राकेश मारिया यांच्या या चुकीमुळे अबू सालेम सुखरूप निसटला...

आपल्या लहान लहान चुकांमुळे आपल्याला पुढे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. ही चूक जर एका मोठ्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने केली तर त्याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर देशाला आणि समाजाला भोगावे लागतात. आज आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ती व्यक्ती म्हणजे खुद्द आयपीएस ऑफिसर ‘राकेश मारिया’ आहेत. त्यांनी केलेली चूक म्हणजे त्यांनी दाखवलेल्या दयेमुळे अबू सालेम सारखा गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
चला तर, जाणून घेऊया त्यावेळी काय घडलं होतं.
(राकेश मारिया)
९० च्या दशकातली गोष्ट आहे. त्यावेळी राकेश मारिया हे मुंबई पोलीस विभागात वरिष्ठ उपायुक्त होते. त्यांच्याकडे १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या तपासाची जबाबदारी होती. त्यांना तपासात माहिती मिळाली की अभिनेता संजय दत्त याच्या घरी शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली होती. या गोष्टीचा तपास घेत असताना झेबुन्निसा काझी नावाची एक स्त्री मारिया यांच्या हाती लागली. ती वांद्रे येथील माउंट मेरी भागात राहत होती. मारिया यांना माहिती मिळाली होती की जी शस्त्रे संजय दत्तला देण्यात आली होती, ती आधी याच झेबुन्निसाकडे आली होती.
झेबुन्निसाला प्रश्न विचारताना ती अचानक धाय मोकलून रडू लागली. आपण फार गरीब आहोत त्यामुळे आपल्याला या गुन्ह्यातून माफ करा असं ती म्हणाली. तिचं रडणं आणि तिचा निरागसपणा पाहून राकेश मारिया यांना तिची दया आली. त्यांनी तिला सोडून दिलं. ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. यानंतर राकेश मारिया यांनी मंजूर अहमद या माणसाला चौकशीसाठी बोलावलं. मंजूर अहमदच्या कारमधून संजय दत्तच्या घरी शस्त्रे नेण्यात आली होती. मंजूर अहमदनेच झेबुन्निसाला ओळखलं होतं. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं, "झेबुन्निसाला सगळं माहित आहे. ती निरागसपणाचं नाटक करत आहे."
हे माहित पडताच राकेश मारिया यांनी झेबुन्निसाला बोलावलं आणि तिच्या कानाखाली एक लगावून दिली. यावेळी तिने गयावया केली नाही, उलट ती पोपटासारखं बोलू लागली. तिने कबुली दिली की अबू सालेमने तिला शस्त्रे दिली होती. तिने अबू सालेमचा अंधेरीमधला पत्ताही सांगितला. पण शेवटी जे घडायचं नव्हतं, ते आधीच घडून गेलं होतं.
झेबुन्निसाने अबू सालेमला आधीच माहिती दिली होती, की पोलीस तिच्या घरी आलेले आणि चौकशी करत होते. हे समजताच अबू सालेमने वेळ न दवडता दिल्ली गाठली आणि तिथून नेपाळमार्गे तो दुबईला निघून गेला.
(अबू सालेम)
तोवर अबू सालेमला मुंबई अंडरवर्ल्डमध्ये फारसं महत्त्व नव्हतं. तो दुबईला पळून गेल्याने एकूणच मुंबईच्या अंडरवर्ल्डला एक वेगळं वळण मिळालं. पुढे हाच अबू सालेम डॉन झाला. २००२ साली त्याला पकडण्यात यश आलं असलं तरी पोर्तुगालच्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यामुळे त्याला भारतात फाशी होऊ शकत नाही. अबू सालेम त्यावेळी १९९० सालीच पकडला गेला असता, तर आज अंडरवर्ल्डचा इतिहास नक्कीच वेगळा असता.
राकेश मारिया यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं आत्मचरित्र 'Let Me Say It Now’ हे अशाच खळबळजनक माहितींनी भरलेलं आहे. शीना बोरा हत्याकांडबद्दल त्यांनी दिलेली माहिती सध्या चर्चेत आहे.