computer

देशातलं एकमेव फायर म्युझियम आपल्या पुण्यात आहे...पत्ता बघून घ्या !!!

कधीकधी आपल्याच गावात, आसपास काय नवं आलंय याची आपल्याला खबरबातच नसते. आता प्रत्येक गाव आणि गल्लीत पोचणं बोभाटाला शक्य नाही. पण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पुण्याच्या बाबतीत असं म्हणून कसं चालेल? म्हणूनच आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी पुण्यातलं एक नवीन ठिकाण घेऊन आलोय. आजवर तिथं कधी गेला नसाल तर आता नक्की जा...

तसं पुणे तिथे काही उणे नाहीच. मग पर्यटनाच्या बाबतीत तरी ते कसे मागे असेल? पण काय आहे,  पर्वती, सारस बाग, तुळशीबाग, वस्तुसंग्रहालयं हे आता जुनं झालं.  आता नवीन आहे ते एरंडवणे इथलं फायर म्युझियम!!  " कै.केशव राव नारायणराव जगताप फायर ब्रिगेड म्युझियम " असं या संग्रहालयाचं नाव आहे. याचं अनावरण २०१६ मध्ये करण्यात आलंय. पत्ता विचाराल तर हे संग्रहालय एरंडवण्याच्या फायर स्टेशनजवळ आहे. महाराष्ट्रात सोडा, गूगल सर्च केलात तर भारतातही दुसरं फायर ब्रिगेड म्युझियम सापडत नाही.  

काय काय आहे इथे?

तशी या म्युझियमची एकूण दोन मुख्य दालनं आहेत. पहिल्या दालनात दुर्मिळ असा एक " रोल्स रॉयल्स " कंपनीने तयार केलेला फायर ट्रक ठेवण्यात आला आहे. या ट्रकचे नाव आहे 'डेनिस'. या ट्रकची खासियत म्हणजे १९६१मध्ये आलेल्या पानशेत धरणात लोकांना वाचवण्यात या गाडीची फार मोठा उपयोग झाला होता.  या दालनात फायर ब्रिगेडने वर्षानुवर्ष केलेल्या मदत कार्याविषयी  मराठीत बरीच माहिती दिली आहे. 

याच मजल्यावर दुसऱ्या दालनात ब्रिटिशांच्या काळात वापरात असलेली अनेक उपकरणे ठेवण्यात आलेली आहेत. त्यात अनेक जुन्या पद्धतीची हेल्मेट्स, आग विझवताना घालण्याचे सूट्स आणि दिवे ठेवले आहेत. यांतल्या काही वस्तू अगदी १९३०सालातल्या आहेत. पाण्याचे फवारे मारणाऱ्या तोट्यांचे इतके नमुने आहेत की ते पाहून गेल्या पन्नास वर्षांत त्यांच्यात किती बदल झाले हे लगेच लक्षात येतं. झालंच तर हाताने वाजवायचा भोंगा, इतर आग विझवायची  ब्रिटिश काळातली साधने, वायरलेस सेट्स, सुरक्षा पट्टे, रबर बोटी, केमिकल सूट्स, बॉडी कूलर सूट्स आणि एक ॲल्युमिनियम ॲस्बेस्टॉसचा सूटदेखील या संग्रहालयात ठेवला आहे. या सगळ्याच वस्तू पुण्यातल्या नाहीत. काही प्राचीन वस्तू देशभरातल्या अग्निशामक दलांच्या ऑफिसातून आणल्या गेल्या आहेत. 

या सगळ्या जुन्यापुराण्या वस्तूंसोबतच या संग्रहालयातल्या भिंतींवर लावलेले देशभरातल्या वेगवेगळ्या आगी विझवण्याच्या मोहिमांचे फोटो पण तितकेच मनोहारी आहेत. सोबत या मोहिमांची माहिती आणि इतिहास दिला आहेच. 

तसं पाहायचं तर या म्युझियमचा आकार लहान आहे.  पण लंडनमधल्या फायर ब्रिगेड म्युझियमच्या धर्तीवर तयार केल्या गेलेल्या या म्युझियममध्ये तुम्हांला  अत्यंत महत्त्वाची माहिती मिळते. इथे गाईड नाहीत, पण इथले कर्मचारी पुणेकर असूनही येणाऱ्या लोकांना मदत करतात.  त्यामुळे एकदातरी या म्युझियमला भेट द्या असंच आम्ही तुम्हाला सुचवू..

पत्ता:- एरंडवण गावठाण, निसर्ग हॉटेलच्या जवळ, मेहेंदळे गॅरेज जवळ, एरंडवण.

वेळ:- सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत 

एन्ट्री फीस:- मोफत 

संपर्क:- 0202546833

 

लेखक : रोहित लांडगे

सबस्क्राईब करा

* indicates required