ज्युलिएटच्या उजव्या स्तनाला स्पर्श करण्याची ही खुळचट परंपरा आहे तरी काय ?

सगळ्या अंधश्रद्धा भारतातच जन्माला येत नाहीत, हे खूळ विचित्र प्रथा आणि समजुतींच्या माध्यमातून जगभर आहे. आजही आम्ही अशाच एका वेडगळ समजुतीची गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तर गोष्ट आहे ज्युलिएटची. हो, त्याच त्या रोमिओच्या ज्युलिएटची. तशी ही लोककथा, पण शेक्सपिअरने तिला मूर्त स्वरूप दिलं. प्रत्यक्षात रोमिओ-ज्युलिएट होऊन गेलेही असं म्हणतात. इटालियन लोककथेनुसार ही प्रेमकथा सिएना या शहरात घडते. पण शेक्सपिअरला वेरोना हे शहर आवडतं म्हणून त्याच्या लेखनात ही कथा वेरोनामध्ये घडते.
या प्रेमाच्या शोकांतिकेत ज्युलिएट रोमिओचं प्रेम असतं, पण दोघांच्या घराण्यात हाडवैर असतं. तिचं लग्न पॅरिस नावाच्या तितक्याच तोलामोलाच्या माणसाशी ठरवलेलं असतं. घरच्यांना भीती घालण्यासाठी ज्युलिएट काहीतरी पेय पिऊन मेल्याचा बनाव करते, त्याला रोमिओ फसतो आणि विष पिऊन जीव देतो. ज्युलिएटला शुद्धीवर आल्यावर आपण काय घोळ घातलाय हे लक्षात येतं आणि ती रोमिओच्या सुऱ्याने आत्महत्या करते.

हो, पण या सगळ्यात वेडगळ समजूत आली कुठे? वाचा तर मग.. शेक्सपिअरच्या कथेप्रमाणे हे प्रकरण घडतं वेरोना शहरात. तिथं ज्युलिएटचा राजवाडा, ती ज्या खिडकीत बसून रोमिओची वाट पाहायची, हे सगळं मांडलं आहे. तिथं तिचा ब्रॉंझचा एक पुतळाही आहे. या पुतळ्याच्या उजव्या स्तनाला स्पर्श केलात, तर तुमच्या मनोकामना यशस्वी होतात असं मानलं जातं. त्यामुळं तिचा पुतळा पाह्यलात, तर तिचा उजव्या स्तनाचा रंग पार उडालेला दिसेल. जिच्या स्वतःच्या मनोकामना पूर्ण झाल्या नाहीत, तिच्या पुतळ्याला विशिष्ट ठिकाणी स्पर्श केलात तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे मानणं म्हणजे...असोच!!
तुम्हांला या समजुतीबद्दल काय वाटतं? तुम्ही वेरोनाला गेलात तर ज्युलिएटच्या पुतळ्याला स्पर्श कराल की तिला स्पर्श करण्यांना हसाल??