या माणसाचे दात त्याच्याच घशात कसे अडकले ? गंमत म्हणजे भारतात अशा घटना घडू नयेत म्हणून नियम आहे !!

ऑपरेशन होतं पोटाचं आणि दात अडकले घशात असा विचित्र प्रकार आहे हा !!
सरळ मुद्द्याला हात घालूया. त्याचं झालं असं, की युकेच्या एका ७२ वर्षांच्या आजोबांवर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेच्या ६ दिवसानंतर हे आजोबा पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा त्यांच्या घशातून रक्त निघत होतं. त्यांचा घसा दुखत होता, अन्न गिळता येत नव्हतं आणि खोकल्यासोबत रक्त येत होतं. त्यांनी डॉक्टरांना म्हटलं की ऑपरेशन झाल्यापासून त्यांना अन्न गिळता येत नाहीय.
डॉक्टरांना वाटलं की ऑपरेशनच्या दरम्यान घशातून नळी घालावी लागल्याने त्यांना इन्फेक्शन झालं असेल. डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्स-रे काढला. एक्स-रे मधून काही गंभीर आढळलं नाही. त्यांना औषधं देऊन घरी पाठवण्यात आलं.
दोन दिवसानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. त्यांचा घसा पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने दुखत होता. खोकल्यातून पूर्वीसारखंचं रक्त येत होतं. त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की घशाच्या त्रासाने त्यांना औषधंही घेता आली नाहीत. याखेरीज त्यांना झोपल्यावर श्वास घेता येत नव्हता.
डॉक्टरांना यावेळी असं वाटलं की त्यांच्या छातीत जंतू संसर्ग झाला आहे, पण त्यांनी सोबतच घशाच्या आत काही समस्या नाही ना हेही तपासून पाहिलं. तेव्हा खरी गोष्ट समोर येऊ लागली. त्यांच्या घशात अर्धवर्तुळाकार धातू असल्याचं आढळलं.
हे जेव्हा आजोबांना सांगण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की माझी कवळी ऑपरेशनपासून हरवली आहे. हे समजताच त्यांच्या घशाचा एक्स-रे काढण्यात आला. यावेळच्या एक्स-रे मध्ये त्यांची हरवलेली कवळी त्याच्या घशात अडकल्याचं उघड झालं.
मंडळी, शस्त्रक्रियेच्या वेळी अनेस्थेशिया दिल्यानंतर त्यांची कवळी त्याच्या घशात पडली आणि त्यांने ती नकळत गिळली होती. आजोबांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ६ दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.
या गोष्टीचा इथेच अंत होत नाही. काही आठवड्यांनी ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. यावेळी पण ते रक्त ओकत होते. डॉक्टरांनी तपासल्यावर समजलं की घशात ज्या ठिकाणी कवळी अडकली होती तिथली रक्तवाहिनी फाटली आहे. यानंतर त्याच्यावर दुसरी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ६ दिवसानंतर त्याच्यात सुधारणा दिसू लागल्या. यावेळी आखरे त्याचा त्रास संपला होता.
मंडळी, अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. काही महिन्यांपूर्वी तुर्कस्थानात ५० वर्षांच्या माणसाने याच प्रकारे कवळी गिळली होती. याखेरीज १९७६ सालच्या ऑस्ट्रियामधल्या एका केसमध्ये पण अशीच घटना नमूद आहे. आश्चर्य म्हणजे आजही पाश्चात्य जगात शस्त्रक्रियेदरम्यान कवळीचं काय करायचं याचे नियम अस्तित्वात नाही.
याबाबतीत भारत हा पुढारलेला म्हणावा लागेल, कारण अनेस्थेशिया देण्यापूर्वी आपल्याकडचे डॉक्टर शरीरावर, तोंडात अशी कोणतीही गोष्ट नाही ना हे कसून तपासतात. हा साधा नियम पाश्चात्य जगात मात्र नाहीय.