चक्क फुटबॉलच्या मैदानावर त्याने ३०० झाडे का लावली ? कारण विचार करायला भाग पाडेल !!

हवामान बदल ही जगापुढील सर्वात मोठी समस्या ठरत आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जगभरातील पर्यावरणप्रेमी नेहमी नवनविन प्रयोग करत असतात, पण नुकत्याच झालेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने मात्र सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्विस आर्टिस्ट क्लॉस लिटमन यांनी एका फुटबॉल मैदानाचे रूपांतर चक्क जंगलामध्ये केले आहे. संपूर्ण मैदानावर त्यांनी जवळपास 300 झाडे लावली आहेत. मॅक्स पेंटर या कलाकाराने 30 वर्षापूर्वी काढलेल्या पेंटिंग पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
काही दिवसांपूर्वी फुटबॉलचे मैदान असलेल्या जागेत आता जंगल दिसत. क्लॉस यांनी त्या मैदानात जगभरातील वेगवेगळी झाडे आणून लावली आहेत. क्लॉस म्हणतात की जगाचे लक्ष हवामान बदलसारख्या महत्वाच्या विषयाकडे ओढले जावे म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आहे. हवामानातील हे बदल जर असेच सुरु राहिले तर एके दिवशी झाडे फक्त शोसाठी कुंडीत लावलेली दिसतील.
मंडळी, ही झाडे त्या मैदानावर कायम राहणार नाहीत. जगाचे लक्ष वेधले जावे म्हणून केलेला हा तात्पुरता प्रयोग आहे. जोवर ही झाडे तिथे आहेत तोपर्यन्त ऑस्ट्रीयन टीमचे फुटबॉल सामने दुसऱ्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत ही झाडे सगळ्यांना त्या मैदानावर पाहता येणार आहेत. नंतर ती झाडे तिथून हलवण्यात येणार आहेत.
लेखक : वैभव पाटील.