भोपाळचे लोक बेडकांचा घटस्फोट करतायत !! त्या मागचं कारण तुम्हाला पटतंय का पाहा?

जून उलटून गेला तरी पाऊस आला नाही तर लोक मग वेगवेगळी शक्कल लढवायला लागतात. यापैकीच एक म्हणजे बेडकांचे लग्न लावणे!! हा मजेशीर प्रकार कुठून आला माहीत नाही पण जेव्हा पावसाच्या मोसमातही पावसाचे चिन्ह दिसत नाही तेव्हा देशभरात बेडकांचे लग्न लावण्यात येते. धुमधडाक्यात बेडकांचे लग्न लावून देण्यात येते.
जून उलटला आणि पावसाने मनावर घेतले आणि देशभर धो धो करून पाऊस कोसळू लागला. देशभरातील विविध शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. देशभरात अनेक ठिकाणी बेडकांची लग्ने लागली होती. मध्य प्रदेशातील भोपाळ इथे पण याच प्रकारे बेडकांचे लग्न लागले होते.
सध्या भोपाळच्या गल्यांमध्ये पाणी साचले आहे. पुराने जोर धरला आहे. यावर काय उपाय करावा याचा विचार तिथले प्रशासन करतच असेल, पण स्थानिकांनी मात्र यावर भन्नाट उपाय शोधून काढला. ज्याप्रकारे बेडकांचे लग्न लावले म्हणून पाऊस पडला तसेच त्यांचा घटस्फोट केला तर पाऊस कमी होईल असे त्यांना वाटले.
ही आयडीया लोकांना चांगलीच आवडली आणि सगळे कामाला लागले. आता ज्यांचे लग्न लावले ती बेडके सापडणे शक्य नव्हते राव!! मग काय मातीच्या दोन प्रतिकृती बनविण्यात आल्या आणि त्यांचा रीतसर घटस्फोट करण्यात आला.
व्यवस्थित सगळी पूजा करून बेडकांचा घटस्फोट झाल्यावर त्यांचे पाण्यात विसर्जन करण्यात आले. आता एवढे केल्यावर तरी देव ऐकेल आणि आता थोडा आराम घेऊन पाऊस थांबेल अशी भोपाळवासीयांना अपेक्षा आहे.
लेखक : वैभव पाटील.