computer

स्त्रियांच्या शरीराचं ३६:२४:३६ माप आलं कुठून ? हेच परफेक्ट माप आहे हे कोणी ठरवले?

३६:२४:३६!! आता हे काय आहे हे आम्ही सांगायची गरज नाही. हो ना? मुलगा वयात आल्यानंतरच्या काही वर्षांतच या संख्या म्हणजे स्त्री सौंदर्याचं स्टँडर्ड माप आहे हे सतत कोणीतरी सांगतच असतं. आज या संख्यांचा स्त्रीच्या आकाराशी जोडलेला संबंध काय आहे आणि तो किती पोकळ आहे हे आज वाचू या!  या लेखाचे गांभीर्य हा लेख पूर्ण वाचल्यावर वाचकाला समजणार आहेच. त्यासाठी वाचकांना एक विनंती : आपल्या प्रतिक्रिया हा लेख संपूर्ण वाचून कराव्यात.

पुरुषांच्या नजरेतून स्त्रीच्या शरीराचे  लक्षणीय भाग म्हणजे- छाती, कंबर आणि नितंब! शरीराच्या या तीन भागांचे माप आणि त्यांचे एकमेकांसोबतचे प्रमाण हाच सौंदर्याचा मापदंड ठरवला गेला आहे. पण हेच परफेक्ट माप आहे हे कोणी ठरवले?  याबाबत खोलवर अभ्यास करून माहिती गोळा केली तर हे लक्षात येते, की हा केवळ पुरुषप्रधान संस्कृतीने केलेला काल्पनिक बनाव आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत 'स्त्री' ही वस्तू समजण्यात आल्यामुळे त्या वस्तूला मापात बसवण्यात आले. आता हेच बघा ना, बाई ३६:२४:३६ या मापात असायला हवी हे सगळ्यांना माहित आहे, पण पुरुषांच्या सौंदर्याचं असं आकड्यात केलेलं वर्णन कुठे आहे का?  असो, पुरुष 'उपभो़क्ता' आणि 'स्त्री' त्याची वस्तू असेच वर्षानुवर्षे शिकल्यावर 'चांगल्या' वस्तूचे माप व्यवहारात संख्येद्वारे येणे अटळ होते. 

हा लेख आणखी पुढे वाचण्याआधी आपण समजून घेऊ या की ३६:२४:३६ म्हणजे नेमकं काय?

ही सर्व मापे इंचात आहेत. यापैकी ३६ हा आकडा स्त्रीदेहाच्या छातीचं आणि नितंबाचं माप आहे, तर २४ हे कंबरेचं माप आहे. थोडक्यात शरीराची कमनीयता आकड्यात सांगायची झाल्यास अशी वर्णन केली जाते. स्त्रीच्या शरीराला अशी लेबले लावणे हा पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांचा हक्क समजला जातो. हा समज थोडीथोडकी नाही, तर शेकडो वर्षे दर पिढीमागे पसरत गेला आणि हेच ते सौंदर्यवाचक परिमाण या तर्काला पुष्टी मिळत गेली. याच समजातून स्त्रीचे वर्णन वस्तूसारखे करण्याची प्रथा आजही आहे . 

चला, इथे आपण तर्क थांबवू या आणि व्यावहारीक संकल्पनेकडे जाऊ या! प्रश्न असा आहे की हे आकडे वापरात आणले कोणी आणि कधी? 

फॅशनचा जमाना अठराव्या शतकात जोरात सुरु झाला. युरोपियन देशात बिकीनी सारख्या वस्त्रांची जाहिरात कमनीय देहावर चांगली होते हे लक्षात आल्यावर ३६:२४:३६ फॉर्म्युलाचा वापर सुरु झाला. या अगोदरच्या शतकात अनेक थोर चित्रकारांची चित्रं बघितली तर त्यांची सर्व मॉडेल्स 'बेढब' म्हणावी अशा रुपाची आहेत. याचं कारण असंही आहे की सौंदर्याच्या व्याख्या गरजेप्रमाणे बद्लत असतात. रूंद नितंब आणि कंबर असणारी आणि छातीचे माप मोठे असणारी स्त्री एकेकाळी सुंदर समजली जायची. जास्तीतजास्त मुलांना जन्म देऊन त्यांचे स्तनपान करू शकेल अशी स्त्री सुंदर असा समज तेव्हा रुढ होता. परदेशातली उदाहरणं जाऊ द्या, आपल्या अनेक संस्कृत श्लोकांमध्ये देवतांचा उल्लेख 'विपुल कटीतटी' असा आहे. आता बोला!! थोडक्यात सांगायचं तर काळाच्या गरजेप्रमाणे सौंदर्याचं माप बदलत जातं.

