computer

९ कोटी मैलांवरून घेतलाय सूर्याचा एकदम क्लिअर फोटो. पाहा बरं नक्की कसा दिसतो तो!

सूर्य कसा दिसतो आणि सूर्याच्या पृष्ठभागावर काय घडतं हे अजूनही गूढ आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे सूर्याच्या जवळ जाऊन त्याचं संशोधन करणं अशक्य आहे. तरी शास्त्रज्ञांकडून सूर्याच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. हवाई बेटावरच्या डॅनियल के. इनोये सोलार टेलीस्कोपने असाच एक यशस्वी प्रयत्न केला आहे.

हा पाहा सूर्याचा आजवरचा सर्वात सुस्पष्ट फोटो.

फोटो बघून तुम्हाला चिक्की आठवली का? चिक्की सारखा हा पदार्थ सूर्याचा छोटासा कोपरा आहे. सूर्याच्या आत जवळजवळ १३ लाख पृथ्वी सामावू शकतात. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की हा सूर्याचा किती लहानसा भाग असेल.

हा फोटो डॅनियल के. इनोये सोलार टेलीस्कोपने तब्बल ९.३ कोटी मैल लांबून टिपलेला आहे. ज्या आकृत्या आपण पाहत आहात त्या खरं तर कप्पे आहेत. अशाच कप्प्यांनी मिळून सूर्य बनलेला आहे. सूर्याच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हे कप्पे तयार होतात. आतील उष्ण प्लाज्मा बाहेर येऊन थंड होतो आणि पुन्हा आत जातो. या प्रक्रियेमुळे गडद रंगाच्या रेषा तयार होतात. फोटोमधले हे लहानसे कप्पे महाराष्ट्राच्या दुप्पट मोठ्या आकाराचे असतात.

डॅनियल के. इनोये सोलार टेलीस्कोपने सूर्याचं कधीही न दिसलेलं रूप जगासमोर आणलं आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा सूर्याला आणखी चांगल्यारितीने समजून घेण्यास मदत करेल. इस्रो सुद्धा सूर्याच्या बाह्य थराचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल १ मोहीम’ आखणार आहे. या मोहिमेतून मिळणारी माहिती नक्कीच महत्त्वाची असेल. तूर्तास सूर्याचं हे रूप कसं वाटलं ते नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required