computer

३० वर्षे चक्क ३ सरकारी नोकऱ्या सांभाळणारा महाभाग...त्याला पोलीस का शोधत आहेत ?

भारतात सरकारी नोकरी हेच सर्वात चांगले करियर समजले जाते. खासगी नोकरीतली असुरक्षितता आणि बिजनेसमधली रिस्क दोन्ही इथे नसते. दर महिन्याला पगार होत असतो. मधूनमधून वेतन आयोग येतात आणि पगारही वाढतो. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे लोकांच्या अंगवळणी पडले असल्याने कामाचेही टेन्शन नसतेच.  सगळे कसे सुखासुखी सुरू असते अशी समाजाची धारणा आहे. एकप्रकारे ते बरोबर पण आहे. सरकारी नोकरी असली म्हणजे चांगले स्टेट्स, चांगला पगार, सुखसोयी सगळे मिळते म्हणून सर्वांचा ओढा तिकडे दिसून येतो. आजच्याच बातमीनुसार आय आय टी मुंबईमध्ये बी.टेक. आणि एम. टेक. केलेल्या श्रावणकुमारने धनबादच्या रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेनर म्हणून नोकरी स्वीकारली आहे. 

पण सरकारी नोकरी मिळवणे सोपे नाही ना राव!! मुलं स्पर्धा परिक्षांचा १०-१२ तास अभ्यास करतात तरी सगळ्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. यात काही बहाद्दर मात्र २-३ परीक्षा पास होतात, तितक्याच नोकऱ्या मिळतात आणि ते त्यांतला त्यांना आवडणारा पर्याय निवडतात. 

बिहारमध्ये एका माणसाचे असेच झाले होते. त्याला लागोपाठ ३ सरकारी नोकऱ्या मिळाल्या.  पण या भाऊने त्यातल्या दोन सोडल्या नाहीत. भरीसभर म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून तो चक्क तिन्ही नोकऱ्या करतोय. सुरेश राम असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो बिहारच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर आहे, तसेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये आहे आणि पाटबंधारे खात्यात आहे. अशा या तीन नोकऱ्या त्याच्याकडे आहेत. 

(सुरेश राम)

१९८८ साली ज्युनियर इंजिनियर म्हणून या भाऊचे करियर सुरू झाले. नंतर त्याला वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटकडून अपॉइंटमेंट लेटर आले. नंतर तिसरा जॉबपण मिळाला. असे तीन जॉब एकाच वेळी त्याच्याकडे होते. तर त्यापैकी दोन जॉब सोडून कुठलाही एक चांगला जॉब करावा असे कुणाला पण वाटले असते, पण गड्याने तिन्ही जॉब करायचे ठरवले. ३० वर्षांपर्यंत ही गोष्ट कुणालाच समजली नाही. त्याला नियमित प्रमोशन्स मिळत होते. दरवर्षी पगारवाढही मिळत होती. पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येतंच राव!!

बिहार सरकारने comprehensive financial management system सुरू केली. याचा अर्थ असा की सगळी पेमेंट संबंधी कामे आता ऑनलाइन झाली. त्यासाठी आधार कार्ड नंबर, पॅन नंबर CMFS ला ट्रांसफर करावे लागले आणि इथेच गोची झाली ना राव!! त्या भाऊचे सगळे कारनामे बाहेर आले. 

त्याच्यावर केस दाखल झाली आहे. सद्या तो फरार असला तरी एकाचवेळी तीन नोकऱ्या करणारा हा गडी लवकरच जेलमध्ये खड्या फोडताना दिसेल.

सबस्क्राईब करा

* indicates required