computer

सावधान: फ्लिपकार्टची खोटी जाहिरात वापरून अशी तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

फसवणुकीचे प्रकार हे नेहमीच बदलत असतात. लोक जसे शहाणे होत जातात तसे चोरटे सुद्धा शहाणे होतात. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांच उदाहरण घ्या. पूर्वी फेसबुक, WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या लिंकमधून लोकांना फसवलं जायचं. आता त्याबद्दल लोकांमध्ये  जागृती निर्माण झाली आहे, पण फसवणुकीची प्रकरणं थांबलेली नाहीत. हे चोरटे पूर्वीपेक्षा जास्त काळजीपूर्वक लोकांना फसवत आहेत. याचं एक उदाहरण आज आम्ही सांगणार आहोत.

हा किस्सा कार्तिक राखरा नावाच्या व्यक्तीने  शेअर केला होता. कार्तिककडे त्याच्या घरी काम करणारा तरुण मुलगा आला आणि त्याने विचारलं की मला ‘फ्लिपकार्टवरून खरेदी करायची आहे, पण पेमेंटसाठी फक्त Paytm चा पर्याय का दिला जातोय?’ कार्तिकने त्याचा मोबाईल घेऊन काय भानगड आहे बघितल्यावर त्याला नवीनच गोष्ट समजली.

आपल्यातील बरेचजण mxplayer, UCBrowser आणि Sharechat वापरत असतील. या अॅप्सवर दिसणाऱ्या जाहिराती सुद्धा बघितल्या असतील. त्या तरुण मुलाच्या मोबाईलमध्ये UCBrowser वर फ्लिपकार्टची जाहिरात दिसत होती. ही जाहिरात बघून कोणालाही वाटेल की ही तर फ्लिपकार्टचीच जाहिरात आहे. पण हा एक फसवणुकीचा प्रकार होता.

या जाहिरातीत मोबाईल फोन  ८० ते ९८ टक्के कमी किमतीत मिळतील असं सांगण्यात आलं होतं. लाखोंना मिळणारा MacBook Pro तर अवघ्या १०,००० किमतीत दाखवण्यात आला होता. इथे संशय येण्याची शक्यता आहे, पण सामान्यातील सामान्य माणसाला यात काही गैर वाटणार नाही, कारण जाहिरात अस्सल वाटते. काळजीपूर्वक बघितल्यास जाहिरातल्या इंग्रजीत अनेक चुका दिसून येतील. शिवाय जाहिरातीत जे फोटो दिसतात त्यापैकी फक्त समोरचा फोटोच तेवढा पाहता येतो.

पुढे कार्तिकने बघितलं की जिथे पेमेंटचा पर्याय होता तिथे ‘अग्रवाल स्वीट्स’ लिहिलं होतं. मोबाईल फोन ‘अग्रवाल स्वीट्स’ मधून कसं मिळणार ? कार्तिकच्या घरी काम करणाऱ्या तरुणाला या सगळ्या संशयास्पद गोष्टी दिसूनही त्याला मोबाईल खरेदी करायचा होता. त्याच्याकडे Paytm नसल्यामुळे तो मदतीसाठी कार्तिककडे आला आणि त्याची फसवणूक होता होता वाचला आहे.

तर, ऑनलाईन दिसणाऱ्या जाहिरातींवर लगेच क्लिक करण्यापूर्वी १० वेळा नक्की विचार करा.  फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सच्या नावावर फसवणूक केली जाते. अशा जाहिराती कितीही अस्सल वाटत असल्या तरी त्या एकदा अधिकृत साईटवर जाऊन तपासून घेणे कधीही सोयीचं असतं.

सबस्क्राईब करा

* indicates required