भारतात विमान प्रवास बंदीचे नियम काय आहेत? गुन्हे आणि त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षा जाणून घ्या !!

दोन दिवसांपूर्वी कुणाल कामरा या कॉमेडीयनने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तो पत्रकार अर्णब गोस्वामीला त्याच्या इच्छेविरुद्ध प्रश्न विचारतोय आणि त्याच्यावर टीका करतोय. व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला आणि त्याचे परिणामही दिसून आले. ज्या विमान कंपनीच्या विमानात हे घडलं त्या इंडिगो एअरलाईन्सने कुणालवर ६ महिन्यांसाठी बंदी आणली. इंडिगो पाठोपाठ एअर इंडिया, गो-एअर आणि स्पाईसजेटने पण त्याच्यावर बेमुदत काळासाठी बंदी आणली.
या संपूर्ण घटनेबद्दल प्रत्येकाचं आपापलं मत असू शकतं. आजच्या लेखाचा विषय हा विमानातील नियमांबद्दल आहे. असे कोणते नियम मोडल्याने प्रवाशांवर विमान कंपनीकडून बंदी आणली जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत.
याबाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एअरलाईन्स म्हणजे विमान कंपनीचे नियम आणि देशाच्या नागरी उड्डाण संचालनालयने ठरवून दिलेले नियम.
इंडिगो एअरलाईन्सचे नियम इंडिगोच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. अटींच्या यादीतील १५ व्या अटीतील Conduct च्या अंतर्गत येणारा मुद्दा हा विमान प्रवासादरम्यानच्या वर्तणूकीबद्दल आहे.
विमानाला धोका पोहोचवणे, सहप्रवासी आणि त्यांच्या मालकीच्या वस्तूंना धोका पोहोचवणे आणि इजा होईल असे वर्तन करणे, विमान कर्मचाऱ्यांच्या कार्यात अडथळा आणणे, विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, ज्यामध्ये धुम्रपान, मद्यपान, अंमलीपदार्थाचे सेवन करणे यांचा समावेश होतो. याखेरीज सहप्रवाशांना अडचणीचे वाटेल असे वर्तन करणेही सामील आहे. परंतु वर्तणुकीचे हे सर्व प्रकार मर्यादित आहेत असं नाही. या यादीत जे समाविष्ट नसतील, परंतु प्रवासासाठी आवश्यक असतील अशा वर्तणूकीचा आग्रह विमान कर्मचारी करू शकतात. इतर कोणतेही वर्तन जे विमान कर्मचारी, सहप्रवासी यांच्यासाठी अडचणीचे, अयोग्य आणि धोकादायक वाटत असेल असे सर्व नियम विमान प्रवासातील वर्तणुकीच्या नियमात मोडतात.
नागरी उड्डाण संचालनालयाचे नियम
कंपनीच्या नियमांशिवाय देशाच्या नागरी उड्डाण संचालनालयाचेही आपले नियम असतात. या नियमांमध्ये विमानाला किंवा प्रवाशांना धोका पोहोचणार नाही यासाठी नियम घालून दिलेले असतात. भारतातल्या नागरी उड्डाण संचालनालयाच्या नागरी उड्डाण तरतुदीतील अनुच्छेद क्रमांक ३ मध्ये विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांसाठी नियम दिलेले आहेत.
कोणत्या प्रवाशाला विमान प्रवास बंदीपर्यंतची शिक्षा देण्यात यावी यासाठी कोणते नियम आहेत ते पाहू.
१. उद्दाम वर्तणूक – हातवारे करणे, इतरांना त्रास होईल असं बोलणे, गोंधळ घालणे, इत्यादी.
२. शारीरिक त्रास देणे - शारीरिक इजा पोहोचवणे, मारणे, लैंगिक छळ, सहेतुक अयोग्य स्पर्श करणे, खेचणे, इत्यादी.
३. प्रवाशांच्या जीवाला घोका पोहोचेल अशी वर्तणूक - प्राणघातक हल्ला करणे, गळा दाबणे, कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसणे, विमानाच्या ऑपरेटिंग सिस्टमला धोका पोहोचवणे, इत्यादी.
क्रमांक एकच्या गुन्ह्यासाठी ३ महिने तर दोन आणि तीन क्रमांकाच्या गुन्ह्यांसाठी अनुक्रमे ६ ते २ वर्षांपर्यंतच्या बंदीची शिक्षा मिळते. पण थांबा. हे लगेच घडत नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते.
समजा एखादा प्रवासी त्रासदायक वागला तर त्याची तक्रार ही पायलटद्वारे केली जाते. तक्रारीचा विचार करण्यासाठी विमान वाहतूक कंपन्यांच्या अंतर्गत समितीची बैठक बसते. या समितीत निवृत्त सत्र न्यायाधीश, विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी असतात.
अंतर्गत समितीकडून ३० दिवसांच्या आत प्रवाशाकडून घडलेल्या गुन्ह्यावर आणि तो कोणत्या शिक्षेस पात्र आहे यावर चर्चा होते. प्रवाशाचा गुन्हा बघून त्याच्यावर किती काळासाठी बंदी आणावी हे ठरवलं जातं. अंतर्गत समितीला हा निर्णय ३० दिवसांच्या आत घ्यायचा असतो. जर अंतर्गत समिती ३० दिवस उलटूनही कोणत्याच निर्णयावर येत नसेल तर तो प्रवासी कोणत्याही नियमाशिवाय विमान प्रवास करू शकतो.
एकदा का बंदी आणली की त्या प्रवाशाची माहिती नागरी उड्डाण संचालनालयाकडे आणि इतर विमान कंपन्यांकडे द्यावी लागते. नागरी उड्डाण संचालनालयकडून त्या प्रवाशाची सगळी माहिती काळ्या यादीत टाकली जाते. ही माहिती इतर विमान कंपन्यांनाही दिली जाते.
अर्थात हे सगळं असलं तरी कधीकधी विमान कंपन्याही विचित्र निर्णय घेऊ शकतात. काही वर्षांपूर्वी शॉर्ट ड्रेस घातला म्हणून एका बाईला विमानातून उतरवले होते आणि विमानात बाळाला उघड्यावर दूध पाजत असताना दुसऱ्या एका बाईला विमानातून उतरवण्याची धमकी दिली गेली होती.
असे प्रसंग सतत येत नसतील आणि आपण कितीही सभ्य प्रवासी असलो तरी नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांना विमानबंदी होण्याचे नियम माहित असायलाच हवेत, म्हणून हा लेखनप्रपंच!!