पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी राहीबाई पोपरे : गावरान वाण आईच्या मायेने जपणाऱ्या 'बीजमाता'...

दरवर्षी भारतात पद्मश्री पुरस्कार दिले जातात. कधीकधी ते सैफ अली खानसारख्यांना मिळतं तेव्हा का त्यांनी हा पुरस्कार मिळण्यासारखं काय केलं आहे हा प्रश्न पडत असला तरी, या पुरस्कार यादीतली काही नावं पाहून त्यांचा गौरव सार्थ आहे याची खात्री पटते. २०२०च्या पद्मश्री पुरस्कार यादीत एक नाव असं आहे, त्या आहेत बीजमाता राहीबाई पोपरे!!
रासायनिक शेती आणि हायब्रीड बियाणांमुळे आपल्या दैनंदिन आहारात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. शेतीच्या नवीन पद्धतीमुळे आपल्या मातीत पूर्वापार येणाऱ्या पिकाचं वाणच नष्ट होण्याच्या मार्गावर गेलं होतं. हे गावरान वाण जपण्याचं आणि वाढवण्याचं काम अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या ‘राहीबाई पोपरे’ यांनी केलं.
‘राहीबाई पोपरे’ म्हणतात की कुपोषण आणि गावोगाव पसरलेल्या आजारांचं मूळ कुठेतरी आपल्या अन्नात आहे. यासाठी त्या गावरान आणि दुर्मिळ देशी वाण जपण्याचं महत्त्वाचं काम गेल्या २० वर्षापासून करत आहेत. गावरान वाण शोधून त्यांची लागवड करणे, ते इतरांना देणे आणि आलेल्या पिकातून वाणाची जपणूकीचं काम त्या करतात. लहानशा प्रयत्नातून सुरु झालेला हा प्रवास आज बीजबँकेत रुपांतरीत झाला आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र आता ‘बीजमाता’ म्हणून ओळखतो.
राहीबाईंनी त्यांच्या घराशेजारी ४०० ते ५०० वेगवेगळ्या गावरान झाडांची लागवड केली आहे. यात बऱ्याच गावरान भाजांचा समावेश होतो. काहींची नावेही नवीन पिढीला नक्कीच माहित नसतील. उदाहरणार्थ, गोड वाल, कडू वाल, पताडा घेवडा, बटूका घेवडा.
राहीबाईंनी आजवर ५४ पिकांच्या ११६ वाणांचं जतन केलं आहे. हे वाण आणखी वाढवण्यासाठी त्यांच्या प्रेरणेतून नाशिक आणि नगरमध्ये ४०० एकर जागेत गावरान वाणाची शेती केली जाती. राहीबाईंनी जपलेलं वाण संपूर्ण महाराष्ट्रातही पाठवलं जातं. आजवर हजारो शेतकऱ्यांनी या बीजबँकेतून गावरान वाण आपल्या शेतीसाठी नेलं आहे.
सुरुवातीला गावातील महिला गटही त्यांच्या कामाला बघून हसायचा, पण आज त्यांच्या सोबत ३,००० महिला काम करत आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ सालच्या महिला दिनानिमित्त त्यांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. यावर्षी पद्मश्रीने त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने पोचपावती मिळाली आहे.
अशा या बीजमातेला बोभाटाचा सलाम.