यावर्षीच्या 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ दि इयर' मागची अफलातून गोष्ट जाणून घ्या !!

लंडनच्या ‘नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे दरवर्षी फोटोग्राफी स्पर्धा भरवण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचे निकाल आलेले आहेत. यावेळी ज्या फोटोमुळे “वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ दि इयर’ पुरस्कार मिळाला त्या फोटोने जगाचं लक्ष वेधून घेतलंय. हा पहा तो फोटो.
या फोटोने स्पर्धेतल्या १०० देशांमधून आलेल्या ४८००० फोटोंना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.
काय आहे या फोटोत ?
खारीच्या जातीतील मार्मोट नावाचा प्राणी जीवाच्या आकांताने पळतोय आणि त्याचा पाठलाग करणारा तिबेटीयन कोल्हा अगदी हाताच्या अंतरावर आला आहे.
कोण आहे तो फोटोग्राफर?
(योंगकिंग बाओ)
योंगकिंग बाओ या चीनच्या फोटोग्राफरने हा फोटो घेतला आहे. त्याने या फोटोला ‘दि मोमेंट’ नाव दिलंय. नॅच्युरल हिस्ट्री म्युझियमने पुरस्कार जाहीर करताना म्हटलं की या फोटोतून ‘निसर्गातील नाट्यमयता आणि तीव्रता जाणवते.’ याखेरीज त्यांनी हेही नमूद केलं की दि मोमेंट मध्ये टिपलेल्या क्षणात एकाचवेळी भीती आणि विनोद या दोन टोकाच्या भावना टिपल्या गेल्या आहेत.
फोटोमागची गोष्ट.
तिबेटच्या जवळ असलेल्या चीनच्या छिंगहाय प्रांतात हा क्षण टिपण्यात आला. फोटोत दिसणारा कोल्हा हा फक्त तिबेट आणि लडाख बघतच आढळतो. फोटोत दिसणाऱ्या क्षणामागे एक छोटी गोष्ट पण आहे. फोटोत खरं तर कोल्हीण आहे. आपल्या ३ पिल्लांना अन्न मिळावं म्हणून ती मार्मोटची शिकार करत आहे. या अर्थाने संघर्ष हा दोन्ही बाजूला आहे असं आपण म्हणू शकतो. कोल्हीण मार्मोटला पकडण्यात यशस्वी झाली का हे मात्र समजू शकलेलं नाही.
तर मंडळी, कसा वाटला हा अफलातून फोटो? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या..