ओडीसा सारख्या गरीब राज्याने देशाला दिलेल्या ३ महिला हॉकीपटू !!

ओडिसा हे भारतातील असे राज्य आहे जे नैसर्गिक दृष्ट्या संपन्न आहे तरीही आज भारतातील सर्वात गरीब राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याची अर्थव्यवस्था कणखर नसल्यामुळे अर्थातच ओडीसा राज्य जास्त खर्च मुलभूत गरजांवरती करत असते. तरीही या राज्याने क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः हॉकीमध्ये आपला नावलौकिक मिळवलेला आहे.
नुकतंच भारतीय महिला हॉकी संघाने स्वतःला सिद्ध करत २०२० च्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलंपिक खेळांमध्ये स्थान मिळवले आहे. या महिला संघामध्ये एकूण तीन महिला खेळाडू या ओडिसा या राज्यातील आहेत. या लेखामध्ये आपण या तीनही खेळाडूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत....
१. दीप ग्रेस एक्का
एक्का ही या संघामध्ये डिफेंडरचे काम करते. ती २०१८ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळत आलेली आहे. तिचं वय २५ आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तिने तिचा खेळातला प्रवास सुरु केला होता. तिच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये संघाला रौप्यपदक मिळवून देण्यामध्ये तिने मदत केली होती. तिच्या कामगिरीमुळे तिच्यावरची जबाबदारी वाढविण्यात आलेली आहे. जपान येथे झालेल्या २०१७ च्या एशिया कपमध्ये तिची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. २०१७ ला त्यांच्या संघाने एशिया कपमध्ये महिलांच्या प्रकारांमध्ये सुवर्णपदकही पटकावले होते. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०१६ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा होता.
२. लीलिमा मीन्झ
लीलिमा सुंदरगड या जिल्ह्याची रहिवासी आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण ६० असे खेळाडू आहेत ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओडिसाचे नेतृत्व केलेले आहे. लीलिमानेही भारताला अर्जेंटिनाच्या दौऱ्यामध्ये यश मिळवून देण्यामध्ये मदत केली होती. लीलिमा २०१३ पासून भारतीय महिला हॉकी संघाची सदस्य आहे.
२०१४ मध्ये मलेशिया विरुद्ध झालेल्या लढतींमध्ये भारताने मलेशियाचा ६-० असा एकतर्फी पराभव केला होता त्या संघांमध्ये लीलिमा सदस्य होती. तिच्या या खेळामुळे तिला २०१४ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. पंचवीस वर्षाची ही मुलगी भारतीय संघामध्ये मिडफील्डर म्हणून भूमिका निभावत आहे. 2016 ला झालेल्या रिओ ऑलंपिक गेम्समध्येही तिने दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.
३. नमिता टोप्पो
गेल्या काही दिवसांपासून नमिता भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होती. तिच्या दुखापतीमुळे तिला विश्रांती देण्यात आली होती. नमितानेही वयाच्या सतराव्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली. तिने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. २०१६ च्या ऑलंपिककमध्ये नमिताही लीलिमा सोबत मिडफील्ड सांभाळत होती. या स्पर्धेमध्ये तिने उत्तम कामगिरी बजावलेली आहे.
लेखक : रोहित लांडगे