चमचा आगरी मसाला, अर्धा कप सुके किसलेले खोबरे, मीठ हे सर्व परतून घ्या. आता हा मसाला गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. यांनतर मसाला पापलेटमध्ये भरुन घ्या व तव्यावर तेल गरम करून स्टफ पापलेट फ्राय करा.
हनी चिकन
यासाठी आपल्याला बोनलेस चिकन लागेल. तर हे बोनलेस चिकन घेऊन त्याचे बारीक तुकडे करा आणि त्याला मीठ व मिरची पावडर लाऊन १० मेरीनेट करा. नंतर एका बाऊलमध्ये एक अंडे फेटुन घ्या, आणि त्याचवेळी दुसऱ्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर २ चमचे व १ चमचा मैदा मिक्स करा.
आता मॅरीनेट केलेले चिकन अंड्यात बुडवून कोर्नफ्लोवरमध्ये घोळवून तळून घ्या. नंतर एका कढईत तेल घ्या, तेल तापले की त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, मिरची, घालून परता. त्यात शेजवान चटणी व टोमॅटो सॉस घाला आणि मग त्यात तळलेले चिकन घाला. नंतर १ चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये २ चमचे सोया सॉस घालून ढवळून ते पाणी त्या चिकनवर घाला. त्यानंतर या चिकनवर थोडे मीठ घालून परतून घ्या. थोडे घट्टसर झाले की त्यावरून मध व पातीचा कांदा घाला. सजावटीसाठी वरुन थोडे भाजलेले तीळ भुरभुरवा.
सौजन्य : नंदकुमार म्हात्रे आणि उर्मिला म्हात्रे.