पण अशा या परफेक्ट मापाचं शरीर सगळ्यांचं का नसतं? नाही, असायला हवं असं आम्हांला मुळीच म्हणायचं नाही, पण शरीराचं माप आणि अंगातल्या केमिकल्सचा काय लोचा आहे ते आधी जाणून घेऊयात. शरीरात कुठे आणि कशी चरबी साठेल हे मुख्यत: शरीरातल्या हार्मोन्सवर अवलंबून असतं.

स्त्री वयात आल्यावर, म्हणजेच मासिक पाळी सुरु झाल्यावर स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन या हार्मोनचा स्त्राव वाढतो. हा स्त्राव स्त्रीच्या शरीरावर मेद किंवा चरबी कुठे जमा होईल हे ठरवत असतो. या स्त्रावासोबत टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन पण स्त्रवत असते. शरीरातले स्नायू  बनवण्यामागे या हार्मोनचा सहभाग असतो. गंमत अशी आहे की पुरुषांमध्येही टेस्टोस्टेरॉन स्त्रवत असतं. फरक इतकाच आहे की पुरुषांच्या तुलनेत केवळ १/१० स्त्राव स्त्री शरीरात होत असतो. या फरकामुळे स्त्रीच्या नितंब आणि स्तनावर चरबी साठते. पाळी येणं बंद झाल्यावर हे स्त्राव वाहणं बंद होतं आणि सर्व शरीरावर चरबी जमा होऊन स्त्री स्थूल दिसायला लागते. ३६:२४:३६ या मापाचा आणि तारुण्याचा संबंध आहे तो असा!!

गेल्या काही वर्षात हा ३६:२४:३६ चा फॉर्म्युला काळापलीकडे गेला आहे असे म्हणावे लागेल.  कारण फॅशनच्या नव्या युगात ३६:२४:३६ पेक्षा झीरो फिगर जास्त महत्त्वाची झाली आहे. तरीही फॅशन युगात शरीरांचे आकार आणि मापे कशी असतात ते आता बघू या!!

रेक्टँग्युलर - नितंब आणि छातीपेक्षा कमरेचे माप कमीतकमी ९ इंचानी कमी असते. मेद सर्व शरीरावर एकसारखा पसरलेला असतो. उभ्या फूटपट्टीसारखा शरीराचा आकार दिसतो. 

इन्व्हर्टेड त्रँगल - रुंद खांदे, त्यामानाने कंबरेचे माप बरेच कमी आणि छातीचे माप जास्त अशा देहाचा आकार उलट्या त्रिकोणासारखा दिसतो. हा एखाद्या अ‍ॅथलेटसारखा आकार असतो.  मांड्या आणि पाय यांचा आकार कमी असतो. 

स्पून - या देह प्रकारात छातीचे माप नितंबाच्या मापापेक्षा लक्षणीयरित्या कमी असते. शरीरावर मेदाचे प्रमाण इतर आकारांपेक्षा जास्त प्रमाणात असते. 

अवर ग्लास किंवा एक्स बॉडी - या प्रकारात छाती आणि नितंबाचे माप  कंबरेच्या मापापेक्षा बरेच जास्त असते. परिणामी शरीराचा आकार वाळूच्या घड्याळ्यासारखा दिसतो. 

सध्या काळ बदलला असला तरी स्त्रीच्या शरीराकडे 'वस्तू' म्हणून बघण्याची सामाजिक नजर बदलेली नाही. गंमत म्हणजे अमुकतमुक आकाराचा देह असावा या इच्छेखातर धडपडणार्‍या महिलांची संख्याही कमी नाहीय. पण त्याचसोबत 'मी आहे तशी आहे 'असा अभिमानास्पद दावा करणार्‍या महिलांची संख्या पण वाढत जात आहे. एकेकाळी फक्त कमनीय शरीरांना नजरेत ठेवून वस्त्र प्रावरणे बनवणार्‍या कंपन्या आता एक्स्ट्रा लार्ज साईजचे कपडे बनवतात आणि त्या साईजच्या मॉडेल्स घेऊन त्यांचे फॅशन शोजही करतात. 

काही असो, आपण सगळेजण ३६:२४:३६ या मापातून बाहेर कधी येणार हा महत्वाचा प्रश्न आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required