८३ व्या वर्षात मास्टर्सची डिग्री मिळवणारे आजोबा
असं म्हणतात की माणसाचे शिक्षण आयुष्यभर सुरू असते. पण प्रत्यक्षात सुद्धा काही लोक बरीच वर्षे शिकत असतात. पन्नाशीत पदवी पास झालेत अश्या बातम्या आपण वाचत असतो. अशावेळी समाज काय विचार करेल या गोष्टीचा विचार न करता लोक शिकत असतात. पण आज ज्या आजोबांची आम्ही ओळख करून देणार आहोत त्यांनी तब्बल ८३ वर्षाच्या वयात मास्टर्सची डिग्री घेतली आहे!!
सोहन सिंग गिल यांनी जालंधर विद्यापीठातुन मास्टर्स केले आहे. गिल यांनी १९५७ साली खालसा कॉलेज माहिलपूर येथुन पदवीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेजमधुन शिक्षकाचा कोर्स केला आणि ते शिकवायला लागले. यामुळे त्यांचे पुढील शिक्षण अपूर्ण राहिले.
ते सांगतात की “मास्टर्स करण्याची माझी इच्छा होती पण मी केनियाला निघून गेलो आणि तिथे शिक्षक म्हणून काम करू लागलो. १९९१ साली मी भारतात परत आलो आणि २०१७ पर्यंत शिकविण्याचे काम करत होतो. यादरम्यान अनेकवेळा पोस्ट ग्रेजुएशन करण्याचा विचार आला पण काहीना काही कारणाने तो रखड़ला”.
दोन वर्षापूर्वी त्यांनी डिस्टन्स एजुकेशन म्हणून मास्टर्सला एडमिशन घेतले. इंग्रजी आवडता विषय असल्याने त्यानी इंग्रजीत आपले मास्टर्स पूर्ण केले.
मंडळी, या वयात सुद्धा त्यांचा उत्साह दांडगा आहे. मास्टर्स झाल्यावर लहान मुलांसाठी पुस्तके लिहिण्याची आता त्यांची इच्छा आहे.
लेखक : वैभव पाटील




