या जोडप्याला होणार आहे चक्क २२ वं मूल!! कसं मॅॅनेज करतात हे सगळं?

पूर्वीच्याकाळी जेव्हा हम दो हमारे दो पद्धत अजून यायची होती तेव्हा प्रत्येक घरात मुलांचा आकडा हा साधारणपणे ५ च्या पुढे असायचा. आज एका मुलाला सांभाळताना आईवडिलांच्या नाकी नऊ येतात. मुलांची संख्या कमीतकमी १ ते जास्तीतजास्त ३ एवढी असते, पण जगात असेही काही आईवडील आहेत ज्यांनी अजून पण तीच जुनी परंपरा सुरु ठेवली आहे.
आज मुलांचा विषय काढण्यामागचं कारण म्हणजे इंग्लंडच्या एका जोडप्याला लवकरच २२ वं मुल होणार आहे.
सू (वय वर्ष ४४) आणि नोएल रॅडफोर्ड यांना आधीच २१ मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबाला ब्रिटनचं सर्वात मोठं कुटुंब म्हटलं जातं. नुकतंच त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवरून आपल्या आगामी २२ व्या मुलाची घोषणा केली. सू म्हणते की तिला यावेळी मुलगा हवा आहे. गेल्यावेळी तिला मुलगी झाल्याने मुलींची संख्या एकूण ११ झाली आहे. जर मुलगा झाला तर ती संख्या पण ११ होईल.
नोएलने ९ व्या मुलाच्या जन्मानंतर नसबंदी करून घेतली होती, पण दोघांनाही आणखी मुलं हवी होती. म्हणून नसबंदीची प्रक्रिया उलटवण्यात आली. त्यावेळचा ९ चा आकडा आता २२ वर पोचला आहे. त्यांचा सर्वात मोठा मुलगा क्रिस आणि मुलगी सोफी हे आता वेगळे राहतात. सोफीला ३ मुलं आहेत. या अर्थाने पन्नाशीच्या आतच सू आणि नोएल हे आजीआजोबा पण झालेत.
एवढ्या मोठ्याप्रमाणात मुलं आहेत म्हटल्यावर खर्च आणि काम पण प्रचंड असतं. दोघांनी मोठं घर खरेदी करावं लागलं आहे. रोजच्या साफसफाईमध्ये ३ तास जातात. संपूर्ण महिन्याच्या किराणा सामानासाठी तब्बल ३५० पाऊंड खर्च येतो. भारतीय चलनाप्रमाणे तब्बल ३२,००० रुपये.
तर मंडळी, तुमच्या ओळखीत सू आणि नोएलला टक्कर देणारं कोणी आहे का ?