computer

ट्रम्प तात्यांकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पाहणारी ही १६ वर्षांची मुलगी आहे तरी कोण ?

आठवड्याभरापासून ग्रेटा थुनबर्ग या अवघ्या १६ वर्षाच्या मुलीची जगभर चर्चा सुरु आहे. गेल्या २ दिवसापासून तर या चर्चा आणखी वाढल्या आहेत, कारण या लहानग्या मुलीची गाठ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पडली आहे.

ग्रेटा थुनबर्गने जागतिक तापमान वाढीसंदर्भात आंदोलन उभं केलं आहे. सोमवारी झालेल्या युनायटेड नेशन्सच्या संमेलनात तिने जीव तोडून आपला मुद्दा मांडला आणि कळकळ व्यक्त केली. यावेळी तिने जगातील सर्व बड्या नेत्यांना उद्देशून म्हटलं की “तुम्ही आमच्या संपूर्ण पिढीचा विश्वासघात केला आहे. तुमची हिम्मत कशी झाली?.”

‘तुमची हिम्मत कशी झाली?’ हे वाक्य तिने वारंवार उच्चारल्यानंतर ते सोशल मिडीयावर व्हायरल झालं आणि #HowDareYou हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला.

या भाषणाचा व्हिडीओ शेअर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी मुक्ताफळे उधळली. ते म्हणाले की “आपल्या उज्वल भविष्याकडे बघणारी ही तर फारच आनंदी मुलगी वाटत आहे”. या वाक्याच्या अगदी विरुद्ध तिचं भाषण होतं. “आपण (माणूस) लवकरच लुप्त होण्याच्या मार्गावर आहोत” असं तिने आपल्या भाषणात म्हटलं.

यानंतर नेटिझन्सनी नेहमीप्रमाणे ट्रम्प तात्यांना झोडपून काढलं. थोड्याचवेळात एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. या व्हिडीओत ग्रेटा थुनबर्ग ट्रम्प यांच्याकडे ‘खाऊ की गिळू’ या नजरेने बघत आहे. ट्रम्प यांच्या बद्दलचा प्रचंड संताप तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.

मंडळी, या सगळ्यात ग्रेटा थुनबर्गची चर्चा आणखी वाढली आहे. यानिमित्ताने तिच्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरेल.

कोण आहे ग्रेटा थुनबर्ग ?

ग्रेटा थुनबर्गची आई ऑपेरा सिंगर आहे तर वडील अभिनय क्षेत्रात आहेत. आपल्याकडे स्टार किड्स काय करतात हे तुम्हाला माहित आहेत, पण ग्रेटाने वेगळंच पाऊल उचललं. पर्यावरण हानी, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या विषयांना तिने हात घातला. २०११ साली तिला पहिल्यांदा जागतिक तापमानवाढीबद्दल समजलं. या गंभीर समस्येला सोडवण्यासाठी आपण काहीच का करत नाही हा प्रश्न तिला त्रास देत होता.

३ वर्षांनी तिने खाणंपिणं सोडलं आणि तणावाखाली राहू लागली. तेव्हा तपासणीत समजलं की तिला एस्परर सिंड्रोम, ऑबेसिव्ह-काम्लासिव्ह डिसॉर्डर, सिलेक्टिव्ह म्युटिझम हे तीन आजार आहेत. हे तीनही मानसिक आजार आहेत. एस्परर सिंड्रोममध्ये माणसाला इतरांशी संपर्क ठेवण्यात आणि व्यवहारात अडचण येतात. ऑबेसिव्ह-काम्लासिव्ह डिसॉर्डरमुळे विशिष्ट दिनक्रम वारंवार करण्याची सवय लागते, जसे की हात धुणे, दार लावलंय की नाही हे सतत पाहत राहणे, इत्यादी. सिलेक्टिव्ह म्युटिझम आजारात माणसाला काही विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट माणसांसमोर बोलता येत नाही.

ग्रेटा या आजारांना वरदान मानते. सिलेक्टिव्ह म्युटिझमबद्दल बोलताना तिने म्हटलं की “या आजारामुळे मी गरजेपुरतंच बोलते.”

२०१८ साली तिने स्वीडनच्या संसद भवनाच्या रोखाने जागतिक तापमानवाढी विरोधात शाळेच्या मुलांचा मोर्चा काढला होता. तिच्या मोर्चाला 'Fridays For Future' म्हणतात. उज्ज्वल भविष्यासाठी शुक्रवारचा एक दिवस शाळा बुडवून विद्यार्थी निदर्शने करतात. यात मुख्यत्वे तरुण आणि विद्यार्थी सामील होत असल्याकारणाने त्याला Youth for Climate आणि Youth Strike 4 Climate असेही म्हटले जाते.

ग्रेटाने सुरु केलेले मोर्चे, आंदोलनं आणि तिच्या भाषणामुळे तिच्या विषयी चर्चा होऊ लागली. डिसेंबर २०१८ ला तिने पोलंड येथे भरलेल्या युनायटेड नेशन्स संमेलनात भाषण केल्यानंतर ती जगभर पोहोचली.

अवघ्या १६ व्या वर्षी या महत्वाच्या विषयावर तिने पाऊल तर उचललं, पण तिची शाळा बुडाली. तिच्या शिक्षकांमध्ये अजूनही याबद्दल एकमत नाही. काही शिक्षक तिच्या पाठीशी उभे आहेत तर काही विरोधात. तिच्या वडिलांनाही तिचं आंदोलन, मोर्चे आवडत नव्हते पण या कामात तिला समाधान मिळत आहे हे बघून त्यांनी तिला पाठींबा दिला.

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी म्हणतात त्याप्रमाणे ग्रेटाने आपल्या घरापासून सुरुवात केली. दैनंदिन जीवनातल्या ज्या ज्या गोष्टींमुळे वातावरणात कार्बन उत्सर्जन होते त्या सर्व गोष्टी तिने कमी केल्या, ती स्वतः शाकाहारी झाली, याशिवाय मोठं पाऊल म्हणजे तिने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी विमान प्रवास पूर्णपणे बंद केला.

ज्यावेळी अमेरिकेला, युनायटेड नेशन्सच्या संमेलनात जायची वेळ आली तेव्हा देखील तिने विमान प्रवास टाळून समुद्रमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या नौकेने ती इंग्लंडच्या पायमाउथ बंदरावरून अटलांटिक महासागर ओलांडून न्युयॉर्कला पोचली. या नौकेतही इकोफ्रेंडली गोष्टींचाच समावेश होता.

तर मंडळी, १६ वर्षांच्या या चिमुरडीने आजवर फारशा गंभीरपणे न घेतलेल्या विषयाला बोलतं केलेलं आहे. तिच्या या कामातून काहीतरी चांगलं घडावं हीच इच्छा आहे.  

सबस्क्राईब करा

* indicates required