शूज नाही म्हणून ती पायांना बँडेज बांधून धावली...तब्बल ३ सुवर्णपदक जिंकले मुलीने !!

काहीवेळा लहान मुलं देखील आपल्याला खूप काही शिकवून जातात. आजच्या बातमीतील ही मुलगी अख्ख्या जगाला जिद्दीचे नवीन धडे देत आहे.
काय घडलंय ?
फिलिपाईन्सची ११ वर्षांची रिया बुल्लोस हिने शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटरच्या शर्यतींमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. तिन्ही प्रकारांमध्ये सुवर्ण मिळवल्यावर ती एका जागी शांत बसून खेळ पाहत होती. तितक्यात एका व्यक्तीने तिचे पाय बघितले. तिच्या पायात शूज नव्हते. शूजच्या जागी तिने बँडेज गुंडाळला होता. त्यावर तिने हातानेच नाइकी कंपनीचा लोगो काढला होता. हा पाहा तिचा पाय.
रियाच्या ट्रेनरने माहिती दिल्याप्रमाणे, ‘या शर्यतीसाठी तिने खूप मेहनत घेतली. तिला फक्त पायात शूज नसल्याने अडचण येत होती’. तिने या समस्येवर पण मात केल्याचं तिच्या सुवर्णपदकावरून दिसून येत आहे.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रियाला शूज देण्याची तयारी दाखवली. काहीजणांनी तर नाईकी कंपनीला रियाला मदत करण्याचं आवाहन केलं.
सोशल मिडीयाच्या प्रतिसादामुळे एक चांगली गोष्ट घडली. काही दिवसांनी फिलिपाईन्सच्या स्थानिक वृत्तपत्राने रियाचा फोटो प्रसिद्ध केला. त्यात ती एका शोरूममध्ये नवीन शूज घेताना दिसत आहे.
मंडळी, रियाने पायात शूज नसूनही ३ स्पर्धांमध्ये मारलेली बाजी आपल्या सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे.